Saturday, October 24, 2026

फ्लायदुबईची आभाळातली लढाई: एका भारतीय वैमानिकाचे धाडस आणि इस्लामिक कट्टरतावादाचा भयावह चेहरा

Share

तीस सप्टेंबर २०२६ रोजी दुबईहून तेल अवीवच्या दिशेने निघालेल्या फ्लायदुबईच्या एफझेड १०७३ या विमानात घडलेली घटना ही केवळ दोन वैमानिकांच्या झटापटीची कहाणी नाही. ती आधुनिक युगातील सर्वांत भयावह नरसंहारात उतरू न शकलेली कट्टरतावादाची थेट धमकी आहे. सुरुवातीचा काही काळ अनेक डाव्या माध्यमांनी रशियन आणि युक्रेनियन वैमानिकांचे भांडण, वैमानिकांनी हातापायी वगैरे शब्दप्रयोग करून ही भयंकर घटना दाबून टाकायचा वारेमाप प्रयत्न केला.परंतु भारतीय, इस्राएली आणि इतर अनेक देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी लगोलग दखल घेऊन या प्रकरणाचा छडा लावायला, खरी कहाणी जगासोमोर मांडायला सुरुवात केली.  

सहवैमानिक हमम अल-हम्मामीने कॉकपिटमध्ये कुऱ्हाडीने भारतीय कप्तान स्मित माच्छहर यांच्यावर क्रूर हल्ला चढवला आणि विमान इस्रायलच्या भूमीवर अथवा अन्य कोणत्याही लक्ष्यस्थानी आदळवून शेकडो निष्पाप जीवांना हवेत उडवून देण्याचा प्रयत्न केला. अवघ्या एकोणतीस सेकंदांत विमान तीस हजार फुटांवरून सतरा हजार फुटांवर कोसळले. ३०हजार फुटांवर हेलकावे खाणारे विमान, कॉकपिटमधील रक्ताच्या चिळकांड्या, शरीरावर जागोजागी झालेल्या जखमा, ध्यानीमनी नसताना अचानक हल्ला करून ठार मारायच्या उद्देशाने सपासप वार करणारा सहवैमानिक अश्या भयानक परिस्थितीतही एका भारतीय वैमानिकाने इतिहासाची दिशा बदलली.

धातू कापू शकणाऱ्या कुऱ्हाडीने वारंवार हल्ला होऊनही, प्रचंड रक्तस्त्राव होत असताना, जर या माणसाने प्रतिकार करण्याचे धैर्य दाखवले नसते, आणि प्रसंगावधान राखून अपहरण/आपत्कालीन कोड कार्यान्वित केला नसता, आपत्कालीन प्रतिसाद सुरू केला नसता व प्रवाशांना आत येऊन मदत करता यावी म्हणून कॉकपिटचा दरवाजा उघडला नसता, तर मध्य-पूर्वेसाठी त्याचे भू-राजकीय परिणाम गंभीर आणि संभाव्यतः अपरिवर्तनीय ठरले असते.

त्या आतंकवाद्याचा हा प्रयोग सफल झाला असता तर अनेक देश आज एकमेकांच्या जीवावर उठले असते. शेकडो आरोपप्रत्यारोप झाले असते. इतकेच नाही तर भारतीय वैमानिकालाच आतंकवादी ठरवून हिंदू आतंकवादाच्या  खोट्या नॅरेटिव्ह मध्ये पुनःश्च प्राण फुंकले गेले असते. भारतीय हिंदूंची छीथू करण्याची ही आयती संधी कॅप्टन स्मित यांनी भारतद्रोहींच्या हातून त्या जखमी अवस्थेतही काढून घेतली. 

कप्तान स्मित माच्छहर जखमी अवस्थेत जमिनीवर लोळत होते. तरीही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. कॉकपिटचे दार उघडले. प्रवाशांनी आणि ऑफ-ड्युटी वैमानिकांनी सहवैमानिकाच्या वेशातील आतंकवादी हममला काबूत आणले. विमान सौदी अरेबियातील ताबुक येथे सुरक्षित उतरले. सुमारे एकशे ऐंशी जीवांचे प्राण वाचले. हे केवळ नशिबाचे वरदान नव्हते. हे एका शूर भारतीय माणसाचे अदम्य धैर्य होते. नेतन्याहू, मोदी, संयुक्त अरब अमिरातीचे उच्चाधिकारी आणि जगातील अनेक नेत्यांनी त्यांना “खरा नायक” म्हणून गौरविले आहे. परंतु या धुरंधराच्या कर्तबगारीच्या प्रकाशात दहशतवादाचा काळा चेहरा अधिक ठळकपणे उघडा पडला आहे.

