भुलेश्वरचा राजा म्हणून ओळख असलेल्या गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान गणेशाची मूर्ती आजूबाजूला असलेल्या लोकांवर कोसळली. यात दोघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर रित्या जखमी झाले.
दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरातील जय अंबे चौक मांडल्या कबुतरखान्याजवळ, बालराम मर्चंट रोड येथे २३ ऑगस्ट रोजी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. भायखळ्याहून गणेश आगमनच्या मिरवणुकी दरम्यान २२ फूट उंच मूर्तीचा मागचा लोखंडी धातूचा वेल्डिंग सपोर्ट तुटल्यामुळे संपूर्ण मूर्ती पुढील बाजूने मिरवणुकीतील गर्दीवर कोसळली. या दुर्घटनेत भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष संकेत नवसे (३३) आणि ब्रिजेश हेमंत जोशी (३०) या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला, तर अन्य ५ जणांवर तातडीने उपचार सुरु आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने आणि राज्य शासनाने वेळोवेळी मूर्तींच्या उंचीवर मर्यादा घालण्याबाबत निर्देश दिले आहेत. परंतु, स्थानिक गणेश मंडळे राजकीय चढाओढ आणि परंपरेच्या नावाखाली १५ ते २५ फूट उंचीच्या मूर्ती घडवतात. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे दरवर्षी सुमारे ३,५०० ते ४,००० अर्ज येतात, ज्यापैकी २,५०० ते २,८०० मंडळांना अधिकृत परवानगी दिली जाते.
भुलेश्वरसारख्या जुन्या मुंबईतील भागांमध्ये रस्त्याची रुंदी अत्यंत कमी म्हणजे जवळपास ६ ते १० मीटर असते. त्यातून विजेच्या तारा आणि दुकानांचे फ्लेक्स हे सगळे अडथळे पार करताना श्रीगणेशाच्या मूर्ती अनेकदा इजा पोहोचते. परंतु, स्थानिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यावर असलेला राजकीय वरदहस्त आणि एकूणच दक्षिण मुंबई मध्ये झालेलं श्रीगणेश मंडळांच प्रतिष्ठा पणाला लावण्याची स्पर्धा. यामुळे सार्वजनिक गणेश उत्सवाच्या जागी धनाढ्य गणेश मंडळ आणि भाविकांच्या भावनेला पायदळी तुडवणारे कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते.
गणेश उत्सव काळात अनेक वर्ष मुंबईवर राज्य असलेले राजकीय पक्ष सर्वार्थाने गणेश उत्सव हा समाजाशी संवाद साधणारा उत्सव न राहता राजकीय स्तरावर धन-दांडग्याचा इव्हेंट मॅनेज करणारा उत्सव झाला आहे. स्थानिक भाविकांचा सातत्याने मिळणारा सपोर्ट विसरून मोठी राजकीय ताकद उभी करण्यासाठी म्हणजे निवडणुकीसाठी लोकांचा वापर करण्याची कुरणे हे सध्याच मुंबईतलं वास्तव आहे.
राजकीय पक्ष याचा अनेक प्रकारे यथेच्छ वापर करतात आणि कार्यकर्त्यांना चुकीचे मार्गदर्शन करून उत्सवाचे अपघात घडण्यात रूपांतर होते.
वास्तविक महाराष्ट्र आणि प्रामुख्याने पुणे मुंबईची उत्सव परंपरेचा प्रमुख धागा हा श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करून होते. भारताच्या एकात्मतेला वृद्धिंगत करणारा हा उत्सव महाराष्ट्राच्या जनमानसाच्या मनात एकतेचा भाव निर्माण करतो. त्यामध्ये राजकीय उद्देशाने पेटलेले पक्ष आपल्या राजकीय महत्त्व महत्त्वाकांक्षेने सामाजिक भूमिका विसरून गल्ली बोळातील दादागिरीच वातावरण उभं करतात. आणि देशाच्या फुटीरता वादी शक्तींना खाता पाणी घालतात.
मागील काही वर्षातल्या घटना बघता एकूण सर्व परिस्थिती आपल्या समोर आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर २०२५ ला गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान साकीनाका परिसरात गणेशमूर्तीच्या वरच्या भागाचा संपर्क रस्त्यावरून लटकणाऱ्या हाय-टेंशन विजेच्या तारेसोबत झाला. ३६ वर्षीय बिनू सुकुमारन यांचा विजेचा जोरदार धक्का लागून मृत्यू झाला, तर अन्य ५ भाविक (ज्यात ६ वर्षांच्या बालकाचा समावेश होता) गंभीर भाजले. त्यावर्षी गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात विविध ठिकाणी पाण्यात बुडून किंवा विजेचा धक्का बसून १४ गणेश भक्तांचा मृत्यू झाला.
मागील काही वर्षांपासून लालबाग-परळ भागातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध मंडळांमध्ये उदा. लालबाग, चिंचपोकळी, जीएसबी सामान्य भाविकांना २० ते २४ तास रांगेत उभे राहावे लागते, तर राजकीय नेते, अभिनेते आणि उद्योगपतींना मागच्या दाराने थेट व्हीआयपी दर्शन दिले जाते. भाविकांना अक्षरश: पायदळी तुडवणे, महिलांशी गैरवर्तन करणे यासारखे प्रकार या मंडळातून राजरोस घडतात.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी समाजजागृती, राष्ट्रीय एकात्मता आणि ब्रिटिशविरोधी जनसंघटना या पवित्र उद्देशाने केली होती. परंतु, गेल्या काही दशकांत मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप सामाजिक एकात्मतेकडून व्यावसायिक प्रदर्शन, राजकीय वर्चस्ववाद, आणि इव्हेंट मॅनेजमेंटकडे झुकल्याचे दिसते.
भुलेश्वर येथील ‘भुलेश्वरचा राजा’ या २२ फूट उंच गणेशमूर्तीचे वेल्डिंग तुटून घडलेली दुर्घटना ही केवळ तांत्रिक चूक नसून, सण-उत्सवांचे झालेले व्यापारीकरण, उंचीची चुकीची स्पर्धा आणि स्थानिक राजकीय वरदहस्त या सामाजिक-राजकीय विकृतीचे फलित आहे.