Tuesday, August 11, 2026

अमर हुतात्मा खुदीराम बोस आणि डिजिटल युगातले GenZ

Share

भारताच्या स्वातंत्र्य वेदीवर स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या खुदीराम बोस यांचा आज बलिदान दिवस. देशाच्या स्वातंत्र्यासाठी व या देशाच्या जनतेला स्वतंत्रपणे आणि स्वातंत्र्यात राहता यावं यासाठी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्या महात्म्यांचं जीवनपट उलगडण्याचा, त्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. भारतीयांवर ब्रिटिशांनी फक्त राज्य केलं नाही तर ते राज्य करताना अनन्वित अत्याचार ब्रिटिश करत होते. ब्रिटिश अधिकारी आणि सैनिक भारतीयांना जनावरांसारखी वागणूक देत, राजरोस सगळ्यांच्या समोर मारलं जाई. त्याचा कुठेच न्याय नव्हता, निवाडा नव्हता. कधी गाड्यांना बांधून, तर कधी खांबाला बांधून भारतीयांना जिवानिशी मारले जाई.
या अमानुष दडपशाहीमुळे भारतात, विशेषतः तरुण वर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला. शांततापूर्ण मार्गाने, अर्ज-विनंत्या करून इंग्रजांचे हृदयपरिवर्तन होणार नाही, ही बाब स्पष्ट होती. या परिस्थितीतूनच सशस्त्र क्रांतीचा मार्ग जन्माला आला. “इट का जवाब पत्थर से” देण्याचे ठरवून या मातीत असे नरवीर तयार झाले, ज्यांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून ब्रिटिशांच्या उरात धडकी भरवली.

क्रांतिवीर खुदीराम बोस यांचा जीवनपट

क्रांतिवीर खुदीराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी पश्चिम बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील हबीबपूर या गावी झाला. त्यांच्या घराण्यातील पार्श्वभूमी आणि बालपणातील संघर्ष हा त्यांच्या कणखर व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी करणारा ठरला. खुदीराम यांच्या जन्माआधी त्यांच्या दोन भावंडांचा लहानपणीच मृत्यू झाला होता. त्यामुळे दुःखाच्या सावटाखाली जन्मलेल्या या बालकाला मृत्यूच्या सावलीपासून वाचवण्यासाठी बंगाली परंपरेनुसार तीन मुठी ‘खुद’ (तांदळाचे तुकडे) दिले. म्हणूनच त्यांचे नाव ‘खुदीराम’ असे ठेवण्यात आले. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांच्या आई लक्ष्मीप्रिया देवी यांचे आणि सातव्या वर्षी वडील त्रैलोक्यनाथ बोस यांचे निधन झाले. बंगालमध्ये तमलुक येथे हॅमिल्टन हायस्कूलमध्ये त्यांनी नववीच्या वर्गापर्यंत शिक्षण पूर्ण केले.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी म्हणजे १९०४ मध्ये खुदीराम बोस मिदनापूर येथील क्रांतिकारी चळवळी म्हणजे अनुशीलन समिती आणि पुढे युगांतर या गुप्त क्रांतिकारी संघटनांमध्ये आले. सत्येंद्रनाथ बोस यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशभक्तीचे धडे घेतले, भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि बॉम्ब बनवण्यापासून ते शस्त्रास्त्रे चालवण्यापर्यंतचे प्रशिक्षण घेतले.

१९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय तरुणांमध्ये प्रचंड असंतोष पसरला. ब्रिटीश सरकारने हे आंदोलन चिरडण्यासाठी अमानुष बळाचा वापर सुरू केला. लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांवर लाठीमार केला गेला.
कोलकात्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट डग्लस किंग्सफोर्ड हा देशभक्त तरुणांना चाबकाचे फटके मारणे व कठोर कारावास देणे अशा शिक्षा देत असे. या अन्यायाचा बदला घेण्यासाठी ‘युगांतर’ संघटनेने किंग्सफोर्डला मृत्युदंडाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी खुदीराम बोस (वय १८) आणि प्रफुल्ल चाकी (वय १९) या दोन निर्भय तरुणांवर सोपवण्यात आली.
३० एप्रिल १९०८ रोजी मुझफ्फरपूर येथे युरोपीय क्लबबाहेर अंधारात किंग्सफोर्डची गाडी समजून खुदीराम यांनी बॉम्ब फेकला. मात्र, त्या गाडीत किंग्सफोर्ड नसून बॅरिस्टर प्रिन्गल केनेडी यांच्या पत्नी व मुलगी होत्या; या दुर्घटनेत त्या दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेनंतर खुदीराम यांनी अनवाणी पायांनी सलग २५ मैल (४० किमी) अंतर पार केले. १ मे १९०८ रोजी वैनी रेल्वे स्थानकावर संशयावरून पोलिसांनी त्यांना अटक केली; त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर व काडतुसे सापडली. दुसरीकडे, प्रफुल्ल चाकी यांनी ब्रिटिशांच्या हाती लागण्याऐवजी स्वतःवर गोळी झाडून मातृभूमीसाठी आत्मबलिदान दिले.
मुझफ्फरपूर सत्र न्यायालयात खटल्यात खुदीराम यांनी निडरपणे आपले कृत्य मान्य केले. न्यायाधीशांनी फाशी होईल, असे सूचित केले असता, खुदीराम यांनी “मला वेळ दिला तर मी तुम्हाला बॉम्ब कसा बनवायचा हे शिकवू शकेन” असे उत्तर देऊन सर्वांना स्तब्ध केले. अवघ्या पाच दिवसांच्या सुनावणीनंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
११ ऑगस्ट १९०८ : खुदीराम यांनी हसतमुखाने फाशी घेतली.
११ ऑगस्ट १९०८ च्या पहाटे मुझफ्फरपूर मध्यवर्ती कारागृहात अवघ्या १८ वर्षे, ८ महिने आणि
८ दिवसांच्या खुदीराम यांना फाशी देण्यात आली.

