महाराष्ट्राच्या राजकारणात विधाने, दावे आणि आरोप-प्रत्यारोपांची कधीही कमतरता नसते. मात्र, काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद राज्याच्या राजकारणात एक नवा दावा घेऊन येणारी ठरली. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाला पुन्हा एकदा ऐरणीवर आणत रोहित पवारांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. परंतु, या संपूर्ण घडामोडींकडे पाहताना राजकीय वर्तुळातून एका गोष्टीची चर्चा अधिक होताना दिसते, ती म्हणजे, पुराव्यांच्या नावाखाली काही वेळा होणारे अति-राजकारण आणि रोहित पवार यांचे सततचे आक्रमक दावे!
मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्ही. एस. आर. (VSR) कंपनी आणि तिचे मालक व्ही. के. सिंह यांच्यावर अनेक आरोप केले. विमानाचे मालक, त्यांची परदेशातील संपत्ती, अमेरिकेतील तपास यंत्रणांनी घेतलेले आक्षेप आणि ड्रग्ज तस्करीशी जोडले गेलेले धागेदोरे असा मोठा कच्चा कागदपत्रांचा गठ्ठा त्यांनी माध्यमांसमोर मांडला. याच मालिकेत पुढे जात त्यांनी एक फोटो दाखवला ज्यामध्ये ‘मफलर मॅन’ म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला.
रोहित पवारांच्या म्हणण्यानुसार, व्ही. के. सिंह यांच्या कुटुंबाचे आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे संबंध आहेत आणि म्हणूनच या प्रकरणातील दोषींना पाठीशी घातले जात आहे.
एका बाजूला रोहित पवार या संपूर्ण प्रकरणाची सखोल सीबीआय चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावे यासाठी आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या या कार्यपद्धतीवर आणि वक्तव्यांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय वर्तुळातून असा सूर उमटतोय की, कोणत्याही संवेदनशील आणि दुर्दैवी घटनेला विशिष्ट राजकीय नेत्यांच्या प्रतिमेसोबत जोडताना बऱ्याचदा सबुरीने आणि जबाबदारीने वागणे गरजेचे असते.
फक्त एका लग्नातील जुन्या फोटोवरून किंवा अप्रत्यक्ष संबंधांवर बोट ठेवून राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारच्या संशयाची सुई रोखणे, कितपत योग्य आहे? असा सवाल अनेक राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. रोहित पवार यांनी मांडलेले मुद्दे तांत्रिकदृष्ट्या कितीही मोठे भासत असले, तरी त्यामागे ठोस कायदेशीर पुरावे किती आणि राजकीय प्रसिद्धीची हाव किती, याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. “प्रत्येक विषयावर तातडीने आणि काहीही संदर्भ न जोडता थेट सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तींवर शिंतोडे उडवणे ही अलीकडच्या राजकारणाची नवी स्टाईल बनली आहे,” असेही बोलले जात आहे.
दुसरीकडे, काहीजणांच्यामते केवळ राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देण्यासाठी आणि आपल्या पक्षाच्या किंवा स्वतःच्या राजकीय अस्तित्वाची चर्चा चालू ठेवण्यासाठी असे स्टंट केले जातात, अशी टीका होत आहे.
अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या निधनाचे दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि या अपघातामागचे सत्य समोर यावे हीच सर्वसामान्यांचीही इच्छा आहे. परंतु, या संवेदनशील प्रकरणाचे रूपांतर जर केवळ रोजच्या टीव्ही डिबेट्स आणि पत्रकार परिषदांच्या राजकारणात झाले, तर मूळ सत्य बाजूला राहून केवळ राजकीय चिखलफेकच शिल्लक राहते. रोहित पवारांनी घेतलेली ही पत्रकार परिषद कागदपत्रांच्या आधारे काही मोठे दावे करणारी नक्कीच होती, पण त्यातून निष्पन्न काय होणार आणि पुराव्यांची सत्यता किती, हे येणारा काळच ठरवेल. तूर्तास तरी, ‘मफलर मॅन’च्या या नव्या राजकीय चर्चेने महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले आहे हे मात्र नक्की!