Monday, September 28, 2026

कोलकाता फिल्म इन्स्टिट्यूट- भारत माता व स्वामी विवेकानंदांच्या तसबिरींची तोडफोड

Share

सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI) या सरकारी शैक्षणिक संस्थेत रविवारी, २७ सप्टेंबर २०२६ रोजी एका अधिकृत आणि शांततापूर्ण कार्यक्रमावर डाव्या विचारसरणीच्या उग्रवादी विद्यार्थ्यांनी हिंसक हल्ला चढवला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहक हक्क संघटनेच्या बैठकीदरम्यान ही घटना घडली.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने आपल्या ग्राहक जनजागृती बैठकीसाठी SRFTI संस्थेचे मुख्य सभागृह नियमानुसार ३२,७०० रुपये शुल्क भरून प्रशासनाकडून अधिकृतपणे भाड्याने घेतले होते. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हा कार्यक्रम सुरू झाला असतानाच, दुपारी १:३० च्या सुमारास ३० ते ४० डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी अचानक सभागृहात घुसखोरी केली.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आंदोलक विद्यार्थ्यांनी हातात संघविरोधी आणि राष्ट्रविरोधी मजकूर असलेले फलक घेतले होते. त्यांनी कार्यक्रमात प्रचंड घोषणाबाजी करत अडथळा आणण्यास सुरुवात केली.

कार्यक्रमाला विरोध करण्याच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी सभागृहात तोडफोड करण्यास सुरुवात केली. व्यासपीठावर ठेवलेल्या ‘भारत माता’ आणि ‘स्वामी विवेकानंद’ यांच्या फ्रेम्सची तोडफोड करण्यात आली आणि त्या पायाखाली तुडवण्यात आल्या. याशिवाय कार्यक्रमाचे साहित्य, भेटवस्तू आणि बॅनर्सची नासधूस करण्यात आली.

कार्यक्रमासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थितांना लक्ष्य करण्यात आले. डाव्या आंदोलकांनी सभागृहाचे मुख्य दरवाजे बाहेरून बंद करून उपस्थितांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर बाहेर उभी असलेली वाहने आणि उपस्थितांना घेऊन आलेली बस रोखून धरत तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते जखमी झाले असून ४ जणांना गंभीर दुखापतींमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

या संपूर्ण हिंसाचाराचे आणि तोडफोडीचे प्रत्यक्ष व्हिडिओ फुटेज आणि सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून, त्यामध्ये डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी व्यासपीठावर घुसून धुडगूस घालताना आणि राष्ट्रपुरुषांच्या तसबिरींची विटंबना करताना स्पष्ट दिसत आहेत. हे व्हिडिओ फुटेज आता पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्याद्वारे उपद्रवी तत्त्वांची ओळख पटवली जात आहे.

घटनास्थळी पोलीस तातडीने पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी गैरकायदेशीर जमाव जमवणे, गुन्हेगारी घुसखोरी, मालमत्तेचे नुकसान आणि नागरिकांवर प्राणघातक हल्ला या कलमांखाली पोलीस तक्रार नोंदवण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनी या प्रकरणी तीन एफआयआर दाखल केले असून, व्हिडिओ फुटेजच्या आधारे मुख्य सूत्रधार आणि तोडफोड करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख