Wednesday, July 29, 2026

दीपस्तंभ निमाला

Share


माणसाने स्वतःच्या जगण्यातून, ध्येयनिष्ठेतून आणि कर्तृत्वातून निर्माण केलेला प्रभाव हा तो जगातून निघून गेल्यानंतर अधिक तीव्रतेने जाणवू लागतो. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि ‘तरुण भारत’चे माजी संपादक लक्ष्मणराव जोशी उपाख्य ‘ल.त्र्यं. जोशी’ यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक विचारनिष्ठ, अत्यंत संयमी, कल्पक आणि स्नेहाचा अमर्याद झरा असलेला दीपस्तंभ कायमचा निमाला आहे. अकोल्यातील तेल्हारा या छोट्याशा गावातून एका प्राथमिक शिक्षकाच्या रूपाने सुरू झालेला त्यांचा जीवनप्रवास, पुढे महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीतील एका उत्तुंग आणि आदराच्या शिखरापर्यंत पोहचला. पत्रकारांच्या कित्येक पिढ्यांना कासवीच्या नजरेने वृत्तपत्रीय लेखनशैलीचे, वैचारिक चिंतनाचे, संतुलित अभ्यासाचे आणि माध्यम-अनुशासनाचे संस्कार देणारे लक्ष्मणराव हे पत्रकारितेतील एक उत्तुंग गौरीशिखर आणि शेकडो सहकाऱ्यांचे खंबीर आधारवड होते. तब्बल सहा दशकांचा प्रदीर्घ काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात घालवूनही अहंकाराचा वाराही न लागलेले हे व्यक्तिमत्त्व सौजन्याचे आणि नम्रतेचे मूर्तिमंत प्रतीक होते. सर्वार्थाने एवढी मोठी उंची लाभूनही कमालीचा ‘आत्मविलोप’, निगर्वीपणा आणि कमालीचा संवादी स्वभाव हे त्यांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते. स्वतःला ‘बुद्धिजीवी’ किंवा विचारवंत म्हणून मिरवण्यापेक्षा ‘कार्यकर्ता पत्रकार’ म्हणून जगण्यात आणि सहकाऱ्यांना घडवण्यात त्यांनी नेहमीच खरा आनंद मानला.

विवेकी विचारनिष्ठा आणि संयमाची जोड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीशी लक्ष्मणरावांची बांधिलकी आणि निष्ठा होती. ती त्यांनी पत्रकारिता करताना कधीही लपवली नाही. मात्र, दैनंदिन कामात आपल्या विचारसरणीच्या मर्यादा येणार नाहीत, याचीही काळजी घेतली. म्हणूनच ते संघविचारांचा थेट संबंध नसलेल्या अशा वृत्तपत्रांनाही नेतृत्व देऊ शकले. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षात त्यांनी या विचारांच्या माध्यमांचा प्रतिकूलतेपासून आजच्या अनुकूलतेकडे झालेला प्रवास स्वतः अनुभवला. परंतु, विचारसरणीचे दैनिक चालवताना आक्रमकतेपेक्षा त्यांनी ‘संयम’ आणि ‘विवेकीपणा’ जोपसला. आपण संघाच्या विचारांचे दैनिक चालवत आहोत याचे पूर्ण भान ठेवतानाच, अन्य माध्यमांच्या मर्यादा आणि बलस्थाने काय आहेत, हे त्यांनी अचूक ओळखले होते. “इतर माध्यमांशी तुलना करून आपण त्यांच्यासारखे होण्याने आपला विस्तार होणार नाही,” हे त्यांचे स्पष्ट मत असायचे. त्यांनी वृत्तपत्राला एका पक्षाचे केवळ आक्रस्ताळे मुखपत्र बनू दिले नाही, तर सर्व विचारांच्या माणसांना जोडणारे एक व्यापक व्यासपीठ बनवले. “मी संघातला बंडखोर आहे,” असे सांगण्याचे धाडस आणि ऋजुता त्यांच्यात होती. त्यामुळेच त्यांचा लोकसंग्रह जात, धर्म, पंथ आणि राजकीय पक्षाच्या सर्व सीमा ओलांडून अथांग पसरलेला होता.

