प्रिय हमीद भाई,
आज २९ सप्टेंबर २०२६. तू असतास, तर तुझा ९४ वा जन्मदिवस असता.
भारतातला मुसलमान कसा असावा, असा प्रश्न कोणी विचारला, तर जी दोन-चार मोजकी नावे ओठांवर येतात, त्यात तुझं नाव सगळ्यात आधी येतं.
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरजोळी गावात १९३२ साली दलवाई आडनावाच्या एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात तुझा जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तुझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. तरीही इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांचा तुझा अभ्यास दांडगा होता.
१९६० च्या दशकात तू मुस्लिम समाजातील तीन तलाक आणि बहुपत्नीत्व या प्रथांविरोधात ऐतिहासिक आंदोलन पुकारलेस. तू काळाच्या कितीतरी पुढे होतास.

१८ एप्रिल १९६६ रोजी तू मुंबईत मुस्लिम महिलांचा पहिला ऐतिहासिक मोर्चा काढलास आणि त्यातून समान नागरी कायद्याची मागणी केलीस. या मोर्चात केवळ सात मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या; पण तू हार मानली नाहीस.
तुझं पुरोगामित्व साचेबंद नव्हतं. तुझ्या समाजवादी साथीदारांना ते पचणार नव्हतंच, पण रुचणारंही नव्हतं. कारण तू त्यांच्यासारखा केवळ विचारवंत नव्हतास, तर एक कृतीशील कार्यकर्ता होतास.
मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देण्यासाठी आणि समाजप्रबोधनासाठी तू ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ आणि ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ (भारतीय धर्मनिरपेक्ष समाज) या संस्थांची स्थापना केलीस. तरीही तू एकटाच पडला होतास. ना तुझ्या समाजवादी साथीदारांनी तुला मनापासून साथ दिली, ना मुस्लिम समाज तुझ्या पाठीशी म्हणावा तसा उभा राहिला.
तुझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे तू नास्तिक होतास. त्यामुळे तू कायमच “आपण मुसलमान नाही” हे सांगत राहिलास. तात्त्विकदृष्ट्या तुझी भूमिका अगदी बरोबर होती; परंतु व्यावहारिकदृष्ट्या, “होय, मी मुसलमान आहे,” एवढेच तू म्हणाला असतास, तर मुस्लिम समाजाने तू काय सांगतोस, हे किमान ऐकून तरी घेतले असते.
पण तू होतास एक ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’! ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा बाणा दाखवताना खरं तर तुझी चळवळ मोडकळीला आली.
मुल्ला-मौलवींनी तर तुला हिंदूंचा हस्तक, किंबहुना हिंदूच ठरवले होते.

‘इंधन’ ही कादंबरी मराठी साहित्यातील मैलाचा दगड मानली जाते. भारताच्या फाळणीनंतरच्या साधारण दोन दशकांचा काळ, फाळणीच्या जखमा आणि त्यातून निर्माण झालेला छुपा अविश्वास, यांमुळे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांमध्ये अंतर्गत धुसफूस आणि जातीय तणाव कसा वाढत जातो, याचे अत्यंत जिवंत चित्रण तू या कादंबरीत केले आहेस.
क्षुल्लक कारणांवरून दोन समाजांमधील अहंकाराची लढाई कशी पेटू शकते, हे दाखवताना सामाजिक विषमता, धार्मिक कट्टरता आणि परस्परांविषयीचा अविश्वास यांची सुप्त ‘इंधने’ कशी स्फोटक ठरू शकतात, यावर तू नेमकेपणाने बोट ठेवले आहेस. मुस्लिम समाजातील धार्मिक सुधारणांची गरज आणि मानवी मूल्यांचा शोध, हा तुझ्या या कादंबरीचा मुख्य गाभा आहे.
मराठी मुस्लिम समाजातील वास्तव, तिथले कौटुंबिक आणि सामाजिक जीवन, तसेच तिथल्या माणसांच्या भावभावनांचे दाहक चित्रण यांवर आधारलेला तुझा ‘लाट’ हा १३ कथांचा संग्रहही कमालीचा गाजला.
त्याचबरोबर, ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ (Muslim Politics in India) हा तुझा ग्रंथ भारतातील मुस्लिम राजकारणाचे अत्यंत चोख आणि मार्मिक विश्लेषण करतो. तसेच, ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे तुझे वैचारिक धन समजून घेतल्याशिवाय तुला समजून घेणे अशक्य आहे.
हमीद भाई, आज तू हवा होतास रे!
बघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने कायद्याने तीन तलाक बंद केला आहे. तू मागत असलेला समान नागरी कायदा आणण्याची तयारीही मोदी सरकार करत आहे. आज तू असतास, तर आनंदाने नाचला असतास. दिवाळी साजरी केली असतीस!
पण नियतीला हे मंजूर नव्हते. मूत्रपिंडाच्या विकाराने तुझा बळी घेतला. वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी तुझ्या संघर्षाची इतिश्री झाली.
तुझ्या इच्छेनुसार मुंबईतील चंदनवाडी येथील विद्युत दाहिनीत तुझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र, तुझ्या विवेकवादी विचारसरणीमुळे मुल्ला-मौलवी तुझ्या हिंदू असण्याचे आरोप करत राहिले. मुस्लिम समाजानेही त्यांचे आरोप खरे मानले आणि तुझी मुस्लिम सत्यशोधक चळवळ तुझ्या चितेवरच जळून राख झाली.
इतिहासात ‘जर-तर’ला काडीची किंमत नसते, हे माहीत आहे. तरीही कधी कधी मनात येतं, हमीद भाई, तू हवा होतास!
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुला भारताचा राजदूत म्हणून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये नक्कीच पाठवलं असतं. तिथे भारताची बाजू मांडताना तू त्या जिहाद्यांना ज्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं असतंस, ते पाहून त्यांची बोलतीच बंद झाली असती. एका भारतीय मुसलमान राजदूताने आपल्या देशाची बाजू इतक्या पोटतिडकीने मांडलेली पाहून ते पार कोलमडले असते.
आणि तुझ्याकडे अभिमानाने पाहत आम्ही गीत म्हटले असते,
आम्ही पुत्र अमृताचे, आम्ही पुत्र या धरेचे, उजळुनी आज दावू भवितव्य मातृभूचे…
हमीद भाई, खरंच, आज तू हवा होतास रे!