आजपासून प्रस्तावित असलेला देशभरातील बँकांचा तीन दिवसांचा देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इंडियन बँक्स असोसिएशनसोबत काल झालेल्या करारानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात संपाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं AIBEA ने समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, आजपासून म्हणजे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने या संपाची घोषणा केली होती. मात्र, आज रात्री उशीरा बँक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत उद्यापासून होणारा तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा
संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार मुख्य श्रम आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही.
एआयबीओसीचे महासचिव रुपम रॉय यांनी सरकार आणि व्यवस्थापनाच्या धोरणामुळं यूनियनला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पडलं, असे म्हटले आहे. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. असे एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी नमूद केले आहे.
वित्त मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असा आग्रह केला आहे. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचे आवाहन या संघटनांना करण्यात आले आहे. पीएलआय योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागे घेतली असल्याचे देखील वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.