कप्तान स्मित यांच्यावर हल्ला करणारा हमम अल-हम्मामी नक्की कोण आहे? ओमानी नागरिक, संयुक्त अरब अमिरातीत जन्मलेला, ओमानी वडील आणि सीरियन आईचा हा मुलगा. या माणसाने सीरियात एक मोठा काळ घालवला आहे. इथे त्याच्यावर इस्लामिक कट्टरतावादाचे कुसंस्कार प्रथम केले गेले. २०२४ मध्ये ओमान एअरमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच त्याच्यावर इस्लामिक धर्मांध कट्टरतावादी संकेतस्थळे आणि साहित्य पाहण्याचे आरोप सिद्ध झाले. परिणामी ओमानच्या गुप्तचर यंत्रणेने त्याला उड्डाण कर्तव्यातून काढून टाकले. परंतु कदाचित नोकरीतून काढून टाकण्याइतका पुरावा त्यांना मिळाला नसावा. त्यामुळे त्याला प्रशासकीय खुर्चीवर बसवले गेले. त्याने ती नोकरी सोडली आणि फ्लायदुबईने त्याला स्वीकारले. परंतु त्याला नोकरीवर घेताना ओमान सरकार किंवा विमानकंपनीमध्ये त्यांनी योग्य आणि पुरेशी चौकशी केली नाही हे आता उघडच झाले आहे. हाच तो गंभीर सुरक्षा भेद आहे, ज्याने जवळजवळ ९/११ सारखी परिस्थती ओढवून आणली.

यावर फ्लायदूबाई विमान कंपनीला उत्तरे द्यावीच लागणार आहेत. 

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्टपणे सांगितले की, हममने ‘इस्लामिस्ट रॅडिकल इंडॉक्ट्रिनेशन’ घेतले होते. याचा सरळ अर्थ असा की त्याला केवळ धार्मिक उपदेश मिळाला नव्हता. त्याला पद्धतशीरपणे कट्टर जिहादी विचारसरणीचे खतपाणी घालून पक्के तयार करण्यात आले होते. गैर-मुस्लिमांना, विशेषतः ज्यूंना शत्रू मानणे, आत्मघातकी हल्ल्यांना स्वर्गाचा मार्ग समजणे, अल-कायदासारख्या संघटनांच्या नेत्यांना आदर्श मानणे, अशा प्रकारच्या हिंसक विचारसरणीचे गहन मानसिक प्रशिक्षण त्याच्याकडून करवून घेण्यात आले होते. ऑनलाइन साहित्य, धार्मिक मुलाखती, सीरियातील प्रभाव आणि कदाचित त्याला सतत सूचना देणारा एखादा गुप्त सूत्रधार यांच्या माध्यमातून त्याच्या मनात हिंसेचे बीज रोवण्यात आले. हे काही साधेसुधे प्रशिक्षण नाही. हे एखाद्या सर्वसामान्य माणसाला जीवघेणे हत्यार बनविणारे वैचारिक विषारीकरण आहे.

त्याच्या डिलीट केलेल्या सोशल मीडिया खात्यांवरून हे स्पष्ट होते. त्याच्या लिंक्डइन आणि इंस्टाग्रामवर एल अल आणि आर्कियासारख्या इस्रायली विमानांची कॉकपिट फुटेज, अयमान अल-झवाहिरी आणि अल-कायदाशी संबंधित आत्मघातकी हल्लेखोरांची छायाचित्रे, मक्का-मदिना-जेरुसलेम दर्शविणारी एआय प्रतिमा आणि मृत्यूला न भिण्याचे काव्य,त्याच्या सामानात सापडलेली फ्री पॅलेस्टाईन पत्रके इत्यादी अनेक पोस्ट एकाच दिशेने बोट दाखवतात. त्याच्या जुन्या ट्विट्समध्ये स्त्रियांबाबत अत्यंत कट्टर भूमिका दिसते. हे सर्व योगायोग खचितच नाहीत. हे एका पद्धतशीरपणे, अत्यंत सावधपणे घडवून आणलेल्या नियोजित कटाचे पुरावे आहेत.

