मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी महाराष्ट्राच्या लोकायुक्तपदाची शपथ घेतली. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी त्यांना लोकायुक्तपदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्या. सुनील शुक्रे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. लोकायुक्त संस्था ही प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावते. या शपथविधी सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
न्या. सुनील शुक्रे यांच्या अनुभवाचा आणि न्यायव्यवस्थेतील प्रदीर्घ कार्याचा महाराष्ट्राच्या लोकायुक्त संस्थेला निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे कोण आहेत?
न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे मुंबई उच्च न्यायालयाचे पूर्व न्यायाधीश (निवृत्त) आहेत. ते ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले.
त्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. त्यांनी पुणे विद्यापीठातून पदवी, अमरावती येथून एलएलबी आणि नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएल.एम. पदवी मिळवली
त्यांनी न्यायिक सेवेत कोल्हापूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे रजिस्ट्रार (प्रशासन) आणि मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल म्हणून काम पाहिले
सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाने डिसेंबर २०२३ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या (MSBCC) अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाने मराठा आरक्षण व मागासवर्गीय सामाजिक-आर्थिक स्थितीचा अहवाल तयार केला