मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. “मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल,” हा आपला शब्द खरा ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी असेल की अमराठी, यावरून ठाकरे गटाकडून भाजपवर टीका केली जात होती. या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांच्या रूपाने मराठा आणि अनुभवी चेहरा समोर आल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.
नितेश राणे यांचे ट्विट जसेच्या तसे:
“बोललो होतो..
मुंबई चा महापौर..
हिंदू होणार
मराठी होणार
महायुती चाच होणार !
जय श्री राम !
मुंबई ❤️ महादेव”
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून ‘हिंदू’ आणि ‘मराठी’ या दोन मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येणे आता निश्चित मानले जात असताना, राणेंनी ‘जय श्री राम’ आणि ‘मुंबई महादेव’ असा उल्लेख करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. रितू तावडे यांच्या निवडीमुळे ठाकरे गटाच्या ‘मराठी अस्मितेच्या’ प्रचाराला भाजपने चोख प्रत्युत्तर दिल्याचे राणे यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होत आहे.