“कटिंग” या शब्दाचे अर्थ मुंबईकरांच्या भाषेत दोनच. अर्धा म्हणजे कटिंग चहा किंवा केस कापणे. फार फार तर पगारात कंपनीकडून होणारी “कटिंग” इतकाच माहिती आहे.
एकेकाळी जुळी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये मात्र चायना कटिंग म्हणजे अक्षरशः सरकारी पातळीवर करण्यात आलेला “लँड जिहाद” आहे. दिवसाढवळ्या घातलेला सरकारी दरोडाच.
कराची शहरामध्ये जनतेच्या सोईसुविधांसाठी म्हणजे बागबगीचे, खेळाची मैदाने, शाळा, इस्पितळ अगदी कब्रस्तानासाठी देखील राखीव ठेवलेले भूखंड सत्ताधारी राजकारणी, भूमाफिया, भ्रष्ट पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी यांनी संगनमताने लाटले आणि या राखीव भूखंडांचे लहान लहान प्लॉट्स पाडून त्यांनी निवासी किंवा व्यावसायिकांना ते परस्पर विकले. सगळा व्यवहार १००% बेकायदेशीर. जमिनीच्या मालकीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नाहीत. फक्त भूमाफिया आखून देईल ती जमीन तुमची आहे असे समजायचे. भारतातल्या कसेल त्याची जमीन तत्वावर कराचीत “राहील त्याची जमीन” असे हे कुभांड होते. शिवाय बहुतांशी सगळा व्यवहार रोखीत. त्यामुळे या दरोड्यातील खरी उलाढाल कायम गोपनीयच राहिली.
सुरजानी टाउन, गुलिस्तान-ए-जौहर, उत्तर कराची आणि लियाकताबाद यांसारख्या भागांत चायना कटिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले. किती..? तर अंदाजाने ३५,००० राखीव प्लॉट्स “चायना कटिंग” नावाच्या या लँड जिहादमध्ये लाटले गेले आहेत. साधारण २००० सालापासून सुरू झालेले हे चायना कटिंग नावाचे षडयंत्र २००२/०३ नंतर वेग पकडू लागले. कराचीमधील वाढती लोकसंख्या आणि जमिनीच्या वाढत्या किमतींमुळे या प्रकाराला वेग मिळाला.
या ‘चायना कटिंग’ बेकायदेशीर जमीन गैरव्यवहारातील भूखंड प्रामुख्याने कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन (KMC) कराची डेव्हलपमेंट अथॉरिटी (KDA) आणि काही प्रमाणात पाकिस्तान रेल्वे व प्रांतीय सरकारच्या मालकीचे होते.
साधारण २०१५ हा प्रकार उघडकीस आला आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (FIA) आणि नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
चायना कटिंगमध्ये एकूण शासनाचा किती महसूल बुडाला याचा हिशोब सुद्धा सरकारला लागत नाहीये. विविध जमीन घोटाळ्यांच्या तपासादरम्यान विशिष्ट प्रकरणांमध्ये ३ अब्ज ते ११.७ अब्ज रुपयांहून अधिक महसूल बुडाल्याचे समोर आले आहे.
हा चायना कटिंग भ्रष्टाचार उघडकीस येण्याच्या आधी २००७ च्या एका अहवालानुसार कराचीतील २३,००० एकर सरकारी जमिनीवर भूमाफियांनी ताबा मिळवला होता. ज्याची किंमत ८१ अब्ज रुपयांपेक्षा जास्त होती.
चायना कटिंग लँड जिहादमध्ये एकूण किती रकमेच्या जमिनींची उलाढाल झाली याची तर सरकारला कल्पनाच करवत नाहीये. कारण, ते आकडे सरकारी तपास अधिकाऱ्यांना शाळेत असताना ریاضی रियाजीच्या (गणितच्या) मास्तरांनी शिकवलेले नसावेत किंवा त्यालाही येत नसावेत शिवाय एवढे मोठे आकडे त्या भीकमाग्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्र्याने देखील कधी वाचले नसावेत.
