Friday, September 25, 2026

गणपती तुझे नाव चांगले – सिंदूरवदन

Share

प्रस्तावना

यंदाच्या वर्षी येणाऱ्या या अनोख्या १२ दिवसीय गणेशोत्सवानिमित्तर १२ दिवस रोज एकेक नाव आणि त्यामागील रोचक कथा आपण  ‘गणपती तुझे नाव चांगले’ या नाम मालेत पाहणार आहोत. आज गणरायाच्या बलवान अशा ‘सिंदूरवदन’ या रूपाचे आणि नामाचे चिंतन करूया.

‘सिंदूरवदन’ हा दोन शब्दांपासून तयार झाला आहे. ‘सिंदूर’ म्हणजे शेंदूर किंवा तांबडा रंग आणि ‘वदन’ म्हणजे मुख किंवा चेहरा; ज्याचे मुख आणि संपूर्ण देह सिंदूराच्या रक्ताभ, तेजस्वी प्रभेने न्हाऊन निघालेला आहे, तो ‘सिंदूरवदन’. या नावामागची कथा देखील तितकीच रोचक आहे.

गणेश पुराणातील कथा

सृष्टीच्या आरंभी एकदा ब्रह्मदेव एकांतामध्ये सृजनकर्माचा विचार करत असताना त्यांना अचानक एक जांभई आली. त्या जांभईतून आणि ब्रह्मदेवांच्या मुखातील तेजातून एका अत्यंत अक्राळविक्राळ, धगधगत्या ज्वालेसारख्या लाल वर्णाच्या बालकाचा जन्म झाला. जन्मतःच त्याचा देह रक्तासारखा लाल-शेंदूरी असल्याने ब्रह्मदेवांनी त्याचे नाव ‘सिंदूर’ असे ठेवले.

सिंदूराने तरुण वयात पदार्पण करताच ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याच्या उग्र तपावर प्रसन्न होऊन ब्रह्मदेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले. सिंदूराने अमरत्वाचा आणि अजेयतेचा वर मागितला—”मला देव, दानव, यक्ष, गंधर्व अथवा कोणत्याही शस्त्राने मृत्यू येऊ नये.” वरदान प्राप्त होताच त्याच्यातील असुरी वृत्ती जागी झाली. तो मदांध बनला. त्याने सर्वप्रथम सूर्याला गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला, स्वर्गावर आक्रमण करून इंद्रासह सर्व देवांना हुसकावून लावले आणि पृथ्वीवरील ऋषीमुनींचे आश्रम उद्ध्वस्त केले. तो निरापराध बालकांना व संतांना बंदी बनवून क्रूरतेची परिसीमा गाठू लागला. त्याचे अत्याचार एवढे वाढले की त्रैलोक्यात केवळ हाहाकार माजला.

द्वापारयुगात जेव्हा अधर्म शिगेला पोहोचला, तेव्हा महर्षी कश्यप आणि माता अदिती यांच्या उदरी साक्षात परब्रह्माने ‘गजानन’ रूपात अवतार घेतला.

सिंदूरासुराला जेव्हा समजले की एका बालकाने त्याला विरोध करण्याचे धाडस केले आहे, तेव्हा तो प्रचंड गर्वाने गजाननाला युद्धाचे आव्हान देण्यासाठी धावून आला. दोघांमध्ये घनघोर युद्ध पेटले. सिंदूरासुराने मायावी शक्तींचा वापर करून पर्वतांची वृष्टी केली, अग्नीचे बाण सोडले; परंतु बाल गजाननाने आपल्या लीलांनी त्याचे सर्व वार निष्फळ ठरवले. शेवटी गणपतीने आपले विराट, ब्रह्मांडव्यापी रूप धारण केले. त्यांनी सिंदूरासुराला दोन्ही हातांनी उचलून धरले आणि जमिनीवर आदळून आपल्या हातांनी त्याचे वक्षस्थळ चिरून त्याचे मर्दन केले.

असुराचा अंत होताच त्याच्या देहातून लालभडक सिंदूराची (रक्ताभ तेजाची) धारा वाहू लागली. गजाननाने तो संपूर्ण सिंदूर दोन्ही हातांनी घेऊन आपल्या मुखावर आणि संपूर्ण अंगावर फासला. त्या रक्ताभ सिंदूराच्या लेपामुळे गणरायाचे रूप अथांग तेजाने तळपू लागले. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि सर्व देवांनी हात जोडून गजाननाला वंदन केले—”हे सिंदूरवदना! हे सिंदूरप्रिया! तुझा विजय असो!” ज्याकरिता गणेश पुराणात एक श्लोक आलेला आहे-

ततः सिन्दूरवदनः सिन्दूरप्रिय एव च ।

अभवज्जगतिख्यातो भक्तकामप्रपूरकः ॥

अर्थात, त्या क्षणापासून भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे विघ्नहर्ता गणेश संपूर्ण जगतामध्ये ‘सिन्दूरवदन’ (ज्याचे मुख शेंदूराने विभूषित आहे असा) आणि ‘सिन्दूरवदन’ या मंगल नावांनी विख्यात झाले.

तेव्हा भक्तांच्या कल्याणासाठी गणरायाने वचन दिले:

“जो कोणी संकटग्रस्त जीव मला अत्यंत भक्तीभावाने तांबडा शेंदूर अर्पण करेल, त्याचे ग्रहदोष, भीती आणि संकटे मी तात्काळ भस्मसात करीन.” तेव्हापासून गणपतीच्या मूर्तीला शेंदूर लेपण्याची आणि वाहण्याची मंगल परंपरा सुरू झाली.

‘सिंदूरवदन’ या नामाचा तात्विक अर्थ

गणेश पुराणातील ही कथा केवळ एका दैत्याच्या वधापुरती मर्यादित नाही; त्यामागे गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान दडलेले आहे- सिंदूरासुर हे मनुष्याच्या मनातील आळस, मद, उन्मत्त अहंकार आणि क्रोधाचे प्रतीक आहे. जांभईतून त्याचा जन्म झाला, म्हणजेच आळस आणि अज्ञानातून अहंकाराची उत्पत्ती होते. गणपतीने त्याचे मर्दन केले, याचा अर्थ विवेक आणि बुद्धीच्या बळावर अंतःकरणातील विकारांचा नायनाट करणे होय.

असुराचा वध केल्यावर गणेशाने सिंदूर स्वतःवर धारण केला. हे दर्शवते की परब्रह्म वाईटाचा केवळ विनाश करत नाही, तर त्यातील सुप्त शक्तीला शुद्ध करून स्वतःमध्ये सामावून घेते. नकारात्मकतेला भस्म करून तिला सकारात्मक ऊर्जेत बदलण्याचे सामर्थ्य गणपतीमध्ये आहे.

सिन्दूरवदनाय नमः|

सिंदूराचा लाल रंग हा मूलाधार चक्राचा, उगवत्या सूर्याचा आणि सळसळत्या प्राणशक्तीचा रंग आहे. ‘सिंदूरवदन’ हे रूप साधकाच्या आळसाला आणि तमोगुणाला नष्ट करून त्याच्यामध्ये नवी उमेद, तेज आणि उत्साह निर्माण करते. पूजेमध्ये गणेशाला शेंदूर वाहणे म्हणजे केवळ एक उपचार नाही, तर आपल्या मनातील राग, लोभ आणि अपवित्र विचार गणरायाच्या चरणी सोपवणे आहे. भक्त जेव्हा गणेशाच्या सिंदूरवदनाचे ध्यान करतो, तेव्हा त्याचे चित्त सर्व विकारांतून मुक्त होऊन निरामय शांतीचा अनुभव घेते.

अन्य लेख

संबंधित लेख