आज गणेशचतुर्थी आहे. कालच म्हणजे १३ सप्टेंबर, २०२६ रोजी मुंबईतल्या ऐतिहासिक अशा एशियाटिक सोसायटीमध्ये एका नव्या क्रियाशील ज्ञानपर्वाचा श्रीगणेशा झाला आहे. ही सुरुवात केवळ म्हणजे केवळ औपचारिक समारंभ न राहता भारतातील एका नव्या, मोकळ्या, समतोल, समन्यायी आणि भविष्यवेधी पण परंपरेतील उन्नत मूल्यांमध्ये खोलवर डूब दिलेल्या ज्ञानपर्वाचा आरंभ ठरायला हवा. भारताची ओळख अनेक हजार वर्षांची असली तरी आजही भारत आपली प्राचीन मूल्ये आणि आधुनिक आव्हाने यांची सुयोग्य सांगड घालून ‘इदं शस्त्रं, इदं शास्त्रम्’ असे म्हणत जगापुढे ठाम उभा राहण्याची प्रक्रिया चालू आहे. भारतीयत्वाचा असा बौद्धिक, वैचारिक, सांस्कृतिक आणि ज्ञानसाध्य नवजागर घडविण्याची जबाबदारी असणारी एक महत्त्वाची संस्था म्हणजे एशियाटिक सोसायटी. तिथे केंद्रीय गृहमंत्र्यांनी येणे आणि पूर्णपणे अराजकीय पण भारताच्या आत्म्याची ओळख सांगणारे व्याख्यान देणे, ही फार मोलाची बाब झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ची भेट आणि तिथे त्यांनी केलेले भाष्य रूढ अर्थाने राजकीय तर नव्हतेच पण केवळ औपचारिक सोपस्कारही नव्हते. मुंबईच्या सांस्कृतिक आणि वैचारिक जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूमध्ये उभे राहून त्यांनी मांडलेले विचार हे राजकारणापलीकडचे, भारतीय ज्ञानसंपदेचे जागतिक महत्त्व अधोरेखित करणारे होते. ” इथे येण्यातली माझी भूमिका एका मंत्र्याची नसून, हजारो वर्षांची भारतीय ज्ञानपरंपरेचा आदर करणाऱ्या एका साधकाची आहे,” हे त्यांचे वाक्य एशियाटिक सोसायटीसारख्या संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधोरेखित करणारी आहे. सत्ता ही केवळ प्रशासन चालवण्यासाठी नसून ती देशाची संस्कृती, परंपरा आणि ज्ञानाचे जतन करण्याचे माध्यम असली पाहिजे, हा व्यापक विचारही यातून प्रतिबिंबित होत होता.

कालातीत मूल्यांचा जागर
कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत सांस्कृतिक मूल्यांचे आणि स्मृतींचे स्थान अनन्य असते. जो देश आपला इतिहास, भाषा, संस्कार आणि प्राचीन अभिलेख जपून ठेवत नाही, तो कितीही शक्तिशाली असला तरी काळाच्या ओघात टिकू शकत नाही. याउलट, जो देश आपल्या ज्ञानाचा वारसा प्राणपणाने सांभाळतो, त्याला शतकांच्या पारतंत्र्यानंतरही कुणी कायमचे गुलाम बनवू शकत नाही. परकीय आक्रमकांनी भूतकाळात नालंदा विद्यापीठाचे ग्रंथालय जाळले असेल, पण भारतीयांच्या मनातील ज्ञानलालसा ते कधीही नष्ट करू शकले नाहीत, या शाह यांच्या प्रतिपादनात भारताच्या स्वयंभू ज्ञानपरंपरेचा रास्त अभिमान होता. आणि तो योग्यच आहे. भारताने जशी आणि जितकी चौफर ज्ञानसाधना करून आपली संस्कृती हजारो वर्षे प्रवाहित ठेवली, तसे जगात क्वचितच झाले आहे.