पुढे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या चायना कटिंगमधील बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारांची गंभीर दखल घेतली. न्यायालयाने स्पष्ट केले की, ज्या जमिनीवर उद्याने किंवा सार्वजनिक सुविधा नियोजित होत्या त्या मूळ स्वरूपात परत मिळवल्या पाहिजेत. आणि कराचीतील सर्व सरकारी भूमीवर झालेले बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कराची महानगरपालिका (KMC) आणि इतर संस्थांनी अवैध वसाहती आणि व्यावसायिक इमारतींवर कारवाई सुरू केली त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे हटवण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चायना कटिंगमध्ये जमीन घेणारे मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय तसेच कष्टकरी गरीब पुरते नागवले गेले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. चायना कटिंग प्रकरणात जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीत सामील असलेल्या भूमाफिया आणि सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. मात्र यानंतर कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनने (KMC) असा प्रस्ताव दिला होता की, या बेकायदेशीर बांधकामांना दंड आकारून अधिकृत केल्यास सरकारला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळू शकतो.
कराचीच्या “चायना कटिंग” लँड जिहादचे खरे सूत्रधार (cutprits) आणि लाभार्थी

२००५ ते १० या काळात कराचीचे महापौर राहिलेले मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (MQM) पक्षाचे सय्यद मुस्तफा कमाल. यांच्याच कारकिर्दीत “चायना कटिंग”ला सुरुवात झाली असे कराचीकरांचे म्हणणे आहे. त्यांनी कराचीच्या मेहमूदाबादमध्ये ८२ एकर राखीव भूखंडाचे बेकायदेशीर वाटप केले होते. त्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी तपास पथकाकडून त्यांची चौकशी देखील झाली होती पण विस्थापित कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण “चांगल्या हेतूने” ते वाटप केल्याचा दावा सय्यद मुस्तफा कमालने केला. क्यू भूखंडांच्या वाटपातही त्याने “कमाल” केली आणि चौकशीदरम्यान सफाई देताना देखील “कमाल” केली.

मात्र चायना कटिंग म्हटलं की कराचीमध्ये मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्षाच्या सर्वात महत्त्वाच्या व शक्तिशाली अशा कराची तन्झीमी समिती (KTC) चा माजी प्रभारी हम्माद सिद्दीकी याचे नाव निर्विवादपणे सर्व बाजूंनी पुढे येते. शासन प्रशासन चौकशी यंत्रणा आणि कराचीची जनता एकमताने या हम्माद सिद्दीकीलाच चायना कटिंग दरोड्याचा मुख्य सूत्रधार समजतात.
अतिरेकी कारवाया आणि जमीन हडप करण्याच्या कारवायांमध्ये एक व्यक्ती म्हणून ओळखले जाते. २०१५ मध्ये दहशतवादविरोधी न्यायालयाने त्याला चायना कटिंग अर्थात जमिनीच्या नोंदींमध्ये अनियमितता आणि बनावट जमीन वाटप योजनांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून गुन्हेगार घोषित केले होते.
या हम्माद सिद्दीकीने चायना कटिंगमधला अब्जावधी रुपयांचा कट १९९३ पासून लंडनला विजनवासात लपून बसलेल्या मुत्ताहिदा कौमी मूवमेंटच्या तत्कालीन सर्वोच्च नेत्याला अल्ताफ हुसैनला हस्तेपरहस्ते पोचता केला. अंदाजे १७ अब्ज आकडा दबक्या आवाजात सांगितला जातो. मात्र खरा आकडा कधीच कोणाला कळला नाही कारण सगळा व्यवहार “तेरी भी चूप मेरी भी चूप” असाच गुलदस्त्यातला होता.
मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्षाचा कार्यकर्ता चुन्नू मामू (मोहम्मद अहसान) हा चायना कटिंग आणि पैसे लाँडरिंगमध्ये कथितपणे मदत करणारा एक प्रमुख “मध्यस्थ” म्हणून ओळखला जातो. (आपल्याकडे त्यांना मांडवली सम्राट म्हणतात) चायना कटिंगशी संबंधित मनी लाँडरिंगसाठी त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्षाचे अत्यंत वजनदार नेते आणि एकेकाळी कराचीचे महापौर पद भूषवलेले डॉ. फारूक सत्तार यांनी एका चर्चेदरम्यान कबूल केले होते की, पक्षाने सुरूवातीला गरीबांना घरे देण्यासाठी ही पद्धत सुरू केली होती. पण नंतर भूमाफियांनी याचा गैरफायदा घेतला. “सौ चूहें खाकर बिल्ली हाज चली” अशी गत झाली. शिवाय कराची डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (KDA) मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच हा घोटाळा केला गेला. त्याशिवाय कराचीवर दिवसाढवळ्या घातलेला हा दरोडा शक्यच नव्हता.
वर उल्लेख केलेल्या सर्व संशयित दरोडेखोरांच्या परिचयामध्ये तुम्हाला एक नाव समान दिसेल ते म्हणजे मुत्ताहिदा कौमी मूवमेंट. काय आहे हे मुत्ताहिदा कौमी मूवमेंट प्रकरण..?

१४ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारावर आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची निर्मिती झाली.
“अपनेवालों” का देश म्हणून हिंदुस्थानातून रावीपार इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये गेलेल्या उर्दू भाषिक मुसलमानांना तिथे “मोहाजिर” (हिजरत केलेले) म्हणून ओळखले जाते.
त्यावेळी जुळी मुंबई म्हणून ओळखली जाणारी कराची ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची राजधानी असल्यामुळे सहाजिकच मोहाजिरांचे लोंढेच्या लोंढे कराची आणि आजूबाजूच्या हैदराबादसारख्या शहरांमध्ये घुसले आणि स्थिरावले.
या मोहजिरांनी सिंध प्रांतातील विशेषतः कराची व हैदराबाद सारख्या शहरांच्या लोकसंख्येचे गुणोत्तरच बदलून टाकले. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या उर्दू भाषिक मोहाजिरांमुळे कराचीतील बहुसंख्य असलेला सिंधी भाषिक मुसलमान अल्पसंख्यांक झाला. त्याचबरोबर कराचीचा पिढ्यानपिढ्या रहिवासी असलेला आणि आधीच भाषिक अल्पसंख्यांक असलेला बलोच मुसलमान आपल्याच भूमीत अतीअल्पसंख्यांक झाला. मूळ कराची निवासी मुसलमान या उर्दू भाषिक मोहाजीरांच्या लोंढ्यांपुढे हतबल झाले.
हिंदुस्थानातून नेसत्या वस्त्रानिशी आलेल्या या मोहाजीरांना कराची हैदराबाद मधील स्थानिक सिंधी बलोच जनता “भूखे नंगे मोहाजिर” म्हणून ओळखत असे. मात्र या भूखे नंगे मोहाजिरांनी आपल्या हाडीमाशी खिळलेल्या “कब्जा संस्कृती” प्रमाणे सबंध कराचीचा ताबा घ्यायला सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आपण कायनात मधील (ब्रम्हांडातील) सगळ्यात मोठी कुर्बानी दिली आहे. हिंदुस्थानातून आपण केलेले हिजरतीचा संबंध थेट पैगंबर साहेबांच्या मतेहून मदिनेला केलेल्या हिजरतीशी जोडून तोरा मिरवत मोहाजिरांनी इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारकडून खूप काही पदरात पाडून घेतले. कराचीहून शरणार्थी म्हणून रावीपार भारतात निघून गेलेल्या हिंदू सिंधी बांधवांची घरे जमीन जुमला संपत्ती सरकारी सवलती बरंच काही पदरात पाडून घेतले.
कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नांपासून इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यापर्यंत अनेक सत्ताधीश मोहाजिर असल्यामुळे मोहाजिरांचे चांगलेच फावले.
मात्र पुढच्या काळात मोहाजिरांचा राजकीय दबदबा ओसरत गेला. त्यातच कायदे आजम बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नांच्या मृत्यूनंतर मुस्लीम लीग हळूहळू विलयाला गेली आणि मोहाजिर राजकीयदृष्ट्या पार अनाथ झाले होते.
पंजाबी आणि सिंधी राजकारण्यांना या भूखे नंगे मोहाजिरांचे वर्चस्व सहन होण्यापलीकडचे होते… ६० च्या दशकाच्या पूर्वाधात इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सत्ताधीशांनी देशाची राजधानी कराचीहून रावळपिंडीला हलवली व पुढे उत्तरार्धात इस्लामाबादला नेली… देशाची आर्थिक राजधानी म्हणून महत्त्व कायम असलेल्या कराचीचे राजकीय महत्त्व मात्र दुय्यम झाले…
१९७० च्या दशकात सिंध सरकारच्या कोटा सिस्टीम मुळे मोहाजिरांवर जाणून
बुजून अन्याय केला जातो आहे असा त्यांचा प्रचंड समाज म्हणा किंवा गैरसमज झाला आणि… शाळा कॉलेजच्या प्रवेशांपासून नोकऱ्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपण उर्दू भाषिक असल्यामुळे आपल्याला पद्धतशीरपणे डावलले जात असल्याची एक अन्यायाची तीव्र भावना मोहाजिरांमध्ये ज्वालामुखीसारखी उफाळू लागली…

अल्ताफ हुसैन नावाच्या पाकिस्तानात जन्मलेल्या एका तरुण विद्यार्थ्याने मोहाजिरांच्या या असंतोषाला वाचा फोडली. त्याने १९७८ साली ऑल पाकिस्तान मोहाजिर स्टुडंट्स ऑर्गनायझेशन (APMSO) नावाची मोहाजिर विद्यार्थ्यांसाठी संघटना सुरू केली. अल्ताफ हुसैन आणि त्याची विद्यार्थी संघटना यांनी उग्र निदर्शने सुरू केली. अल्ताफ हुसैनच्या वक्तृत्वाने मोहाजिर संमोहित होऊ लागले. बघता बघता कराचीच्या संपूर्ण जनजीवनाचाच ताबा अल्ताफ हुसैनने घेतला. त्याच्या एका हाकेवर कराची कडकडीत बंद होऊ लागला. परिंदा भी पर नहीं मार सकता था. हा बंद उर्दू भाषिक मोहाजीर अल्ताफ हुसैन याच्या प्रेमापोटी तर बाकीचे कराचीवासी अल्ताफ हुसैन याच्या भीतीपोटी बंदमध्ये सामील होत असत. कराचीच्या मोहाजिरांसाठी तो लाडका “अल्ताफ भाई” होता. “अल्ताफ भाई बोले, कराची डोले” असाच कराचीचा माहोल होता.

पण राजसत्ता हातात आल्याशिवाय मोहाजिरांना न्याय मिळणार नाही हे लक्षात आल्यावर अल्ताफ हुसैनने १९८४ साली “मोहाजिर कौमी मूवमेंट” (MQM) नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. कराचीच्या अझीझाबादमध्ये मोहाजिर कौमी मूवमेंटने आपले केंद्रीय कार्यालय उघडले. त्याच्या लँडलाईन नंबराच्या शेवटच्या ९० या दोन अंकावरून त्याला “नाईन झीरो” म्हटले जायचे. नाईन झीरो हीच त्या कार्यालयाची शेवटपर्यंत ओळख होती. पक्षाची निशाणी होती “पतंग”… (आपल्याकडच्या MIM ची तीच निशाणी आहे)
अल्ताफ हुसैन मोहाजिरांचा आणि पर्यायाने कराचीचा अनभिषिक्त सम्राट झाला आणि १९८८ पासून या भूखे नंगे मोहाजिरांनी कराचीच्या महापालिकेचा जणू ताबाच घेतला. तेव्हापासून आजपर्यंत अपवाद वगळता “महापौर आमचाच” या थाटात मोहाजिर कौमी मूमेंटने कराची महापालिकेवर राज्य केले. मोहाजिर कौमी मूवमेंटचे डॉ. फारुख सत्तार वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कराचीचे सगळ्यात तरुण महापौर झाले.
