Tuesday, August 11, 2026

‘ऑपरेशन सफेद सागर’ कारगिल युद्धावर आधारित आहे?

Share

नेटफ्लिक्सवर सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या ‘ऑपरेशन सफेद सागर’ मुळे कारगिल युद्ध आता पुन्हा चर्चेत आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना यात दाखवलेल्या घटना या  खऱ्या आहेत का? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. खऱ्या घडलेल्या घटना आणि नाट्यमय प्रभावासाठी काही जोडले गेले आहे का? हे आपण येथे पाहुयात. 

नेटफ्लिक्सची मालिका ‘ऑपरेशन सफेद सागर: द अनटोल्ड स्टोरी ऑफ द कारगिल वॉर’ ने भारतीय हवाई दलाच्या (IAF) सर्वात कठीण लष्करी मोहिमांपैकी एका मोहिमेला पुन्हा एकदा चर्चेत आणले आहे. १९९९ च्या  कारगिल युद्धातील एका दुर्लक्षित प्रकरणावर ही सहा भागांची मालिका आधारित आहे. ही मालिका भारतीय हवाई दलाच्या नंबर १७ स्क्वॉड्रनची (जी ‘गोल्डन एरोझ’ म्हणून प्रसिद्ध आहे) आणि १९९९ च्या कारगिल युद्धातील त्यांच्या भूमिकेची गोष्ट सांगते.

या सिरीजचे दिग्दर्शन ओनी सेन यांनी केले आहे, तर निर्मिती अभिजीत सिंग परमार आणि कुशाल श्रीवास्तव यांनी केली आहे. यात सिद्धार्थ, जिमी शेरगिल, अभय वर्मा, मिहीर आहुजा, तारूक रैना आणि अर्णव भासिन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र, वास्तववादी लष्करी संघर्षांचे चित्रण करताना चित्रपट निर्माते अनेकदा सिनेमॅटिक स्वातंत्र्य घेतात. ‘ऑपरेशन सफेद सागर’ या सिरीजच्या माध्यमातून कारगिल युद्धातील हा दुर्लक्षित भाग पडद्यावर आल्याने, प्रेक्षकांना त्यातील सत्य काय आहे हे जाणून घ्यायचे आहे.

पाकिस्तानी सैन्याने भारताच्या चौक्यांवर ताबा मिळवला होता का?

मालिकेत दाखवले आहे की, पाकिस्तानी सैन्याने हिवाळ्यात कारगिलच्या अतिउंच प्रदेशातील भारताच्या लष्करी ठिकाणांवर गुप्तपणे ताबा मिळवला होता. कारगिल युद्धाला कारणीभूत ठरलेल्या घटनांवर हा भाग आधारित आहे.

संघर्षापूर्वी, भारतीय आणि पाकिस्तानी सैन्य अतिशय कडाक्याच्या थंडीच्या महिन्यांत अतिउंच ठिकाणच्या काही फॉरवर्ड पोस्ट (पुढील चौक्या) साधारणपणे रिकाम्या करत असत. काही भागांमध्ये कायमस्वरूपी ठाण मांडणे अत्यंत कठीण जाण्यामागचे कारण म्हणजे तेथील तापमान आणि हवामानाची बिकट परिस्थिती.

१९९९ मध्ये, पाकिस्तानी सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी नियंत्रण रेषा (LoC) ओलांडून भारतीय बाजूच्या अशा अनेक चौक्यांवर ताबा मिळवला. या ठिकाणांमुळे पाकिस्तानला एक महत्त्वाची सामरिक आघाडी मिळाली, कारण येथून श्रीनगरला लेहशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवर नजर ठेवता येत असे. या ऑपरेशनमुळेच शेवटी कारगिल संघर्ष पेटला.

मुशर्रफ यांनी लाहोरमध्ये अटलबिहारी वाजपेयींचा अपमान केला होता ?

मालिकेतील आणखी एक प्रसंग पाकिस्तानचे तत्कालीन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ आणि भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यातील तणावपूर्ण संबंधांकडे निर्देश करतो.

भारत आणि पाकिस्तानमधील शांततेच्या एका मोठ्या प्रयत्नाचा भाग म्हणून वाजपेयी फेब्रुवारी १९९९ मध्ये दिल्ली-लाहोर बसने लाहोरला गेले होते. या भेटीचा परिणाम म्हणून ‘लाहोर घोषणापत्र’ अस्तित्वात आले, ज्याचा उद्देश दोन्ही देशांमधील संबंध सुधारणे हा होता.

