Friday, August 21, 2026

अंतराळ क्षेत्रात भारताची नवी झळाळी… स्टार्टअपसाठी संधी – पंतप्रधानांनी साधला उद्योजकांशी संवाद

Share

अंतराळ क्षेत्रात भारतातील खासगी कंपन्यांच्या वाढत्या क्षमता, जागतिक स्तरावर भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाची वाढती मागणी आणि अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील संधी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला. यावेळी अंतराळ क्षेत्रात भारतातील खासगी कंपन्यांच्या वाढत्या क्षमता, जागतिक स्तरावर भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाची वाढती मागणी आणि अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील संधी यावर चर्चा झाली.

मोदी यांनी अंतराळ उद्योग आणि समाजाच्या विकासाशी संबंधित इतर क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्यावरही भर दिला. त्यांनी सांगितले की, अंतराळातील कचरा हटवण्याच्या तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या कंपन्या पर्यावरणाशी संबंधित संस्थांसोबत मिळून काम करू शकतात. त्याचप्रमाणे, शेतीसाठी अंतराळ तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्या कृषी विद्यापीठे आणि सरकारी विभागांसोबत मिळून शेतकऱ्यांना चांगले निर्णय घेण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात.

पंतप्रधानांनी सांगितले की, भारताने असे वातावरण निर्माण केले पाहिजे की, जेव्हा जग अंतराळ क्षेत्राचा विचार करेल, तेव्हा त्याची नजर भारताकडे वळली पाहिजे. भारताचे अंतराळ क्षेत्र जगभरातील प्रतिभावंत, कंपन्या आणि गुंतवणूक आकर्षित करण्याचे केंद्र बनू शकते, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी अटल टिंकरिंग लॅब्ससोबत अंतराळ क्षेत्रातील कंपन्यांचे सहकार्य वाढवण्याचा सल्ला दिला. पंतप्रधानांनी सांगितले की, यामुळे लहान वयापासूनच मुलांमध्ये अंतराळाविषयी कुतूहल आणि रुची निर्माण होण्यास मदत होईल. या संवादामध्ये स्कायरूट एअरोस्पेस, अग्निकुल कॉसमॉस, पिक्सेल, ध्रुव स्पेस, गॅलेक्सआय, पिअरसाइट, बेलाट्रिक्स एअरोस्पेस, दिगंतरा, सॅटश्युअर, सुहोरा टेक्नॉलॉजीज, मनस्तु स्पेस, एस्ट्रोबेस, टेकमी२स्पेस, व्योमआयसी, कॉसमॉसर्व स्पेस, ऑर्बिटएआयडी एअरोस्पेस, स्कायसर्व (हायस्पेस), सेरेंडिपिटी स्पेस, वासर लॅब्स आणि मिस्टईओ यांचे प्रमुख व संस्थापक सहभागी झाले होते.

अन्य लेख

संबंधित लेख