सिंध प्रांतातून मोहाजिर कौमी मूवमेंटचे आमदार आणि खासदार सुद्धा निवडून जाऊ लागले. सत्तेत सहभाग मिळू लागला. काही वेळा सत्तेसाठी पाकिस्तान पीपल पार्टी (PPP) किंवा मुस्लिम लीग (नवाज) यांना मोहाजिर कौमी मूवमेंटच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत होत्या. त्यातून सत्तेसाठी सौदेबाजी सुरू झाली.

मोहाजिर कौमी मूवमेंटच्या कारकिर्दीत कराचीत खंडणी (याला पाकिस्तानात भत्ताखोरी म्हणतात). टोळीयुद्ध, धमक्या, बलात्कार, अपहरण, लुटमार, दरोडे, अंधाधुंद गोळीबार, जाळपोळ, खळ् खट्याक हत्या यांनी थैमान घातले. हत्यासुद्धा सर्वसाधारण हत्या नसत ते टारगेट किलिंग (Target Killing) असायचे. व्यापाऱ्याने पुरेशी खंडणी दिली नाही म्हणून किंवा टोळी युद्धातील प्रतिस्पर्धी अथवा अन्य भाषिक कराचीवासी कोणत्याही कारणाने ठरवून व काही तारीख वेळ सांगून हत्या केल्या जायच्या. अनेक वेळा हत्या केलेल्या नागरिकांची प्रेते रस्त्याच्या कडेला किंवा गटारात गोणपाटात बांधून फेकलेली असायची. त्यावेळी कराचीत ही “बोरी बंद लाशे” हा प्रचलित वाक्प्रचार होता. अल्ताफ हुसैनने अनेक वेळा आपल्या शत्रूंना “अपने बोरी का नाप लेकर रखना” म्हणून जाहीर धमकी दिलेली होती.
“अज्ञात” (यांना उर्दूत “ना मालूम अफराद… نا معلوم افراد” म्हणतात) कुठून येतील आणि कोणाला गोळ्या घालून पसार होतील याची कोणतीही शाश्वती नसे. कराचीत अक्षरशः अराजक माजलेले होते. आणि या अराजकाचा कर्ताकरविता होता अल्ताफ हुसैन आणि त्याची मोहाजिर कौमी मूवमेंट (मात्र अपवाद होता तो रहमान बलोच आणि उझेर बलोच यांच्या ल्यारीचा. हे आपण धुरंधर चित्रपटात पाहिलेच आहे…)

१९९२ पर्यंत अल्ताफ हुसैनला राजकारणात आणि कराचीत अनेक शत्रू निर्माण झाले. आणि पंतप्रधान नवाज शरीफ सरकारने कराचीत टोळी युद्धाला पायबंद घालण्यासाठी ऑपरेशन “क्लीन अप” सुरू केले. जिवाच्या भीतीने अल्ताफ हुसैन लंडनला पळाला आणि लपून राहिला तो आजतागायत. गेली ३३ वर्षे तो कराचीला परतलेला नाही.
