नवी मुंबई (खारघर) : ‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखले जाणारे, मानवतेचे रक्षक आणि महान त्यागी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांचा त्याग मानवतेच्या इतिहासातील गौरवपूर्ण पर्व आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे बलिदान हे केवळ इतिहास नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या इतिहासातील एक गौरवशाली पान आहे. संस्कृती, परंपरेच रक्षण करण्यासाठी श्री गुरु तेग बहादुर साहीबजी यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांचे कार्य अतूट श्रद्धा आणि अतूट धैर्याचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
अल्पसंख्याक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्याकडे शस्त्रे नव्हती, पण त्यांच्याकडे सत्य आणि करुणेची ताकद होती. त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सच्चा धर्म तोच, जो दुसऱ्याच्या धर्माचा आदर करतो आणि रक्षण करतो, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र आणि पंजाबच्या ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकत नांदेड ही गुरु गोविंद सिंहजींची कर्मभूमी आहे, तर संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका पंजाबमध्ये फडकवली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. आम्ही राज्यभरात डिजिटल रथांच्या माध्यमातून या महान बलिदानाची गाथा घराघरात पोहोचवित आहोत. शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव (वारकरी) संप्रदाय या सर्व समाजांना एका सूत्रात बांधून श्री गुरु तेग बहादुर साहिबाजी यांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याचा मानस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी उपस्थित होते.