Tuesday, November 3, 2026

शिवग्रंथ पंचकाचे लोकार्पण संपन्न

Share

एशियाटिक सोसायटीत रंगला बहारदार सोहळा 

——————-

मुंबई : भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा सर्वांगीण आणि सखोल अभ्यास करण्यासाठी देशात छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाने एक स्वतंत्र अध्यासन असण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी गुरूवारी केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंधीच्या पाच ग्रंथांचे प्रकाशन सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये झाले. त्यावेळी डॉ.  सहस्रबुद्ध बोलत होते. 

डॉ. केदार फाळके यांची दोन पुस्तके, डॉ. अनुराधा कुलकर्णी यांची दोन पुस्तके आणि दिवंगत इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचा औरंगजेब हा संशोधन ग्रंथ अशा पाच पुस्तकांचे प्रकाशन एशियाटिक सोसायटीमध्ये झाले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सेनापती कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, उद्योगपती नरेंद्र मुरकुंबी आणि या कार्यक्रमाला हजर होते. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे आणि इतर अनेक मान्यवर या समारंभास आवर्जून उपस्थित होते. 

देशातल्या विविध संशोधन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे, यावर प्रदीप रावत आणि विनय सहस्रबुद्धे यांनी भर दिला. श्री. रावत म्हणाले की गजाननराव मेहंदळे यांनी फार मोठा संशोधनाचा आणि लेखनाचा वारसा निर्माण केला आहे. गजाननराव मेहेंदळे यांनी दाखविलेल्या रस्त्यावरून आम्ही सारे वाटचाल करीत आहोत. गजाननराव मेहेंदळे यांनी इतके प्रचंड काम करून ठेवले आहे की ते सारे प्रकाशित करणे हे सुद्धा मोठे जबाबदारीचे काम आहे. गजाननराव मेहेंदळे यांच्या नावाने एक अध्यासन आता निर्माण होत आहे. अनेक संशोधन प्रकल्प मार्गी लागण्यासाठी या अध्यासनाचा उपयोग होईल. 

आपला इतिहास जपण्यासाठी आणि तो यथामूल स्वरूपात समाजासमोर घेण्यासाठी आम्ही शक्य ते सारे प्रयत्न करीत आहोत, अशी विनम्र भावना मुरकुंबी आणि आंग्रे यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी, मेहेंदळे यांचे औरंगजेब, केदार फाळके यांची मराठा राज्याची अर्थव्यवस्था आणि श्री शिवछत्रपती : भारत भाग्यविधाता तसेच डॉ. अनुराधा कुलकर्णी यांची मराठ्यांचे आरमार आणि श्री शिवछत्रपतींची पत्रे खंड तिसरा अशी एकूण पाच पुस्तके प्रकाशित करण्यात आली. 

पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सारंग दर्शने यांनी केदार फाळके, अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन या अभ्यासकांशी या पाच ग्रंथांबाबत संवाद साधला. या कार्यक्रमास इतिहासप्रेमी आणि जाणकार अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांना डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी एशियाटिक सोसायटीची प्रकाशने भेट देऊन त्यांचा सत्कार केला. 

यानिमित्ताने झालेल्या पाचही ग्रंथांच्या विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. 

केदार फाळकें कडून बहारदार समारोप 

या कार्यक्रमात मुलाखतीचा समारोप करताना केदार फाळके यांनी कविराज भूषण यांच्या अनेक रचनांचे पठण करून बहार उडवून दिली. कवी भूषण यांनी शिवरायांची केवळ स्तुती केली नाही तर त्यांच्या कार्याचे ऐतिहासिक मोल अनेक रचनांमधून अधोरेखित केले आहे. या रचनांचे पठण ऐकताना श्रोते रंगून गेले.

अन्य लेख

संबंधित लेख