अल्ताफ हुसैनची भीती एका अर्थी खरी होती ऑपरेशन क्लीन-अपच्या दरम्यान पाकिस्तानी निमलष्करी दल रेंजर्सनी मोहाजिर कौमी मूवमेंटच्या अनेक कार्यकर्त्यांना घरातून खेचून काढून फरफटात तुरुंगात नेले. काही जणांना वाटेतच एन्काऊंटरच्या नावाखाली गोळ्या घालून ठार मारले. मोहाजिरांच्या कुर्बानीची आणि हिजरतीची कराचीच्या रस्त्यांवर पुरती धिंड काढली. लंडनला पळाल्यामुळे अल्ताफ हुसैन बचावला. मात्र पुढे जवळजवळ अडीच दशके त्याने लंडनला बसून कराचीवरील आपली पकड मजबूत ठेवली होती. लंडनमध्ये बसून तो आपला पक्ष समर्थपणे चालवत होता. त्याच वेळी फोनवरून तो कराचीतील लाखोंच्या सभेला संबोधित करत होता. त्याचे फोनवरील संभाषण लाऊड स्पीकरवर ऐकवले जायचे. जणू तो समोर उभा आहे याच थाटात ती सभा दणक्यात व्हायची. आणि त्याने व त्याच्या मोहाजिर कौमी मूवमेंटने अल्ताफ हुसैन लंडनला पसार होण्यापूर्वी जसे अराजक माजवले होते तसेच अराजक अल्ताफ भाई लंडनहून माजवत होता.
कराचीत अल्ताफ भाईच्या विषयी एक वाकडा शब्द बोलण्याची कोणाची टाप नव्हती अन्यथा दुसऱ्या दिवशी त्याची “बोरी बंद लाश” रस्त्याच्या कडेला फेकून दिलेली मिळायची.

१९९७ साली लंडनला बसलेल्या अल्ताफ हुसैनला देशाच्या लोकसंख्येच्या केवळ ८% असलेल्या आणि कराची हैदराबाद शहरात वसलेल्या उर्दू भाषिक मोहाजिरांच्या जीवावर आपल्याला सत्ता परिवर्तन घडवता येणार नाही याची जाणीव झाली. देशाची सत्ता काबीज करायची तर मोहाजिरांबरोबरच सिंधी पंजाबी बलोच पठाण यांची देखील मते हवीत हे त्याला मनोमन पटले. आणि त्याने पक्षाचे मोहाजिर कौमी मूवमेंट हे नाव बदलून “मुत्ताहिदा (United) कौमी मूवमेंट” केले. इंग्रजीत MQM चे MQM च राहिले आणि त्याचबरोबर मतदार सुद्धा तेवढाच राहिला. सिंधी, पंजाबी, बलोच, पठाण मतदारांनी “नव्या बाटलीत जुनी दारू भरली आहे” हे ओळखून “मुत्ताहिदा कौमी मूवमेंट” कडे साफ पाठ फिरवली. MQM ची राजकीय ताकद यथावतच राहिली. मिळालेल्या तुटपुंज्या यशावर तो फक्त सहभागी होण्यासाठी कधी सौदेबाजी तर कधी लाचारी पत्करत राहिला.
तरीही कराचीला येणारे बहुतेक सगळे व्यापारी उद्योगपती आणि राजकीय नेते आवर्जून अल्ताफ हुसैनला भेटायला येत. १९९२ नंतर त्याला लंडनला न चुकता भेटत. अगदी विदेशी राजदूत सुद्धा असे सांगतात.

२०१६ साली मात्र अल्ताफ हुसैनचे ग्रह फिरले. फाळणी ही आमच्या पूर्वजांनी केलेली मानवी इतिहासातील ऐतिहासिक चूक (historical blunder) होती ते विभाजन केवळ जमिनीचे नव्हते तर रक्ताचे होते. संस्कृतीचे होते आणि रक्ताच्या नात्यांचे होते. आमच्या पूर्वजांची चूक माफ करून भारताने आम्हाला पदरात घ्यावे कारण पाकिस्तानात आम्ही मोहाजिर नरक यातना भोगत आहोत” असे त्याने एका जाहीर कार्यक्रमात सांगितले. एका आर्थी त्याने अखंड भारताचे समर्थनच केले होते.