मात्र, अशा उच्चस्तरीय भेटीच्या वेळी वाघा बॉर्डरवर ज्या पद्धतीने स्वागत अपेक्षित असते, त्याप्रमाणे पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाने यामध्ये सहभाग घेतला नाही. शांततेच्या या प्रक्रियेपासून मुशर्रफ अलिप्त असल्याचेही दिसून आले. कारगिल संघर्ष सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच ही बाब विशेष महत्त्वाची ठरली.

पाकिस्तानचे नागरी नेतृत्व आणि लष्कर यांच्यातील वाढती दरी दाखवण्यासाठी मालिकेत या प्रसंगाचा वापर केला गेला आहे.

मुशर्रफ यांनी कारगिल ऑपरेशन नवाज शरीफ यांच्यापासून लपवले होते का?

कारगिल युद्धाभोवतीच्या सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक म्हणजे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना या लष्करी ऑपरेशनबद्दल किती माहिती होती? मालिकेत मुशर्रफ यांना या ऑपरेशनचे मुख्य सूत्रधार म्हणून सादर केले गेले आहे आणि शरीफ यांना अंधारात ठेवण्यात आल्याचे सुचवले आहे. मात्र, याबाबत मतभेद आहेत.

शरीफ यांनी नंतर असा दावा केला होता की, लष्कराने त्यांना ऑपरेशनच्या व्याप्तीबद्दल आणि स्वरूपाबद्दल योग्य माहिती दिली नव्हती. परिस्थिती आधीच चिघळल्यानंतरच आपल्याला तिची तीव्रता समजल्याचे त्यांनी सांगितले होते.

मुशर्रफ यांनी यावर पूर्णपणे वेगळा दावा केला. आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी असा दावा केला की, शरीफ आणि इतर राजकीय नेत्यांना ऑपरेशनबद्दल माहिती देण्यात आली होती आणि सीमेवरील घडामोडींची कल्पना पंतप्रधानांना देण्यात आली होती.

या मतांमधील विसंगती कधीही पूर्णपणे दूर झालेली नाही, ज्यामुळे हा कारगिल युध्दातील सर्वात वादग्रस्त मुद्दा बनला.

भारतीय विमानांना नियंत्रण रेषा (LoC) ओलांडण्याची परवानगी का नव्हती?

या मालिकेत दाखवलेल्या सर्वात महत्त्वाच्या लष्करी तपशिलांपैकी एक म्हणजे संघर्षकाळात भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांवर लादलेले बंधन. कारगिल युद्धादरम्यान, हा संघर्ष अधिक व्यापक युद्धात रुपांतरित होऊ नये म्हणून भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना नियंत्रण रेषा (LoC) न ओलांडण्याचे आदेश देण्यात आले होते.

उंच हवेचा कमी दाब, अनपेक्टेड हवामान आणि शत्रूचा मारा या पार्श्वभूमीवर उच्च उंचीवर उड्डाण करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते. या सर्व मर्यादा असूनही, हवाई दलाने पाकिस्तानी ठाण्यांना खिळखिळे करण्यात आणि भारतीय सैन्याच्या आगेकूचमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

अजय आहुजा आणि के. नचिकेता यांचे काय?

कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाच्या जवानांच्या सर्वात प्रसिद्ध कथांपैकी काही कथा ही मालिका पडद्यावर आणते. संघर्ष सुरू असताना मिग-२१ (MiG-21) पाडल्यानंतर स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना वीरगती प्राप्त झाली.

फ्लाइट लेफ्टनंट के. नचिकेता यांचे मिग-२७ (MiG-27) विमान उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचणीत सापडले, ज्यामुळे त्यांना विमानाबाहेर (इजेक्ट) उडी मारणे भाग पडले आणि ते पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि ते भारतात परतले. कारगिलमधील हवाई युद्धाच्या खऱ्या इतिहासाचा हे प्रसंग एक महत्त्वाचा भाग आहेत.

सर्व वैमानिक आणि त्यांच्या वैयक्तिक कथा खऱ्या आहेत का?

मालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख घटना वास्तविक इतिहासावर आधारित असल्या, तरी काही पात्रे आणि वैयक्तिक कथा काल्पनिक किंवा संमिश्र (composite) आहेत.

थोडक्यात सांगायचे तर: ‘ऑपरेशन सफेद सागर’ हे १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वास्तवावर, विशेषतः या संघर्षात भारतीय हवाई दलाने बजावलेल्या भूमिकेवर आधारित आहे. आकाशातून कारगिल युद्ध लढणाऱ्या जवानांची मोठी गाथा सांगण्यासाठी हा शो वास्तवाचा पाया वापरून त्यात काल्पनिक आणि संमिश्र पटकथेची भर घालतो.

अन्य लेख

संबंधित लेख