अचाट उत्साह आणि नवतेचा सहज स्वीकार

वयाची सीमा लक्ष्मणरावांच्या उत्साहाला आणि अध्ययनशीलतेला कधीच बांध घालू शकली नाही. वयाच्या ८०-९० च्या टप्प्यावरही त्यांची लेखन-सक्रियता अलौकिक आणि अद्भुत अशीच होती. वयानुसार येणाऱ्या चिडचिडीचा लवलेशही न बाळगता त्यांनी स्वतःच्या नातवाच्या वयाच्या तरुणांकडून सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाचे तंत्र हट्टाने शिकून घेतले. शिकवणाऱ्या तरुणाला ओशाळायला होईल इतक्या नम्रतेने, आदराने आणि कुतूहलाने ते एका उत्तम विद्यार्थ्यासारखी प्रत्येक छोटी गोष्ट टिपून घ्यायचे. नवी पिढी संगणकावर काम करायला कंटाळत असताना, लक्ष्मणराव स्वतः कीबोर्डवर दोन बोटांनी दणादण मजकूर टंकलेखन करायचे. केवळ प्रिंट माध्यमापुरते मर्यादित न राहता, त्यांनी ‘टिवटिवाट’सारखा आधुनिक समाजमाध्यमांवर आधारित स्तंभ सुरू करण्याचा पुढाकार घेतला. एवढेच नव्हे, तर साठी ओलांडल्यानंतर टीव्ही पत्रकारितेचे तंत्र शिकण्यासाठी रोज न चुकता वृत्तवाहिनीच्या कार्यालयात जात असत. कॅमेऱ्याची फ्रेम, व्हीओ, आणि हेडरुम या तांत्रिक गोष्टी कोणत्याही अहंगंडाशिवाय शिकणारा हा संपादक जन्मभर अखंड विद्यार्थीच राहिला.

समृद्ध संवाद आणि अफाट लोकसंग्रह

लक्ष्मणराव हे कधीही हस्तिदंती मनोऱ्यात बसणारे संपादक नव्हते, तर प्रत्यक्ष ‘फील्ड’वर जाऊन काम करणारे खरे वृत्तपत्रकार होते. गोव्याच्या सीमेवरील तेरेखोलच्या किल्ल्यावर काट्याकुट्यांतून फिरणे असो, जुन्या गोव्यातील पुरातन कोठारात उतरणे असो, किंवा साखळीच्या महापुरात पँट वर खोचून चिखलातून पूरग्रस्तांच्या घरांत जाऊन त्यांना दिलासा देणे असो; लक्ष्मणरावांचा हा प्रत्यक्ष भूमीवरील संचार अत्यंत प्रेरणादायी होता. ते जिथे जिथे गेले—नागपूर, जळगाव, मुंबई, गोवा वा ठाणे—तिथे त्यांनी माणसे जोडली. गोव्यातील असा एकही गाव नसेल जिथे त्यांचा सुह्रद नव्हता. वाचकांच्या आणि सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात ते मनःपूर्वक सहभागी होत. कोणालाही स्वहस्ताक्षरात पत्र लिहिताना, लखोट्यावरील पत्ताही स्वतःच्याच हाताने लिहिण्याची त्यांची आपुलकीची पद्धत समोरच्या माणसाला थेट हृदयापासून जोडून घ्यायची.

न्यूजरूम हेच कुटुंब

न्यूजरूम हे एक कुटुंब असते आणि वृत्तपत्राचे काम हे समूहकार्य असते, यावर लक्ष्मणरावांची अढळ श्रद्धा होती. सहकाऱ्यांवर त्यांनी कधीही आपले संपादकत्व लादले नाही. कनिष्ठ सहकाऱ्यांशीही ते सदैव ‘अहो-जाहो’ करूनच बोलायचे. एखादा विषय सहकाऱ्याला पटला नाही आणि त्याने लिखाणास नकार दिला, तरी कपाळावर आठ्या न पाडता “आधी शांत व्हा, पाणी प्या” असे सांगून त्याचा मान राखण्याची संस्कृती त्यांनी जपली. नवीन लेखकांना लिहिण्यास आत्मीयतेने प्रोत्साहन देणे, “भाग तीन लवकर येऊ द्या, हा शेवटचा असू नये” असा हक्काने फोन करून आळशी लेखकांकडूनही लिहून घेणे हा त्यांचा सहज स्वभाव होता. अग्रलेख स्वतः लिहिला तरी वाचकांची पावती मिळाल्यावर “हा मी नाही, माझ्या अमुक सहकाऱ्याने लिहिलाय,” असे सांगण्याचा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला. “माझा पगार कमी करा, पण माझ्या सहकाऱ्याचा वाढवा,” असे व्यवस्थापनाला सांगणारा गुणग्राहक संपादक आजच्या काळात विरळाच. केबिनचे दार सर्वांसाठी सदैव उघडे ठेवणे आणि दुपारी न्यूजरूममध्ये सर्वांना खमंग खायला घालणे, ही त्यांच्या शिस्तीला लाभलेली लडिवाळ किनार होती.

