Friday, August 21, 2026

पुण्यात १२ वी ब्रिक्स दूरसंचार मंत्र्यांची बैठक; डिजिटल सहकार्य आणि सायबर सुरक्षेवर मंथन

Share

केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली १२ वी ब्रिक्स दूरसंचार मंत्र्यांची बैठक पुण्यात सुरू आहे. माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान (आयसीटी), डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सर्वांना परवडतील अशा डिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यावर विचारविनिमय करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी या बैठकीत एकत्र आले आहेत.

https://www.instagram.com/reel/DcRdgXfT9_9/?utm_source=ig_web_copy_link&igsi=NTc4MTIwNjQ2YQ==

‘आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने भविष्यासाठी नवोन्मेष, सहकार्य आणि परिवर्तन (आयसीटी)’ ही या बैठकीची संकल्पना आहे.

ब्रिक्स देशांमध्ये आणि व्यापक ग्लोबल साउथमध्ये डिजिटल परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी व्यावहारिक सहकार्य वाढवणे आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे यावरही या चर्चेत लक्ष केंद्रित केले जाईल.

भारताच्या २०२६ मधील ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत १२ वी ब्रिक्स दूरसंचार मंत्र्यांची बैठक आज पुण्यात सुरू झाली आहे. या बैठकीची मुख्य संकल्पना ‘Innovate, Cooperate and Transform (ICT) for a Resilient Future’ अशी आहे. डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांच्या माध्यमातून अधिक सुरक्षित व लवचिक डिजिटल व्यवस्था निर्माण करण्यावर बैठकीत भर दिला जाणार आहे.

सायबर सुरक्षा आणि डिजिटल कौशल्यांवर विशेष भर

बैठकीत सायबर सुरक्षा, विश्वासार्ह माहिती व दूरसंचार तंत्रज्ञान, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, पुढील पिढीतील संचार व्यवस्था, डिजिटल कौशल्य विकास आणि क्षमता निर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय होणार आहे. तसेच नवोन्मेष, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावरही चर्चा अपेक्षित आहे.

पुण्यात डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्स्पो

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर २० ऑगस्ट रोजी पुण्यात डिजिटल ब्रिक्स फोरम आणि एक्स्पो आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि संशोधन संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उदयोन्मुख डिजिटल तंत्रज्ञान आणि सक्षम ICT परिसंस्थेतील सहकार्याच्या संधी यावेळी अधोरेखित करण्यात आल्या.

पुण्यात आयोजित या उच्चस्तरीय बैठकीमुळे भारताच्या डिजिटल सामर्थ्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्यासोबतच ब्रिक्स देशांमधील तंत्रज्ञान सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख