जय जगन्नाथा!
ओडिशातील पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ऐतिहासिक रथयात्रा हे संपूर्ण भारतातील लक्षावधी भाविकांच्या धार्मिक व सांस्कृतिक श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. रथ यात्रेच्या ९ दिवसात पहिल्या दिवशी, भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा माता आपल्या रथात बसून मुख्य मंदिराबाहेर पडतात आणि ३ किमी दूर असलेल्या गुंडीचा मंदिराकडे प्रस्थान करतात. मध्यंतरीच्या ७ दिवसात भगवान आपल्या मावशीच्या घरी म्हणजेच गुंडीचा मंदिरात ७ दिवस मुक्काम करतात आणि भक्तांना दर्शन देतात. नवव्या दिवशी तिन्ही देव पुन्हा रथात बसून मुख्य जगन्नाथ मंदिराकडे परततात. या परतीच्या प्रवासाला ‘बहुडा यात्रा’ म्हणतात.
या ऐतिहासिक रथयात्रेचा आणि पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या संरक्षणाचा महाराष्ट्रातील नागपूरकर भोसले राजघराण्याशी अत्यंत जवळचा आणि गौरवशाली संबंध राहिला आहे.
ओडिशा मोहीम आणि १७५१ चा ऐतिहासिक तह
अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात बंगाल प्रांतात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. तत्कालीन नवाब अलीवर्दी खानच्या प्रशासनाविरुद्ध तिथल्या काही स्थानिक सरदारांनी आणि पर्शियन गव्हर्नर मीर हबीबने नागपूरच्या भोसल्यांना लष्करी मदतीचे आमंत्रण दिले. रघुजी भोसले यांनी आपले पराक्रमी सेनापती भास्कर पंडित यांच्या नेतृत्वाखाली बंगाल आणि ओडिशावर लष्करी मोहिमा आखल्या.जवळपास दहा वर्षे चाललेल्या या संघर्षानंतर, अखेर १७५१ मध्ये जेरीस आलेल्या बंगालच्या नवाबाने मराठ्यांशी शांतता तह करण्यास मान्यता दिली. त्यामुळे, त्याच्या अखत्यारितील जगन्नाथ मंदिर आपल्या ताब्यात आले.
जगन्नाथ मंदिराचे मुघलकालीन संकट आणि मराठ्यांचे संरक्षण
मुघल आणि अफगाण राजवटीच्या काळात जगन्नाथ पुरी मंदिराला सातत्याने आक्रमक आणि विध्वंसक धोरणांचा सामना करावा लागला होता. मुघल सम्राट औरंगजेबाने १६९२ मध्ये जगन्नाथ मंदिर पूर्णपणे पाडण्याचे आणि मूर्ती नष्ट करण्याचे थेट फर्मान काढले होते, त्यानंतर औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मंदिर बंदच होते. १७२७ ते १७३४ या काळात मोहम्मद तकी खान याने दोन वेळा मंदिरावर अत्यंत क्रूर हल्ले करून संपत्ती लुटली होती, ज्यामुळे पुजाऱ्यांना भगवान जगन्नाथाच्या मूर्ती वारंवार चिल्का सरोवरातील विविध सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवाव्या लागल्या होत्या.
१७५१ मध्ये भोसल्यांनी नियंत्रण मिळवल्यानंतर या धार्मिक छळाचा इतिहास संपुष्टात आला. नागपूरकर भोसल्यांचे दिवाण बहादूर खान यांनी १७५२ मध्ये खुर्डाचे तत्कालीन राजे बिरकिशोर देव यांना पत्र लिहून हे अधिकृत आश्वासन दिले की, मराठा प्रशासनात जगन्नाथ पुरी मंदिरावर कोणतेही आक्रमण होणार नाही. या आश्वासनामुळे मंदिर पुजाऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर झाले आणि रथयात्रेचा लोकोत्सव पुन्हा अत्यंत सुरक्षित वातावरणात सुरू झाला.
जगन्नाथ मंदिर प्रशासन आणि मराठा सुभेदार
मराठा शासकांनी जगन्नाथ मंदिराचे व्यवस्थापन आणि दैनंदिन सुव्यवस्था राखण्यासाठी चार प्रमुख ‘परिच्छा’ (मंदिर व्यवस्थापक) यांची नियुक्ती करण्यात आली. उत्कृष्ट मंदिर व्यवस्थापनामुळे, मराठ्यांच्या कारकिर्दीत यात्रेकरूंची संख्या प्रचंड वाढली. यामध्ये मुसलमानांना देखील जगन्नाथ दर्शनासाठी किंवा पर्यटनासाठी अतिशय उदारपणे परवाने दिले जात असत.
