छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आणि ‘सामाजिक न्याय दिना’चे औचित्य साधून येत्या रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात “राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील विविध विभागांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांना ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
या परिषदेचे आयोजन विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) आणि राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला सामाजिक न्याय, समताधिष्ठित आणि बंधुभावपूर्ण समाज निर्मितीसाठी हा उपक्रम राबवला जात आहे.
‘सामाजिक न्याय दिन’ आणि शाहू जयंतीचे महत्त्व:
दरवर्षी २६ जून हा दिवस आधुनिक भारताचे शिल्पकार, बहुजनांचे कैवारी आणि थोर समाजसुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात वंचित, शोषित आणि मागासवर्गीय घटकांच्या उत्थानासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले, तसेच उपेक्षित घटकांना प्रशासनात हक्क मिळवून देण्यासाठी देशात पहिल्यांदा आरक्षणाची तरतूद केली. सामाजिक समता आणि बंधुभाव रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या याच अतुलनीय योगदानाची स्मृती म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे त्यांचा जन्मदिवस (२६ जून) हा ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा केला जातो. हाच वारसा पुढे चालवणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.
विवेक विचार मंचाद्वारे यावर्षी घोषित करण्यात आलेले पुरस्कारार्थी खालीलप्रमाणे आहेत:
- पश्चिम महाराष्ट्र विभाग: १. ॲड. विजय गव्हाळे (बारामती) २. मिलिंद मधुकर जाधव (पिंपरी चिंचवड)
- मराठवाडा – खान्देश विभाग: १. नागेज मोहन कंडारे (धुळे) २. प्रा. डॉ. राजेश नारायणराव रगडे (छत्रपती संभाजीनगर) ३. नागसेन शामराव पुंडगे (परभणी) ४. श्रीमती डॉ. अनुप्रिता जाईबाई मोरे (बीड)
- विदर्भ विभाग: १. प्रभाकर मनोहर शिंदे (नागपूर) २. शाम वसंत माळवंदे (खामगाव, बुलढाणा)
- कोकण विभाग: १. श्रीमती स्मिता सुशांत कवडे (मुंबई) २. विजय अंबुजी जाधव (अध्यक्ष – कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्र, अंधेरी, मुंबई)
प्रमुख उपस्थितांच्या हस्ते होणार गौरव:
हा प्रतिष्ठेचा पुरस्कार केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, पद्मश्री दादा इदाते, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, ‘बार्टी’च्या प्रभारी महासंचालक श्रीमती दीपा मुधोळ मुंडे, ‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. रजनीश कामत आणि विवेक विचार मंचाचे कार्यवाह श्री. महेश पोहनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते प्रदान करण्यात येईल.
विवेक विचार मंच व आयोजक संस्थांच्या वतीने सर्व पुरस्कारार्थी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील सामाजिक कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या परिषदेला नागरिकांनी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.