खरंतर यापूर्वी २००४ साली देखील त्याने असेच वक्तव्य केले होते. पण इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारने त्याच्याकडे कानाडोळा केला कारण, घाबरण्यासारखे काहीच नव्हते. भारतात काँग्रेस प्रणित यूपीएचे सरकार होते. यावेळी मात्र भारतात मोदी सरकार होते. यावेळी विषाची परीक्षा घ्यायला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे सरकार कसेच तयार नव्हते. न जाणो मोदी सरकारने अल्ताफ हुसैनचे अखंड भारताचे वक्तव्य उचलून धरले तर…?
झालं… इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारला आयतं कोलीत मिळालं. अल्ताफ हुसैनला “देशद्रोही” ठरवून मुत्ताहिदा कौमी मूवमेंटवर अक्षरशः वरवंटा फिरवण्यात आला. त्याच्या शेकडो नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. पक्षाची सगळी अनधिकृत कार्यालय पाडण्यात आली आणि नाईन झीरोला टाळे ठोकण्यात आले. कराची पोलिस आणि रेंजर्सच्या म्हणण्याप्रमाणे मुत्ताहिदा कौमी मूवमेंटच्या कार्यालयातून आणि कार्यकर्त्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली.
मुत्ताहिदा कौमी मूवमेंटच्या पाकिस्तानातील सर्वोच्च नेत्याने डॉ. फारुक सत्तार यांनी तुरुंगातून बाहेर आल्यावर अल्ताफ हुसेनच्या वक्तव्यापासून आणि पक्षापासून पुरती फारकत घेतली. त्यांनी आपला मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (पाकिस्तान) हा वेगळा पक्ष स्थापन केला. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमधील जवळपास सगळाच मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्ष डॉक्टर फारुक सत्तार यांच्या नेतृत्वाखाली एकवटला.
अल्ताफ हुसैनचा पक्ष मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (लंडन) म्हणून ओळखला जाऊ लागला. दात व नखे काढलेल्या आणि आयाळ झडलेल्या निरुपयोगी, निस्तेज आणि निष्प्रभ अशा सिंहासारखी अल्ताफ हुसैन आणि त्याच्या मुत्ताहिदा कौमी मूवमेंट (लंडन)ची. “उरलो कुंकवापुरता” एवढीच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये आज ओळख उरलेली आहे.
कराचीत “चायना” कटिंग हे नाव कुठून आले ?

कराचीतील सरकारी लँड जिहादला “चायना” कटिंग नाव पडणे विस्मयकारक आहे. चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमा जशा अस्पष्ट व अस्थायी आणि कधीही बदलणाऱ्या असतात तशाच या ढापलेल्या भूखंडावर पाडलेल्या प्लॉट्सच्या सीमा होत्या. अस्पष्ट अस्थायी आणि कधीही बदलणाऱ्या. शिवाय शेजारील राष्ट्रांची हडप केलेली भूमी चीन आपली म्हणून नकाशात दाखवतो त्याचप्रमाणे कराचीवासियांच्या सोईसुविधांसाठी राखीव ठेवलेले भूखंड हडप करून त्याचे छोटे छोटे प्लॉट्स बनवण्यात आले होते. “हडपलेली जमीन” हा दोघांमधला समान दुवा होता. शिवाय चीनी मालाप्रमाणे या प्लॉट्सची देखील No Guarantee कोणतीही हमी नाही. चले तो चाँद तक नहीं तो शाम तक. म्हणून या सरकारी लँड जिहादला “चायना” कटिंग हे नाव पडले.
एकूणच “चायना कटिंग”ने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या मुत्ताहिदा कौमी मूवमेंट पक्षाची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची नियत व औकात जगाला दाखवून दिली आहे.