एशियाटिक सोसायटीचा वारसा समजून घेण्यासाठी थोडा मागोवा घेणे इष्ट ठरेल. अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला, ब्रिटिशांनी इथल्या समाजाचा आणि परंपरेचा पद्धतशीर अभ्यास सुरू केला. १८०४ मध्ये जेम्स मॅकिंटॉश या ज्ञानप्रेमी इंग्रज सरन्यायाधीशाने ‘लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे’ची स्थापना केली, जी पुढे ‘एशियाटिक सोसायटी’ बनली. ग्रीक वास्तुशैलीतील पार्थेनॉनसारखे आठ भव्य खांब असलेल्या ‘टाऊन हॉल’च्या ऐतिहासिक वास्तूत ही संस्था उभी राहिली. सुरुवातीला केवळ ब्रिटिश अधिकाऱ्यांपुरती मर्यादित असलेल्या या ज्ञानसभेत, सन १८४० नंतर भारतीयांना प्रवेश मिळाला. माणेकजी करसेटजी, जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट आणि डॉ. भाऊ दाजी लाड यांसारख्या द्रष्ट्या भारतीयांनी इथे पाऊल ठेवले. पुढे न्या. काशिनाथ त्र्यंबक तेलंग हे या संस्थेचे पहिले भारतीय अध्यक्ष ठरले. या वास्तूने सन १८५७ च्या विद्यापीठ स्थापनेपासून ते अनेक वैचारिक स्थित्यंतरे पाहिली, पण तिचा मूळ गाभा नेहमीच संशोधनाचा राहिला.
इंग्रजांनी हे ज्ञान-संशोधन सक्षमीकरण केले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश आपले वर्चस्व स्थापन करून राजवट मजबूत करणे हाच होता. त्यांनी इथल्या शास्त्रांचा अभ्यास केवळ ज्ञानलालसेपोटी केला नाही, तर भारतीयांवर दीर्घकाळ राज्य करता यावे आणि त्यांच्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण व्हावा, या सुप्त हेतूने केला. कर्नल जोसेफ बोडेन याच्या संपत्तीतून ऑक्सफर्डमध्ये सुरू झालेली ‘बोडेन चेअर’ आणि त्यामागील ‘संस्कृत शिकून ख्रिश्चन धर्मग्रंथांचे भाषांतर व धर्मांतराचा’ हेतू हा याच धोरणाचा भाग होता. म्हणूनच, वसाहतवादाच्या विरोधात आज नव्याने वैचारिक काम उभे करण्याची गरज आहे. ‘डी-कॉलोनायझेशन’ म्हणजे केवळ जुना इतिहास पुसून टाकणे नव्हे, तर आपला इतिहास भारतीय दृष्टिकोनातून जगासमोर पुन्हा ठामपणे मांडणे होय, हे सूत्र आता प्रमाण मानायला हवे. रविवारच्या एशियाटिकमधील समारंभाचा सारा हेतू हाच होता. इतिहासाकडे निर्लेपपणे पाहणे आणि त्याचवेळी चिरंजीव मूल्यांचा कालोचित आविष्कार घडविणे आणि बहुविध ज्ञानशाखांमधील ज्ञानसाधनेचे मार्ग प्रशस्त करत जाणे, हे एशियाटिकसारख्या ज्ञानमंदिरांचे कार्य असते. त्याची उजळणी रविवारी पुन:पुन्हा झाली. ती सुखावणारी होती.
विश्वकल्याणाचे स्वप्न
भारतीय ज्ञानपरंपरेचा मुख्य उद्देश नेहमीच ‘विश्वकल्याण’ हा राहिला आहे. याच ज्ञानोपासनेचे एक उत्तुंग उदाहरण म्हणजे महामहोपाध्याय, भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांचे योगदान होय. अमित शाह यांनी डॉ. काणे यांच्या अफाट संशोधनाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. डॉ. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ (History of Dharmasastra) या ग्रंथातून भारतीय समाजव्यवस्था, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा जो अमूल्य खजिना गोळा केला आहे, तो केवळ एक ग्रंथ नसून एका प्रदीर्घ परंपरेचा ज्ञानकोश आहे. त्यांचे हे समग्र लेखन आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी सहज उपलब्ध व्हायला हवे. ‘समग्र काणे’ प्रकाशित करण्याचे अमित शाह यांचे आवाहन या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. जो विचार वसाहतवादी नव्हता, तर एकात्मिक होता, तो डॉ. काणे यांनी अधोरेखित केला आहे. म्हणूनच तो नव्या पिढीला उपलब्ध झाला पाहिजे. अशा विपुल साहित्याच्या स्पर्शानेच वैचारिकदृष्ट्या समृद्ध आणि आत्मविश्वासू नवी पिढी घडेल.
अशा या प्रदीर्घ इतिहास असलेल्या संस्थेमध्ये आता खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ‘एशियाटिक टुमारो’ पॅनलने मिळवलेला विजय हा केवळ एका गटाचा विजय नव्हता. तो एका विधायक आणि सर्वसमावेशक विचारधारेचा विजय होता. डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलने अहंकार आणि विशिष्ट विचारसरणीच्या मक्तेदारीला बाजूला सारून संस्थेच्या व्यापक हिताला केंद्रस्थानी ठेवले होते. एशियाटिकमधील या स्थित्यंतराची नोंद गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या साऱ्यांनीच घेतली. किंबहुना, गृहमंत्र्यांनी एशियाटिकमध्ये येणे, हीच या नव्या बदलाची एक मोठी खूण होती. त्यामुळेच, स्वत: गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सहकार्याचा जो शब्द दिला; तो प्रत्यक्षात आला तर एशियाटिक सोसायटी ही केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे बौद्धिक आणि वैचारिक नेतृत्व करू शकेल. तिच्या वारशात तितकी ताकद आहे.
परंपरा आणि नवता
दोनशे बावीस वर्षांची परंपरा असलेल्या या ज्ञानसंस्थेला आता नव्या काळाशी जोडण्याची अभूतपूर्व संधी प्राप्त झाली आहे. केवल किंवा उपयोजित ज्ञानावर कोणाची मक्तेदारी असू शकत नाही; ते मुक्त आणि प्रवाही असावे लागते. एशियाटिक सोसायटीमध्ये असलेल्या दुर्मिळ ग्रंथांचा, ज्ञानसंपदेचा उपयोग आता नव्या भारताच्या उभारणीसाठी व्हायला हवा. संशोधकांना प्रोत्साहन देणे, दुर्मिळ हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करून ती इतर ग्रंथालयांशी जोडणे आणि एक सामायिक राष्ट्रीय ज्ञान व्यासपीठ तयार करणे, ही त्रि-सूत्री आता अंमलात आणावी लागेल. केंद्र सरकारच्या ‘ज्ञान भारतम पांडुलिपि मिशन’च्या माध्यमातून गावोगावी विखुरलेली हस्तलिखिते संकलित करून त्यांचे जतन करणे ही काळाची गरज आहे.
भविष्यात एशियाटिक सोसायटी केवळ दक्षिण मुंबईपुरती मर्यादित न राहता, तिची दारे सर्वसामान्य अभ्यासक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी उघडी असली पाहिजेत. या वास्तूच्या भव्य पायऱ्या केवळ पर्यटकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’ राहता कामा नयेत, तर त्या आतल्या अथांग ज्ञानसागराकडे खुणावणाऱ्या प्रेरणादायी वाटा ठरल्या पाहिजेत. ज्ञानाची उपासना हेच आपले परमपवित्र आणि सर्वोच्च मूल्य असायला हवे. राष्ट्रीय विचारांचे आणि जागतिक बदलाचा वेध घेण्याची क्षमता कारभारी आता तिथे आहेत. हे सर्वजण केवळ पदाची प्रतिष्ठा मिरवणारे नसून, कार्यकर्ता मानसिकतेतून संस्थेचे पुनरुत्थान करण्यासाठी सज्ज असलेले लोक आहेत. गृहमंत्र्यांनी पुढे केलेला सहकार्याचा हात हातात घेऊन आता या संस्थेने कात टाकायला हवी. तिथे सळसळते बौद्धिक चैतन्य आणि नवनवीन उपक्रम सतत दिसायला हवेत. आपली ज्ञानोपासना ही केवळ वर्चस्वासाठी नसून ती जगाच्या कल्याणासाठी आहे, हा विचार घेऊनच ‘एशियाटिक सोसायटी’ची उद्याची वाटचाल करावी लागेल. ज्ञान या सर्वोच्च मूल्याचे अभिरक्षण करणारी आणि सर्वांसाठी स्वागतशील असणारी एक नवी, ऊर्जावान संस्था म्हणून ती लवकरच नावारूपाला येईल, हा विश्वास नक्कीच वाटतो. वसाहतवादी मानसिकतेकडून खऱ्याखुऱ्या भारतीयत्वाकडे सुरू झालेला हा प्रवास एका नव्या ज्ञानपर्वाची नांदी आहे. रविवारच्या समारंभाची ती श्रीशिल्लक आणि तोच एका नव्या वाटचालीचा श्रीगणेशाही आहे!