पुण्याजवळचे ५ निसर्गरम्य किल्ले, भटकंती होईल मस्त
पावसाळ्यात निसर्गाचे रुप आपल्या प्रत्येकाला मोहून टाकणारे असते. उन्हाने तापलेली धरती, वाढत्या तापमानाने डोंगर-दऱ्या आणि झाडांची झालेली रया आपल्याला पाहवत नाही. अशावेळी कधी एकदा पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवळ पसरते असे पशू, पक्षी, झाडं, डोंगर या निसर्गातील प्रत्येक घटकाला झालेले असते. डोंगर दऱ्यांवरुन भटकणाऱ्यांसाठी तर पावसाचा काळ म्हणजे पर्वणीच. ट्रेकींग करणाऱ्यांना कधी एकदा पाऊस पडतो आणि भर पावसात आपण एखादा सह्याद्रीतील गड सर करतो असे झालेले असते. मग साहजिकच पावसाला सुरुवात झाली की वर्षा सहलस गिर्यारोहणाचे बेत रंगतात आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सगळेच पावसाचा आनंद लुटत ट्रेकींगला निघतात.
महाराष्ट्राला सह्याद्री पर्वताची सुंदर अशी देणगी मिळालेली आहे. इतकेच नाही तर शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे या किल्ल्यांना ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. त्यामुळे लहान मुलांपर्यंत आपला इतिहास पोहोचवण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि ट्रेकींगची हौस पूर्ण कऱण्यासाठी किल्ल्यांची सफर करणे हा नक्कीच चांगला पर्याय ठरु शकतो. तुम्हीही असे पर्याय शोधत असाल तर पुण्याच्या जवळ असणाऱ्या अशाच काही किल्ल्यांची माहिती आज आपण घेणार आहोत. यंदाच्या पावसाळ्यात आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत किल्ला फिरण्याचा एक तरी बेत नक्की आखा. पण ट्रेकींग करताना योग्य ती काळजीही घ्या.
१. राजगड – पुण्यापासून अवघ्या ६० किलोमीटरवर असलेला हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी. या किल्ल्यावर पाहण्यासाठी मंदिर, बालेकिल्ला, विविध बुरुज प्रसिद्ध आहेत. किल्ल्याच्या खाली जेवणाची सोय होऊ शकते. किमान सामान घेऊन गेलो तर वरतीही आपल्याला चुलीवर शिजवता येण्याची सोय आहे. चढण्यासाठीही हा किल्ला फारसा अवघड नसून पावसाळ्याच्या दिवसांत एकदा तरी याठिकाणी जायलाच हवे.
२. रायगड – महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला तो किल्ला म्हणजे रायगड. ट्रेकींगची आवड असणाऱ्यांसाठी तर हा किल्ला म्हणजे निसर्गसौंदर्याने नटलेला असाच आहे. पर्यटनाच्या आणि इतिहासाच्या दृष्टीनेही किल्ल्यावर पाहण्यासारखे बरेच काही आहे. पायऱ्यांबरोबरच गडावर जाण्यासाठी रोपवेचीही सुविधा असल्याने ज्यांना चढत जाणे शक्य नाही ते रोपवेने अगदी सहज किल्ल्यावर जाऊ शकतात. रायगड जिल्ह्यात येणारा हा किल्ला पुण्यापासूनही जवळ आहे.
३. पुरंदर – पण्यापासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेला हा किल्ला पावसाळ्यात फिरायला छान आहे. चढायला जास्त नसल्याने लहान मुले, मध्यमवयीन याठिकाणी सहज जाऊ शकतात. गाडी बऱ्यापैकी वरपर्यंत जात असल्याने फारसे चालावे लागत नाही. तसेच चढ खूप नसल्याने ट्रेकींग नको असलेलेही याठिकाणी सहज जाऊ शकतात. पुरंदर गावात राहण्याची व जेवण्याची चांगली सोय होऊ शकते त्यामुळे पावसाळ्यात हा स्पॉट अगदीच छान आहे. विशेष गर्दी नसल्याने ज्यांना थोडी शांतता आवडते अशांसाठी हा किल्ला म्हणजे पर्वणीच आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला होता.
४. शिवनेरी किल्ला – हा किल्ला म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने शिवनेरी हे एक प्रेरणास्थान आहे. पुण्यापासून साधारण ८४ किलोमीटर असलेला हा किल्ला जुन्नर तालुक्यामध्ये आहे. जुन्नर निसर्गसौंदर्याने नटलेले असल्याने पावसाळ्यात तर याठिकाणी मोहून टाकणारे सौंदर्य पाहायला मिळते. हा किल्ला चढण्यासाठी जास्तीत जास्त ४५ मिनीटे ते १ तास लागत असल्याने ट्रेकींगची फारशी सवय नसणारेही याठिकाणी जाऊ शकतात.
५. कोराईगड – लोणावळ्याजवळ असलेला हा किल्ला निसर्गाच्या कुशीत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत तर याठिकाणी मस्त गारवा आणि धुके अनुभवायला मिळते. फिरायला सोपा आणि निसर्गरम्य असल्याने कोराईगडला पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांची भरपूर गर्दी असते. लोणावळ्यात लोहगड, विसापूर यांसारखेही बरेच किल्ले आहेत. त्यामुळे जवळचा सोपा ट्रेक करायचा असेल तर या पर्यायांचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता.
– सायली जोशी पटवर्धन