संयुक्त अरब अमिरातीच्या अॅटर्नी जनरलने अधिकृतपणे याला ‘दहशतवादी हल्ला’ म्हटले आहे. त्यांनी हममने क्रॅश अॅक्सने हल्ला केला आणि विमानावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, असे स्पष्ट केले. इस्रायल सरकार आणि गुप्तचर विभाग, त्याने एकट्यानेच हे काम केले की त्याच्यासोबत अजून कोणकोण होते, तसेच कोणाच्या निर्देशाने तो काम करीत होता, हे शोधून काढायचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या प्रकरणाचा थेट संबंध इराणशी असल्याची शक्यताही तपासली जात आहे. ओमान आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध नसतानाही ओमानी वैमानिकाला तेल अवीव मार्गावर सहवैमानिक म्हणून विमानात शिरण्याची परवानगी कशी मिळाली, हा प्रश्न फ्लायदुबईच्या व्यवस्थापनाला आता भेडसावतो आहे. परिणामी विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

ही घटना भारतासाठी विशेष अर्थपूर्ण आहे. एका भारतीय वैमानिकाने—कप्तान स्मित माच्छहर यांनी—जगातील सर्वांत संवेदनशील हवाई मार्गावर शेकडो जीवांचे रक्षण केले. त्याच वेळी कट्टरतावादाचा किळसवाणा, बीभत्स चेहरा उघडा पडला. सुरक्षा व्यवस्थेतील ढिलाई, पार्श्वभूमी तपासणीतील त्रुटी आणि कट्टर विचारसरणीचा प्रसार—हे सर्व एकत्र आले तर कोणतीही आधुनिक व्यवस्था धोक्यात येऊ शकते.

आता प्रश्न फक्त एका वैमानिकाचा नाही. प्रश्न आहे जागतिक विमान सुरक्षा व्यवस्थेचा, मध्यपूर्वेतील हवाई मार्गांच्या विश्वासार्हतेचा आणि कट्टरतावादाला वेळीच ओळखण्याच्या क्षमतेचा. प्रणालीने यापुढे असे धोके रोखलेच पाहिजेत. सतर्कता, कठोर पडताळणी आणि वैचारिक विषारीकरणावर कठोर कारवाई हीच काळाची गरज आहे. 

ज्या क्षणी विमान अनियंत्रितपणे खाली कोसळत होते, त्या क्षणी कप्तान माच्छहर यांच्या जखमी शरीरातही कर्तव्याची जागृती शिल्लक होती. त्यांनी दार उघडले, मदत आत येऊ दिली आणि आपत्ती टाळली. परंतु ही वीरता अपवादात्मक आहे. ती नियमित सुरक्षा यंत्रणेची जागा घेऊ शकत नाही. हममसारख्या व्यक्तीला उड्डाण परवाना कसा मिळाला, त्याची पूर्व पार्श्वभूमी का तपासली गेली नाही?, असे जिहादी कट्टर साहित्य वाचणाऱ्या व्यक्तीला इतक्या संवेदनशील मार्गावर वैमानिक म्हणून का नियुक्त केले गेले? ते कोणी केले?—या प्रश्नांची उत्तरे केवळ एका कंपनीच्या चौकशीत सापडणार नाहीत. ती संपूर्ण जागतिक विमान वाहतूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेशी निगडित आहेत.

नेतन्याहू यांनी ज्या ‘इस्लामिस्ट रॅडिकल इंडॉक्ट्रिनेशन’चा उल्लेख केला, ते केवळ व्यक्तिगत विचलन नाही. तो एका संघटित विचारप्रवाहाचा भाग आहे, जो गैर-मुस्लिमांना—विशेषतः ज्यूंना—शत्रू ठरवतो, आत्मघातकी कृत्याला पुण्य मानतो आणि अल-कायदाच्या नेत्यांना आदर्श ठरवतो. 

सतर्कता, कठोर पडताळणी आणि वैचारिक विषारीकरणावर निर्दय कारवाई हीच काळाची आज्ञा आहे, या घटनेतून घेण्याची शिकवण आहे.

अन्य लेख

संबंधित लेख