शीख धर्म हा केवळ आध्यात्मिक मार्ग नाही, तर तो न्याय, सत्य आणि धर्मासाठी शहीदी देण्याची एक अतुलनीय गाथा आहे. गुरु नानक देव यांनी लावलेला हा समतेचा आणि ‘एक ओंकार’ चा वृक्ष, वेळोवेळी स्वतःच्या रक्ताने सिंचन करून वाढवण्यात आला आहे. या महान परंपरेतील सर्वात तेजस्वी तारे म्हणजे शीखांचे नववे गुरु, ‘गुरु तेग बहादूर जी’, ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले.
गुरु तेग बहादूर यांचा जन्म १ एप्रिल १६२१ मध्ये अमृतसर येथे सहावे गुरु, गुरु हर गोविंद यांच्या घरी झाला. त्यांचे मूळ नाव त्याग मल होते. मुघलांविरुद्धच्या एका लढाईत त्यांनी दाखवलेल्या अविश्वसनीय शौर्यामुळे त्यांना ‘तलवारीने शौर्य दाखवणारा’ या अर्थाचे ‘तेग बहादूर’ हे नाव मिळाले. वडिलांच्या निधनानंतर, त्यांनी सुमारे २६ वर्षे बकाला या शांत गावात एकांतवासात घालवली. या काळात ते केवळ नामस्मरण आणि आध्यात्मिक चिंतनात लीन राहिले, ज्यामुळे त्यांना ‘बाबा बकाला’ म्हणून ओळखले जाई.
१६६४ मध्ये, आठवे गुरु, गुरु हर किशन यांनी आपला वारसदार ‘बाबा बकाले’ मध्ये असल्याचा संकेत दिला आणि शांततेचे हे महान उपासक अधिकृतपणे शिखांचे नववे गुरु बनले. गुरुपद स्वीकारल्यानंतर त्यांनी केवळ प्रार्थनाच नव्हे, तर कृतीतून आपला धर्मप्रचार सुरू केला. त्यांनी उत्तर भारतात व्यापक प्रवास करून समाजाला सत्य, दया, निस्वार्थ सेवा आणि निर्भयता या मूल्यांची शिकवण दिली. त्यांनीच सध्याच्या पंजाबमधील पवित्र शहर आनंदपूर साहिबची स्थापना केली, जे पुढे खालसा पंथाचे केंद्र बनले. त्यांची बाणी (पवित्र रचना) लोकांना भीती, मोह आणि अभिमान सोडून देवाशी जोडण्यास प्रेरित करते आणि ती आज गुरु ग्रंथ साहिब मध्ये समाविष्ट आहे.
‘हिंद दी चादर’
सतराव्या शतकात, तत्कालीन मुघल सम्राट औरंगजेब याने इस्लामी सत्तेला बळ देण्यासाठी हिंदूंवर, विशेषतः काश्मिरी पंडितांवर, जबरदस्तीने धर्मांतरणाची क्रूर मोहीम सुरू केली होती. काशी विश्वेश्वर सारख्या हिंदूच्या पवित्र मंदिरांना पाडून मूर्तिभंजन करून त्याने हिंदूस्थानात हैदोस माजवला होता. जो धर्मांतर करण्यास नकार देऊन मुस्लिम होत नसे त्या सर्वांना अत्यंत अमानुष शिक्षा दिल्या जात होत्या, प्रसंगी त्यांच्या हत्या होत होत्या.
या अत्याचारांना कंटाळलेल्या काश्मिरी पंडितांचे एक शिष्टमंडळ गुरु तेग बहादूर यांच्याकडे मदतीसाठी आले. त्यांच्या विनंतीवरून, गुरु तेग बहादुर यांनी पंडितांना औरंगजेबाला एक अभूतपूर्व आव्हान देण्यास सांगितले, “जर गुरु तेग बहादूर यांनी इस्लाम स्वीकारला, तर आम्हीही स्वीकारू !” गुरू तेग बहादुरांनी हिंदुस्थानातील धर्माचे आणि धार्मिक स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली.
या आव्हानाचा परिणाम म्हणून गुरु तेग बहादुर यांना १६७५ मध्ये मुघलांनी अटक केली आणि त्यांना दिल्लीला नेण्यात आले. त्यांना इस्लाम स्वीकारावा यासाठी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. पण गुरु तेग बहादुर आपल्या विश्वासावर ठाम राहिले. त्यांच्या अटकेपूर्वी, त्यांचे तीन निष्ठावान शीख अनुयायी भाई मतिदास, भाई सतीदास आणि भाई दयाला यांना क्रूरपणे शहीद करण्यात आले. भाई मतिदास यांना साक्षात् गुरु तेग बहादुरांसमोर करवतीने चिरण्यात आले. भाई दयाला यांना उकळत्या पाण्यात टाकून हौतात्म्य पत्करावे लागले. भाई सतीदास यांना कापसात गुंडाळून जिवंत जाळण्यात आले.
