Friday, August 21, 2026

दूरसंचार क्षेत्रात भारत-ब्राझील नव्या उंचीवर… पुणे परिषदेत महत्त्वाचा करार

Share

भारत आणि ब्राझीलने दूरसंचार तसेच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान (ICT) क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली आहे. अशी माहिती दूरसंचार विभागाने समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे.

‘ब्रिक्स आयसीटी ट्रॅक’ (BRICS ICT Track) बैठकीदरम्यान  आज पुण्यात हा करार करण्यात आला.

या करारामुळे डिजिटल नवोपक्रमांना चालना मिळेल, डिजिटल पायाभूत सुविधा बळकट होतील आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्याला वाव मिळेल. पुण्यात आयोजित १२ व्या ‘ब्रिक्स’ दूरसंचार विभागाच्या मंत्रीस्तरीय बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे आणि ब्राझीलचे मंत्री फ्रेडरिको डी सिक्वेरा फिल्हो यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे सार्वत्रिक कनेक्टिव्हिटी (universal connectivity), सायबर सुरक्षा, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, क्षमता बांधणी आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची (best practices) देवाणघेवाण या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ होईल. सुरक्षित आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्यासाठी भारत-ब्राझील सहकार्य बळकट करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे शिंदे यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले आहे.

दोन्ही देशांमध्ये सर्वसमावेशक, सुरक्षित आणि लवचिक डिजिटल परिसंस्था (digital ecosystem) विकसित करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.

यामुळे ज्ञान, कौशल्य आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण सुलभ होईल, तसेच संशोधन, नवोपक्रम आणि आधुनिक दळणवळण तंत्रज्ञानाच्या विकासातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. आंतरराष्ट्रीय दूरसंचार आणि तंत्रज्ञान मंचांवर सहकार्य बळकट करण्याच्या महत्त्वावरही भारत आणि ब्राझीलने भर दिला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख