गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली १२ दिवसांची दारूबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाच्या तर्कसंगततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रशासनाला तीव्र शब्दांत फटकारल्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दारूबंदीचा कालावधी कमी केला. आता गणेश चतुर्थीच्या दिवशी १४ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी २५ सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस मद्यविक्री व सेवनावर निर्बंध राहणार आहेत.
गणेशोत्सवात सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कारणास्तव पुणे जिल्हा प्रशासनाने १४ ते २६ सप्टेंबर मद्यविक्रीवर सरसकट बंदी घातली होती. या निर्णयाला हॉटेल मालक तसेच वाईन शॉप चालकांच्या संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
‘केवळ पुण्यालाच का?’, असा सवाल न्यायालयाने प्रशासनाला केला. गणेशोत्सवाच्या काळात मद्यविक्रीवर इतक्या मोठ्या कालावधीसाठी बंदी घालण्यामागे नेमका तर्क काय, अशी विचारणाही खंडपीठाने केली. मुंबई किंवा राज्यातील इतर भागांमध्ये अशी बंदी नसताना केवळ पुणे जिल्ह्याची निवड का करण्यात आली, याबाबतही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. अशा आदेशामुळे पुणे आणि पुणेकरांची प्रतिमा मलिन होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मद्यपान करणारी प्रत्येक व्यक्ती उत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, असे गृहीत धरता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. नियमित मद्यसेवन करणाऱ्या व्यक्तींना अचानक मद्य उपलब्ध न झाल्यास आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढू शकतो, अशी टिप्पणीही करण्यात आली.
– मैत्रेयी जोशी