संपादकाचा मान आणि निरहंकारी समर्पण

ज्येष्ठतेचा कोणताही आव न आणता काम करणे आणि आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगणे हे लक्ष्मणरावांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य होते. एखाद्या लेखनविषयावर नवशिक्या विद्यार्थ्यांशी किंवा कनिष्ठ सहकाऱ्यांशी जेव्हा ते आपणहून मनमोकळी चर्चा करत आणि मत विचारत, तेव्हा समोरच्याला त्यांच्या प्रांजळतेचे आणि निगर्वीपणाचे विलक्षण अप्रूप वाटायचे. साप्ताहिकांना वा नियतकालिकांना लेख पाठवण्यापूर्वी “माझी विचारसरणी अशी आहे, काही बदल हवा आहे का?” असे विचारून ते स्वतःच दोन परिच्छेद आधी पाठवायचे. तरुण संपादकांनी संकोचून जाऊ नये म्हणून, “तुम्ही संपादक आहात आणि संपादकाचा शब्द अंतिम असतो; त्यामुळे जे अनावश्यक वाटेल ते वगळण्याचा अधिकार तुम्हाला आहे,” असे सहजपणे सांगून सहकाऱ्यांचा सन्मान करायचे. “आक्रमक शब्दांनीच विचार मांडले की लोकांच्या मनाला भिडतात असा नियम नसतो, संयमितपणे लिहिल्यास मुद्दा अधिक प्रभावी होतो..” हा त्यांनी दिलेला माध्यम-अनुशासनांचा आणि लेखनाचा मोलाचा वस्तुपाठ होता. मुख्य संपादक असतानाही गरज पडल्यास डेस्कवर काम करणे किंवा स्वतःच्या पेनाची रिफिल वृत्तपत्राच्या कागदाने गुंडाळून वापरणे—या गोष्टी ते किती जमिनीवर घट्ट रोवून उभे होते, याची साक्ष देतात.

ऐतिहासिक कालखंडाचा साक्षीदार

स्वातंत्र्योत्तर काळाची आरंभीची पत्रकारिता, जवाहरलाल नेहरूंचे युग, इंदिरा गांधींचे पर्व, आणीबाणीतील धरपकड आणि शेतकरी आंदोलने या सर्व ऐतिहासिक घडामोडींचे लक्ष्मणराव प्रत्यक्ष साक्षीदार होते. बाबुराव वैद्य (मा. गो.) असोत वा ल.त्र्यं. जोशी, या दिग्गजांच्या लेखनाने आणि मार्गदर्शनाने पिढ्यानपिढ्यांच्या लेखकांवर लिखाणाचे संस्कार केले. राजकीय विषयांवर अध्ययन करताना वैयक्तिक राजकीय विचारधारा बाजूला ठेवली पाहिजे, असा त्यांचा स्पष्ट आग्रह असायचा. सहकाऱ्यांच्या कौटुंबिक अडचणीत, आजारपणात किंवा मुलांच्या प्रवेशाच्या वेळी बापासारखी खंबीर साथ देणारे लक्ष्मणराव हे केवळ एक वृत्तपत्रीय नाव नव्हते, तर अनेक पत्रकारांच्या आणि लेखकांच्या आयुष्याचा खंबीर आधारवड होते.
“माध्यमाचा ब्रँड जसा असतो, तसाच पत्रकार म्हणून तुझा ब्रँड तुझ्या गुणवत्तेवर आणि सत्यनिष्ठेवर तयार कर,” हा त्यांनी सहकाऱ्यांना दिलेला संदेश हीच त्यांच्यासाठी खरी गुरुदक्षिणा ठरेल. प्रतिकूलतेतून मार्ग काढत पत्रकारितेत समृद्ध ठसा उमटवणाऱ्या या ध्येयवादी, संवादी, निरहंकारी आणि विवेकी ‘वृत्तपत्र-स्तंभां’चे विसावणे ही संपूर्ण मराठी पत्रकारिता क्षेत्राची न भरून येणारी हानी आहे. गुरुवर्य लक्ष्मणराव जोशी यांच्या स्मृतीस आणि त्यांच्या उत्तुंग कर्तृत्वास शतशः प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली!

अन्य लेख

संबंधित लेख