महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सवाच्या मंगल पर्वाची आज सांगता होत आहे. दहा दिवसांच्या घरगुती बाप्पांचं आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचं आज विसर्जनही होत आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासनही सज्ज झालं आहे. पुणे शहरातल्या चार प्रमुख मार्गांवरून 368 गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. सुरक्षिततेसाठी दहा हजारांहून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. तर सुमारे साडे तीन हजार सीसीटीव्ही कॅमेरे गर्दीवर नजर ठेवणार आहेत.
पुण्यातल्या ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या सांगता पर्वाला सुरुवात झाली आहे. शहरातला पहिला मानाचा कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. तर देशातला पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीही विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी मार्गस्थ होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पोहोचल्या आहेत.
गर्दीचे व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुविधेसाठी पुण्यातील गणेशोत्सवाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी विशेष ऑनलाइन सुविधा! वाहतूक आणि मिरवणुकीच्या मार्गांविषयीची अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी मोबाईलवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
पुण्यात सार्वजनिक गणेशांबरोबरच घरच्या गणपतींचेही विसर्जन होणार आहे. गणेशाच्या पर्यावरण पूरक विसर्जनासाठी, पालिकेने 35 घाट, 69 कृत्रिम हौद आणि 648 लोखंडी टाक्यांची व्यवस्था केली आहे. 274 ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी कलश-कंटेनर आणि 241 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली आहेत.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात मद्यविक्री बंद राहणार आहे. हा दिवस ड्राय डे घोषित कऱण्यात आला आहे. विक्री बंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विसर्जन मिरवणुकीचे प्रमुख मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष पथके तैनात केली आहेत.