नौदलाला नवी ताकद
भारतीय नौदलाच्या सागरी आणि खोल समुद्रातील युध्दसज्ज कार्यक्षमतेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि बांधण्यात आलेले दुसरे Diving Support Vessel (DSV) ‘INS निपुण’ मुंबईतील नौदल गोदीत भारतीय नौदलात औपचारिकपणे दाखल करण्यात आले. नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला.
‘INS निपुण’ हे खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील मोहिमा आणि पाणबुडी बचाव कार्यासाठी विशेष क्षमतेचे जहाज आहे. या जहाजामुळे भारतीय नौदलाची अंडरवॉटर ऑपरेशन्स आणि डीप-सी रेस्क्यू क्षमता अधिक मजबूत होणार आहे.
सागरी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
लढाऊ सज्जता ही भारतीय नौदलाची सर्वोच्च जबाबदारी आणि प्राथमिकता असल्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. ‘निपुण’च्या समावेशामुळे केवळ औपचारिकदृष्ट्या नव्हे, तर देशाची सुरक्षा आणि सागरी हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सक्षम परिचालन व लढाऊ क्षमतेचा आढावा घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक स्तरावरील परिस्थिती सध्याचे सागरी वातावरण अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे. या पार्शेवभूमीवर बदलत्या स्वरूपातील सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नौदलाची सज्जता सातत्याने मजबूत करण्याची गरज आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना
‘INS निपुण’ची निर्मिती हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने केली असून, जहाजात मोठ्या प्रमाणावर स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या जहाजामुळे विशेष सागरी मोहिमा, पाण्याखालील हस्तक्षेप आणि बचावकार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत होणार आहे.
‘INS निपुण’च्या समावेशामुळे भारताची सागरी सुरक्षा अधिक भक्कम होण्यासोबतच स्वदेशी जहाजबांधणी आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेलाही नवी चालना मिळणार आहे.