मराठा शासकांनी यात्रेकरूंच्या भोजन व्यवस्थेसाठी ‘अन्नछत्र’ सुरू केले. तत्कालीन गरीब आणि दुष्काळग्रस्त लोक मराठ्यांनी चालवलेल्या अन्नछत्रांमध्ये (छतर) जेवण करत असत. रघुजी महाराजांच्या मातोश्री श्रीमंत महाराणी चिमाबाईसाहेब भोसले यांनी जगन्नाथ महाप्रभूंना अर्पण करण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध अशा ‘मोहनभोग’ प्रसादाची सुरुवात केली, जी आजही मंदिरात दररोज सकाळी तयार केली जाते.
जगन्नाथ मंदिराच्या सिंहद्वारासमोर उभा असलेला ऐतिहासिक ‘अरुण स्तंभ’ हा मूळचा कोणार्कच्या सूर्यमंदिरातील होता. हा भव्य पाषाण स्तंभ मराठा काळातच सुरक्षितपणे आणून जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित करण्यात आला.
जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे|
पौराणिक कथेनुसार, राजा इंद्रद्युम्न याच्या विनंतीवरून स्वतः विश्वकर्माने अत्यंत वृद्ध सुताराच्या रूपात प्रकट होऊन समुद्रात सापडलेल्या महाकाय वृक्षापासून या अनोख्या लाकडी मूर्ती घडवल्या होत्या. मात्र, मूर्ती पूर्ण होण्याआधीच मंदिराचे दार उघडल्यामुळे विश्वकर्मा अदृश्य झाले आणि केवळ अर्धवट काष्ठमूर्ती शिल्लक राहिल्या. ‘आम्हाला याच रूपात पूजले जावे’ या आकाशवाणीनुसार आजही कृष्ण (जगन्नाथ), बलराम आणि सुभद्रा यांच्या लाकडी मूर्तींची पूजा केली जाते. या मूर्ती दर बारा वर्षांनी अत्यंत गुप्त विधी करून नवीन बनवल्या जातात, ज्याला ‘नवकालेवर’ उत्सव म्हणतात.
रथयात्रेपूर्वी ज्येष्ठ पौर्णिमेला या मूर्तींना ‘स्नान विधी’ दरम्यान सुवर्ण कुंडातील प्रत्येकी १०८ घडे पाण्याने पवित्र स्नान घातले जाते, ज्यानंतर देव १५ दिवसांसाठी आजारी पडतात. या कालावधीत त्यांना फक्त विशिष्ट काढा आणि मर्यादित पथ्य दिले जाते, त्यानंतर आषाढ शुक्ल द्वितीयेला ते निरोगी होऊन भव्य रथयात्रेसाठी बाहेर पडतात.
भक्ती आणि शौर्याचा अतूट संबंध
१८०३ मध्ये दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धादरम्यान देवगावच्या तहानुसार ओडिशाचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला आणि मराठ्यांची राजवट संपुष्टात आली. परंतु, मराठ्यांनी मंदिराच्या आणि रथयात्रेच्या बाबतीत निर्माण केलेल्या सुधारणा एवढ्या भक्कम होत्या की, ब्रिटिशांनाही सुरुवातीच्या काळात मराठा परिच्छांना (उदा. मोरार पंडित आणि शिवाजी पंडित) मंदिर प्रशासनात कायम ठेवावे लागले.
आजही जगन्नाथ पुरीच्या ऐतिहासिक रथयात्रेच्या वेळी नागपूरचे विद्यमान राजे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांना मंदिर प्रशासनातर्फे अत्यंत मानाचे आणि अधिकृत निमंत्रण पाठवले जाते, जे या ऐतिहासिक नात्याची साक्ष देते. हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुबंध आजही महाराष्ट्र आणि ओडिशा या दोन राज्यांमधील भक्तीचे आणि शौर्याचे एक अतूट प्रतीक म्हणून जिवंत आहे.
– मैत्रेयी गोडसे