या क्रूर दृश्यांनीही गुरु तेग बहादूर यांचा दृढनिश्चय डगमगला नाही. शेवटी, २४ नोव्हेंबर १६७५ रोजी, औरंगजेबाच्या आदेशानुसार दिल्लीतील चांदनी चौक येथे त्यांचा शिरच्छेद करण्यात आले.
गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर त्यांनी हिंदू धर्मासह भारतातील सर्व लोकांच्या धर्मस्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाते. ज्या ठिकाणी त्यांचे शीर कापले गेले, तेथे आज गुरुद्वारा ‘शीशगंज साहिब’ हे पवित्र गुरुद्वारा उभे आहे. गुरु तेग बहादूर यांची शहीदी त्यांच्या पुत्र आणि शिखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंगजी यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरली.
पाचवे गुरु अर्जन देव जींचे बलिदान
या बलिदानाची बीजे ५० वर्षांपूर्वीच रोवली गेली होती, जेव्हा पाचवे गुरु, गुरु अर्जन देव जी यांना क्रूर धर्मांध मुघल सम्राट जहांगीरने अटक करून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितले. गुरू अर्जन देवजींनी नकार दिल्यावर इस्लाम धर्म न स्वीकारल्यामुळे अत्यंत क्रूरपणे त्यांना शहीद केले होते. या शहीदीने शांतताप्रिय शीख समुदायाला आत्मसंरक्षणासाठी तयार होण्याची प्रेरणा दिली. या क्रूर हत्येमुळेच गुरू हरगोविंद यांनी शिखांना ‘मीरी आणि पीरी’ म्हणजे राजकीय आणि आध्यात्मिक अशा दोन्ही शक्तींचे प्रतीक म्हणून शस्त्रे धारण करण्याची आणि सैनिकी क्षमता वाढवण्याची शिकवण दिली. पुढे आपल्या वडिलांचे आणि पूर्वजांचे बलिदान पाहून, गुरु गोविंद सिंग जी यांनी १६९९ मध्ये अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी खालसा पंथाची स्थापना केली.
गुरु गोविंद सिंग जींच्या पुत्रांचे बलिदान
गुरु गोविंद सिंगजींच्या स्वतःच्या चारही पुत्रांनी धर्मासाठी शहीदी दिली. गुरू गोविंद सिंग यांचे दोन पुत्र साहिबजादा अजित सिंग जी(वय १८ वर्षे) आणि साहिबजादा जुझार सिंग जी (वय १४ वर्ष ) आनंदपूर साहिबच्या वेढ्यात मुघलांविरूद्ध डिसेंबर १७०४ मध्ये चमकौरच्या लढाईत शौर्याने लढताना शहीद झाले.
गुरू गोविंदसिंगजी यांचे दोन लहान पुत्र, साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग, यांना सरहिंद येथे मुघलांद्वारे इस्लाम न स्वीकारल्यामुळे २६ डिसेंबर १७०४ या दिवशी जिवंतपणी भिंतीत चिणण्यात आले. हे दोन बालक फक्त ६ आणि ९ वर्षांचे होते. हे त्याग आणि निर्भयतेचे जगातील एक मोठे उदाहरण आहे.
बंदा सिंग बहादूर (बैरागी)
गुरु गोविंद सिंग जींच्या नंतर त्यांचे अनुयायी बंदा सिंग बहादूर यांनी शीख सैन्याचे नेतृत्व केले. त्यांनी मुघलांना मोठे आव्हान दिले. त्यांना, त्यांच्या ४ वर्षाच्या लहान मुलाला आणि त्यांच्या शेकडो अनुयायांना इस्लाम न स्वीकारल्यामुळे मुघलांनी अत्यंत क्रूरपणे ठार मारले. त्यांच्या शरीराचे तुकडे होत होते , पण त्यांनी धर्मांतर करण्यास शेवटपर्यंत नकार दिला.
शीख इतिहासातील ही बलिदान परंपरा हेच सिद्ध करते की, शीख समुदायासाठी ‘धर्म’ आणि ‘सन्मान’ हे प्राणापेक्षाही प्रिय होते.
‘सिर दिया, पर सिर्र-ए-इमान न दिया’
अर्थात, शीर दिले, पण धर्माचा सन्मान नाही दिला, हे वाक्य या सर्व महान शहीदांच्या अविचल धैर्याचे आणि निःस्वार्थ राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. त्यांनी आपल्या रक्ताने धर्माचे स्वातंत्र्य केवळ जपलेच नाही, तर पुढील पिढ्यांसाठी न्याय आणि सत्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली.