Friday, July 17, 2026

संस्कृत.. वैभव भारताचे…

Share

संस्कृत ही केवळ एक भाषा नसून भारताच्या महानतेचा, तत्त्वज्ञानाचा पाया आहे. एखाद्या देशाची ओळख केवळ त्याच्या भौगोलिक सीमांवरून अथवा आर्थिक प्रगतीवरून ठरत नसते. तर त्या देशाची संस्कृती आणि वाङ्मय किती समृद्ध आहे यावर निश्चित होते. भारताच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आपल्या या अथांग सांस्कृतिक महासागराचे मूळ ‘संस्कृत’ भाषेमध्ये दडलेले आहे. “भारतस्य प्रतिष्ठे द्वे संस्कृतं संस्कृतिस्तथा” (भारताची प्रतिष्ठा ही संस्कृत व संस्कृती या दोन गोष्टींवर अवलंबून आहे) हे सुभाषित आजच्या आधुनिक युगातही तितकेच तंतोतंत लागू होणारे आहे म्हणूनच संस्कृतला ‘भारताचे वैभव’ म्हणणे अत्यंत सार्थ ठरते.

संस्कृतला जगातील सर्वात प्राचीन, परिपूर्ण वैज्ञानिक भाषा आहे. ऋग्वेदापासून सुरू झालेला प्रवास भारताच्या वैचारिक समृद्धतेची साक्ष देणारा आहे. संस्कृतचे व्याकरण हा मानवी बुद्धिमत्तेचा एक अनुपम अविष्कार आहे. आचार्य पाणिनी यांनी रचलेला ‘अष्टाध्यायी’ हा ग्रंथ भाषेला इतका अचूक, तर्कशुद्ध प्रमाण देतो की, आधुनिक भाषाशास्त्रज्ञही अवाक होतात. संस्कृतमधील धातू, प्रत्यय वैज्ञानिक नियमांवर आधारित आहे. त्यामुळेच संगणकीय अल्गोरिदम आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) साठी संस्कृत ही जगातील सर्वात योग्य व त्रुटीरहित भाषा मानली जाते.

भारतामध्ये प्रांतीय भाषांचे वैविध्य फार मोठे आहे. या सर्व भाषांना एकत्र बांधणारा सुवर्णधागा म्हणजे संस्कृत होय. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली असो की दक्षिण भारतातील भाषा, या सर्वांच्या शब्दसंग्रहाचा मोठा हिस्सा संस्कृतमधून आला आहे. म्हणूनच प्रांतीय वादांवर पडदा टाकून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे सर्वात मोठे माध्यम संस्कृत ठरू शकते. भारताचा गौरवशाली इतिहास समजून घेण्यासाठी, येथील शिलालेख, ताम्रपट आणि दुर्मिळ ग्रंथांचे वाचन करण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान असणे अत्यंत अनिवार्य आहे.

दुर्दैवाने, स्वातंत्र्योत्तर काळात व नंतर काँगेसच्या सत्ता काळात संस्कृतला ‘मृत भाषा’ अथवा ‘अतिशय कठीण भाषा’ म्हणून खूप हिणवले गेले. मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीने आपल्याला आपल्याच मुळांपासून तोडण्याचे काम केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) भारतीय ज्ञानप्रणाली आणि संस्कृतला मुख्य प्रवाहात आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतीय भाषा समिती आणि ‘संस्कृत भारती’ सारख्या संस्थांच्या प्रयत्नांमुळे आज कर्नाटकातील ‘मत्तूर’ सारखी गावे संपूर्णपणे संस्कृतमध्ये संवाद साधत आहेत.

संस्कृत हे भारताचे केवळ वैभव नसून ते भारताचे ‘अस्तित्व’ आहे. जसा आत्मा गेल्यावर शरीर मृत होते, तसेच संस्कृतशिवाय भारतीय संस्कृती प्राणहीन होईल. भारताला जर जगाचे नेतृत्व करायचे असेल, तर आपल्याला आपल्या या भाषिक आणि सांस्कृतिक मुळांकडे जाणे क्रमप्राप्त आहे. संस्कृतचे पुनरुज्जीवन म्हणजेच नव्या, समर्थ आणि आत्मनिर्भर भारताचे भविष्य आहे.

उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ॥

– हिमांशू शुक्ला

अन्य लेख

संबंधित लेख