Sunday, March 22, 2026

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

Share

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.

महापौर ज्योती गाडे : दिवंगत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या कन्या असलेल्या ज्योती गाडे यांनी सावेडीतील प्रभाग ३ मधून विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. “अहिल्यानगर नाव झाल्यानंतर पहिली महापौर होण्याचा मान मिळणे ही मोठी जबाबदारी आहे. वडील शिवाजीराव कर्डिले यांचा वारसा आणि अहिल्यादेवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहराचा विकास करेन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

उपमहापौर धनंजय जाधव : माजी उपनगराध्यक्ष दिवंगत कृष्णा जाधव यांचे चिरंजीव आणि साईद्वारका ट्रस्टचे प्रमुख असलेल्या धनंजय जाधव यांनी प्रभाग ५ मधून साडेसात हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. “केंद्र, राज्य आणि महापालिकेत आमचीच सत्ता असल्याने नगरकरांना दर्जेदार सुविधा देणे सोपे होईल,” असे त्यांनी नमूद केले.

सोमवारी (२ फेब्रुवारी) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी नगरसचिव मेहेर लहारे यांच्याकडे अर्ज सुपूर्द केले. यावेळी महायुतीचे सर्व प्रमुख नेते आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्योती गाडे यांच्या अर्जावर गणेश भोसले व अविनाश घुले, तर धनंजय जाधव यांच्या अर्जावर माजी महापौर बाबासाहेब वाकळे व निखिल वारे यांच्या सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे अनिल मोहिते, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले आणि महायुतीचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

विकासाचे ‘ट्रिपल इंजिन’ मॉडेल
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर शहराचा कायापालट करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता महापालिकेत होणाऱ्या सभेत ही निवड अधिकृतपणे जाहीर केली जाईल.

अन्य लेख

संबंधित लेख