पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) ६९ व्या सत्रात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता…
हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस (Summer Solstice) असतो… भारतीय परंपरेनुसार या काळानंतर सूर्य दक्षिणायनात प्रवेश करतो, जो काळ अध्यात्म आणि योगाभ्यासासाठी अत्यंत शुभ मानला जातो…
नरेंद्र मोदींच्या या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या १७७ देशांनी विक्रमी पाठिंबा दिला आणि अवघ्या ७५ दिवसांत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित करण्यात आला… आणि जगातील पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून २०१५ रोजी नवी दिल्ली येथील राजपथावर साजरा करण्यात आला… त्याचे नेतृत्व स्वतः पंतप्रधान मोदींनी केले होते…
यावर्षी देखील २१ जून २०२६ रोजी जगभरात १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे… आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ ची अधिकृत थीम “निरोगी वृद्धत्वासाठी योग” अशी आहे… वृद्धावस्थेतही शरीर आणि मन निरोगी व सक्रिय ठेवण्यासाठी योगाचे महत्त्व या संकल्पनेद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे…
यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ऐतिहासिक “रेड रोड”वर सुमारे ३०,००० नागरिकांच्या सोबत योग दिन साजरा करणार आहेत…
यावर्षीच म्हणजे २०२६ ला पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होऊन भाजपचे हिंदुत्ववादी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालला जात आहेत… ते ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी… पश्चिम बंगालमधील एका सुखद परिवर्तनाची ही चाहूल आहे…
कोलकाताचा ‘रेड रोड’ (१९८५ पासून अधिकृत नाव: इंदिरा गांधी सरणी) हा शहरातील अतिशय ऐतिहासिक आणि महत्त्वाचा मुख्य मार्ग आहे… मध्य कोलकात्यात स्थित हा रस्ता त्याच्या भव्यतेसाठी आणि महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यक्रमांसाठी ओळखला जातो… दुसऱ्या महायुद्धादरम्यान, या रुंद रस्त्याचा वापर लढाऊ विमानांसाठी लँडिंग स्ट्रिप (धावपट्टी) म्हणून केला जात असे…

१९७८ पासून कोलकात्याच्या रेड रोडवर ईदच्या नमाज पठणाचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला जात होता… त्यावेळी या रस्त्यावरून होणारी वहातूक बंद ठेवून अन्य मार्गांनी वळवली जात असे…
परंतु, नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर २०२६ मधील नवीन सरकारी धोरणानुसार… रस्त्यांवर होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांवर आणि रहदारीच्या कोंडीवर बंदी घालण्यात आली आहे… त्यामुळे २०२६ मध्ये पहिल्यांदाच ईदची नमाज रेड रोडवर न होता, जवळच असलेल्या ब्रिगेड परेड मैदानावर (Brigade Parade Ground) आयोजित करण्यात आली होती…
कोलकाताच्या रेड रोडवर आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यास व रस्ता बंद ठेवण्याविरुद्ध काही हितसंबंधी मंडळी कलकत्ता उच्च न्यायालयात गेली होती… कलकत्ता उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला… तथापि, न्यायालयाने पोलिसांना प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याचे आणि कार्यक्रमाच्या नंतर लगेचच रेड रोड सामान्य जनतेसाठी खुला करण्याचे निर्देश दिले आहेत…
इथे एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे की… योग हा धार्मिक किंवा व्यायाम प्रकार नाही तर निरोगी आणि निरामय जीवनासाठी… तो मन, शरीर आणि आत्म्याला जोडण्याचे एक माध्यम आहे… आणि तो योग करणाऱ्या प्रत्येकाला धर्मनिरपेक्ष लाभ देणार आहे… अमेरिका युरोप सकट बहुतांशी सर्वच मुस्लिम बहुल अरब देशांमध्ये देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो… त्यामुळे त्याचा संबंध हिंदू धर्माशी जोडून त्याचा द्वेष करणे हे विकृत मानसिकतेचे द्योतक आहे आणि कोलकाता उच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले आहे…
आता विषय राहिला राजकीय द्वेषाचा… तर त्याचा निकाल पश्चिम बंगालच्या मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आधीच लावून टाकलेला आहे…
त्यामुळे आपले सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणे हेच सर्वांसाठी हितावह आहे…
“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते।
तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्”।।… म्हणतात ते उगीच नाही