Wednesday, February 11, 2026

संवाद हा एकमेव मार्ग आहे…

Share

आत्महत्या करून जीवन संपवलेली दोन उदाहरणे पाठोपाठ समोर आल्यावर या मुद्द्यावर गांभीर्याने विचार करायला हवा असे वाटले. पहिले उदाहरण एका तरुण कार्यकर्त्याचे आहे, त्याच्या आत्महत्येनंतर सगळे संभ्रमात पडले. वर वर पाहता कारण तर काही दिसले नाही. त्याला योग्य वाटणार्‍या मुलीशी त्याचा विवाह ठरला होता. मात्र लग्नाआधी त्याने आत्महत्या का केली हे उलगडले नाही. असे काय घडले ज्यामुळे हा टोकाचा निर्णय त्याने घेतला ते कोणालाच कळले नाही.

एका अनुभवी पोलीस अधिकाऱ्याने एक असाच धक्कादायक अनुभव सांगितला. मुलगी तरुण, सुशिक्षित आणि नोकरी करणारी होती. ही सुस्वरूप आणि चुणचुणीत मुलगी स्वतंत्र राहत असे. एक लहानसे घर होते तिचे, काम घरून करायचे असल्याने ती घरीच असे. लागेल तसे जेवण व अन्य वस्तू मागवत असे. तिच्या मित्राशी ठरलेला विवाह मोडला असावा येवढा मुद्दा सोडला तर बाकी सुरळीत चालले होते.

मात्र तिच्या मृत्यू नंतर पोलिसांनी आजुबाजुला बरीच चौकशी केली तेंव्हा लक्षात आले की, तिचा शेजारी कोणाशीही काही संवाद नव्हता. वेगळया घरांत रहात असल्यामुळे वडील व भाऊ यांच्याशीही फार संपर्क नव्हता. दार उघडून घरात गेल्यावर फार विचित्र दृश्य पहायला मिळाले, घरात मागवलेल्या वस्तूंची कव्हर, बॉक्स यांचे ढीग लागलेले होते, कचरा तसाच होता अनेक दिवसांचा. आत आलेली कोणतीही गोष्ट बाहेर पडलीच नाही. दराची एक फट उघडून ती वस्तू आत घ्यायची, बोलण्याचा संबंध नव्हता कारण पैसे ऑनलाईन दिले जायचे. यावर कडी म्हणजे तिने स्वतःला गुदमरून मृत्यू स्वीकारला, जे खरेच कठीण व वेदना दायक आहे. सारेच कल्पनेच्या पलीकडले.

ते अधिकारी अत्यंत काळजीच्या सुरात म्हणाले की, सर्व समाज यासाठी जागरूक असणे गरजेचे आहे. आजूबाजूच्या व्यक्तींशी अगदी शिष्टाचार म्हणून का होईना बोलणे व्हायला हवेच. हा संवादच एखाद्याला असे टोकाचे पाउल उचलण्यापासून रोखू शकतो.

ते म्हणाले आपले मित्रमैत्रिणी किंवा दूरचे जवळचे नातेवाईक यांच्याशी आपल्या समस्येबद्दल बोलायला हवे. परिस्थिती गंभीर असू शकते, पण अशाही स्थितीत मार्ग निश्चित निघू शकतो. आत्महत्या हे कधीच त्यावरचे उत्तर असू शकत नाही.

एका अनुभवी समुपदेशक यांच्याशी यासंबंधी चर्चा केली त्यांनी काही मुद्दे मांडले. त्या म्हणाल्या, जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्याला भेटते,  तेंव्हा तिच्याशी अगदी साधा किंवा औपचारिक का होईना पण संवाद साधायला हवा. हे वर वर पाहता अगदी साधे वाटते पण एखाद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला त्यातून आशेचा किरण दिसू शकतो.

कधी कधी व्यक्ती विचाराच्या गर्तेत सापडलेल्या असतात, हे साधे बोलणे त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकेल. आपण एकटेच असल्याचा आभास होऊन देणार नाही. त्यातून अशा अस्वस्थ व्यक्तीला अनेकवेळा कोणाशीतरी संवाद साधण्याची प्रेरणा मिळते, काही मदत मिळवण्याचा मार्ग सापडतो.

नंतर त्यांनी एक फारच महत्त्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे, संवाद साधताना आपले मत तयार करणे, शिक्के मारणे टाळायला हवे. विशेषतः पालकांनी तर हे लक्षात ठेवायला हवे, असे केल्याने परिस्थिती व संवाद किंवा संबंध अधिकच बिघडतात. समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जाते, ती मोकळेपणाने बोलत नाही. आपल्या भावना बोलून दाखवत नाही, मनाची कवाडे उघडत नाही आणि मग त्यातून एकटेपणाची भावना बळवते. संपर्कच तुटतो. या बिंदूवर फारच काळजीपूर्वक वागायला हवे, कारण एकदा का हा धागा तुटला तर पुन्हा जोडणे जवळ जवळ अशक्य होऊन बसते.

दुसरे चित्र म्हणजे पालक मुलांना पुरेसे अवकाश द्यायला हवे या भावनेने इतके ग्रस्त असतात की रोजच्या व्यवहारात मुले जे संघर्ष अनुभवतात ते त्यांना कळतच नाहीत  किंवा जाणवत नाहीत. पालक अज्ञानात जगतात असेच म्हणावे लागेल आणि यालाच पालक स्वातंत्र्य देणे असे समजून चालतात. हे टोक पण टाळायला हवे.

त्यांनी मांडलेला एक अत्यंत महत्त्वचा मुद्दा आहे तो म्हणजे समुपदेशकाची मदत घेण्याचा, अनेकांना याचा संकोच वाटतो, किंबहुना ते टाळण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मानसिक दोलायमान स्थितीत अशा हेल्पलाइन या अगदी गरजेच्या तर असतातच, पण त्या बहुतांशी मोफत सल्ला देतात. शारीरिक व्याधीसाठी आपण डॉक्टरकडे जातो तसेच मानसिक विकारांवर समुपदेशकच हवा या गोष्टीचा स्वीकार व्हायला हवा, समाजाने याला मान्यता द्यायला हवी. त्याची निश्चितच गरज आहे.

ताण तणाव हे आता जीवनाचे अविभाज्य घटक आहेत, वस्तुस्थिती अनेक वेळा गुंतागुंतीची आणि संयमाची परीक्षा पाहणारी असतेच. आपण सर्वांनीच ती कौशल्याने हाताळायला हवी, काळ हेच औषध आहे, जखम भरून येईल,  असे मानून दुर्लक्ष नक्कीच करायला नको.

विद्या माधव देशपांडे

अन्य लेख

संबंधित लेख