सामाजिक-राजकीय पडसाद आणि लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’तून खुदीराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांच्या धाडसाचे आणि असंतोषाचे विश्लेषण केले. या अग्रलेखात टिळकांनी स्पष्ट केले की, तरुणांनी बॉम्बचा मार्ग स्वीकारणे हे ब्रिटीश सरकारच्या अन्यायी आणि दडपशाहीच्या धोरणांचे फलित आहे.
शासनाने केवळ दडपशाही न करता मूळ अन्यायाचे कारण दूर केले पाहिजे, असा इशारा टिळकांनी दिला. या अग्रलेखांमुळे संतापलेल्या ब्रिटीश सरकारने लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा (Section 124A) खटला भरला आणि त्यांना ६ वर्षांची मंडालेच्या तुरुंगात सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
खुदीराम बोस यांच्या बलिदानाने बंगाली जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवले. बंगालमध्ये विणकरांनी एक विशेष धोती तयार केली, ज्याच्या काठावर ‘खुदीराम’ हे नाव विणलेले असे. बंगाली तरुण ती धोती अभिमानाने नेसत.
बंगाली कवी पीतांबर दास यांनी लिहिलेले लोकगीत “एकबार बिदाय दे मा घुरे आसि” (आई, मला एकदा निरोप दे, मी पुन्हा परत येईन) हे घरोघरी गायले जाऊ लागले. या गीतात खुदीराम म्हणतात की, “मी पुन्हा जन्म घेईन आणि माझ्या गळ्यात फाशीचा डाग पाहून माझी आई मला ओळखेल.”

आजच्या तरुणाईला (Gen Z) संदेश

आजच्या Gen Z (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी) आणि डिजिटल युगाच्या तरुणाईच्या मनात क्रांतिवीर खुदीराम बोस यांच्या बलिदानाचा कोणता विचार ठेवता येईल? आजची पिढी स्वतःचे मानसिक आरोग्य, कम्फर्ट झोन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल जागरूक आहे. ती एका अर्थी चांगली गोष्ट आहे. परंतु, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी हातात ‘भगवद्गीता’ धरून हसतमुखाने फासावर जाणाऱ्या खुदीराम बोस यांचे जीवन आपल्याला शिकवते की, जेव्हा माणसाचे ध्येय स्वतःच्या स्वार्थापेक्षा किंवा वैयक्तिक सुखापेक्षा मोठे असते, तेव्हाच इतिहास घडतो.
आज तरुणांकडे वागण्याचे, विचाराचे स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्यासाठी देशातील लोकांनी अपार कष्ट उचलले आहेत. त्यामागे बलिदानाची अखंड परंपरा आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी देशातल्या एकूण व्यवस्थेचा बळी देण्याचा विचार इथल्या समाजवीरांनी कधी केला नाही.
उलटपक्षी आंदोलन हा भारताच्या मना-मनात उर्जेचा स्रोत निर्माण करते. या आंदोलनाची जबाबदारी घेणं, आंदोलनातील कार्यकर्त्यांना योग्य मार्ग दाखवणं, हे काम चळवळ शिकवते. चळवळीत ‘रोमँटिसिझम’ (Romanticism) काही काळ असतो. त्यातला आक्रोश हा आकर्षणाचा भाग काही काळ असतो. परंतु योग्य मागणी योग्य प्रकारे सरकारकडे सांगणे, लावून धरणे ही जबाबदार आंदोलनाची लक्षणे आहेत.
आज सोशल मीडियाच्या युगात एखाद्या विषयावर हॅशटॅग चालवणे, रील्स बनवणे किंवा प्रोफाईल पिक्चर बदलणे म्हणजेच ‘आंदोलन’ असा समज निर्माण झाला आहे. आंदोलने ही कोणत्याही लोकशाही देशाच्या घडणीत ऊर्जेचा मुख्य स्रोत असतात आणि ती अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे माध्यम असतात. अनेकदा आंदोलनाच्या किंवा स्वातंत्र्यांच्या नावाखाली बेदरकार वागणे, किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे यालाच ‘धाडस’ समजतात.
१९०८ मध्ये खुदीराम बोस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळातील अत्याधुनिक विज्ञान (उदा. रसायनशास्त्र आणि बॉम्ब निर्मिती) राष्ट्रमुक्तीसाठी आत्मसात केले होते. आजच्या Gen Z ने आपल्याकडे असलेल्या Artificial Intelligence (AI), डेटा, कोडिंग आणि सोशल मीडिया यांसारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर देशातील दारिद्र्य, भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केला पाहिजे. आंदोलनातील सनसनाटी सोडून, विचारांची परिपक्वता आणि सामाजिक जबाबदारी स्वीकारून जेव्हा आजचा तरुण देशाच्या प्रगतीत योगदान देईल, तेव्हाच क्रांतिवीरांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारत खऱ्या अर्थाने साकार होईल…

अन्य लेख

संबंधित लेख