Tuesday, August 11, 2026

बंदुकांऐवजी विकासाची कास; शरण नक्षलवाद्यांचे नवजीवन !

Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने गडचिरोली आणि विदर्भात पोलाद उद्योगाचा विस्तार होत आहे. सुरजागड येथील लोहखनिज खाणकाम आणि कोनसरी येथील पेलेट/स्टील प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. स्थानिक संसाधनांचा वापर स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी होत आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि. (LMEL) चे व्यवस्थापकीय संचालक एमडीबी प्रभाकरन यांनी शरण आलेल्या नक्षलवाद्यांना कंपनीमध्ये सामावून घेतलं. या माजी नक्षलवाद्यांशी बोलून त्यांना कायमस्वरूपी काम मिळेल यासाठी आपल्या कंपनीमध्ये तांत्रिक शिक्षण दिले आणि कायमची नोकरी दिली.
विदर्भाच्या पूर्व टोकावरचा गडचिरोली जिल्हा आणि त्याचा जंगलमय भाग एकेकाळी केवळ नक्षली हिंसाचार आणि दहशतीसाठी ओळखला जायचा. दुर्गम भौगोलिक परिस्थिती, शिक्षणाचा अभाव आणि रोजगाराच्या संधींची कमतरता यामुळे इथला अनेक निष्पाप तरुण भरकटला गेला. अवघ्या १०-१२ वर्षांच्या कोवळ्या वयात हातात पुस्तकांऐवजी बंदुका आल्या आणि जंगलातील कष्टाचे, संशयास्पद आयुष्य यांच्या नशिबी आले. परंतु, आज हेच चित्र वेगाने बदलत आहे.
स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा वापर स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी आणि भागाच्या विकासासाठी व्हावा, हे पुनर्वसनाचे मूळ सूत्र आहे. या सूत्राला खऱ्या अर्थाने मूर्त रूप दिले ते ‘लॉयड्स मेटल अँड एनर्जी लि.’ (LMEL) या कंपनीने. कंपनीचे प्रमुख प्रभाकरन यांनी सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण जगासमोर ठेवले आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना केवळ कागदोपत्री मदत न देता, त्यांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
नक्षलवादी चळवळ सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या बहुतांश नक्षलवाद्यांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न असायचा. कोणतेही तांत्रिक शिक्षण किंवा कौशल्य नसल्यामुळे त्यांना केवळ रोजंदारीवर किंवा बांधकाम कंत्राटदारांकडे अकुशल मजूर म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागे. मात्र, बी. प्रभाकरन यांनी या नक्षलवाद्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या इच्छा-आकांक्षा समजून घेतल्या आणि त्यांच्या क्षमतेनुसार तांत्रिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. कंपनीने या सर्वांना मोफत तांत्रिक प्रशिक्षण दिले आणि कौशल्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरीवर सामावून घेतले.
याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, एकेकाळी हिंसेच्या मार्गावर असलेले हात आज क्रेन ऑपरेटर आणि वेल्डर बनून देशाच्या औद्योगिक विकासात हातभार लावत आहेत. रमेश रेणकटवो, मणियम सोनू आतला, करुणा पडार आणि सुरेश यांच्यासारख्या २४ माजी नक्षलवादी आणि त्यांच्या आठ कुटुंबांना आज समाजात सन्मानाचे स्थान मिळाले आहे.
करुणा पडार सोळा वर्षांच्या असताना नक्षल चळवळीत सहभागी झाल्या. मात्र, पाच वर्षांनंतर त्यांनी २०१३ मध्ये पती सुरेश यांच्यासह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन धोरणात त्यांना आर्थिक मदत आणि गडचिरोलीत भूखंडही मिळाला. मात्र, पुढील १० वर्षे अकुशल मजूर म्हणून संघर्ष केल्यानंतर २०२३ मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या आवाहनावरून लॉयड्स मेटल कंपनीने त्यांना दत्तक घेतले. आज करुणा कोनसरी प्रकल्पात ‘वेल्डिंग ट्रेनर’ म्हणून इतर कामगारांना घडवत आहेत, तर सुरेश कुशल क्रेन ऑपरेटर म्हणून आहेत. कंपनीने त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे शेअर्स देऊन त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला बळ दिले आहे.
रमेश कटवोची कहाणीही अशीच. तेराव्या वर्षी चळवळीत गेलेल्या रमेशने १५ वर्षे जंगलात घालवल्यानंतर २०१४ मध्ये आत्मसमर्पण केले. आज तो कोनसरी प्रकल्पात क्रेन ऑपरेटर म्हणून सन्मानाने काम करत आहे. “जंगलातील जीवन बिकट झाले होते, सुरक्षिततेचा धोका होता; परंतु आज हक्काच्या कष्टाचा पैसा मिळतोय आणि जीवन सुरक्षित आहे,” असा अनुभव रमेश सांगतात. अशीच कहाणी सात वर्षे चळवळीत राहिलेल्या राजी कुल्याती आणि तिच्या पतीची आहे. ते आज वेल्डर म्हणून स्थिर जीवन जगत आहेत.
या संपूर्ण परिवर्तनामुळे केवळ एका पिढीचे आयुष्य सावरले नाही, तर त्यांच्या पुढील पिढीचे भविष्यही उज्ज्वल झाले आहे. या सर्वांची पुढील पिढी – त्यांची मुले आज गडचिरोलीत इंग्रजी माध्यमात शिकत आहेत. एकेकाळी जंगलात बंदुकांचा आवाज ऐकणारी ही मुले आज सुरक्षित वातावरणात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
कौशल्य विकास आणि उद्योगांची साथ मिळाली तर पुनर्वसनापलीकडे जाऊन सामाजिक परिवर्तन घडवता येते, हे गडचिरोलीतील या उपक्रमाने सिद्ध केले. पोलीस प्रशासनाची सकारात्मक भूमिका, राज्य सरकारचे प्रोत्साहन आणि लॉयड्स मेटल कंपनीची सामाजिक बांधिलकी यांच्या त्रिवेणी संगमातून गडचिरोलीचा भूतकाळ पुसला जाऊन एक नवा आणि प्रकाशमय वर्तमान घडत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख