सांगली : कलापूर येथील विमानतळाच्या प्रस्तावित जागेवर १३ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित ख्रिस्ती धर्मगुरू पॉल दिनाकरन यांच्या ‘महाराष्ट्र प्रेयर फेस्टिव्हल’ला ‘सकल हिंदू समाजा’ने तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रार्थनासभेच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवली जात असून, हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, दिनाकरन आणि आयोजकांवर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रार्थनेने आजार बरे करण्याचा खोटा दावा?
या संदर्भात सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद घुगे आणि जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पॉल दिनाकरन यांच्या जुन्या कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहिल्यास त्यात अनेक आक्षेपार्ह दावे करण्यात आले आहेत. प्रार्थनेने आजारी माणसांना बरे करणे, अपंगांना चालता येणे, कॅन्सरसारख्या गाठी गायब होणे, असे चमत्कार दाखवून लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेतला जात आहे.
सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक मुलगी ‘माझ्या कानामागची गाठ प्रार्थनेने गेली’ असे सांगताना दिसत आहे. अशा प्रकारचे वैज्ञानिक आधार नसलेले आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे दावे समाजासाठी घातक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
धर्मांतराचे षडयंत्र असल्याचा आरोप
अंधश्रद्धा पसरवणारे व्हिडिओ दाखवून हिंदू समाजाचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात असल्याचे दिसून आले आहे. पॉल दिनाकरन यांच्या ‘जीजस कॉल्स’ या यूट्यूब वाहिनीवरही असे अनेक दिशाभूल करणारे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारने या कार्यक्रमाला दिलेली अनुमती रद्द करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.
निवेदन देताना ‘हिंदु एकता आंदोलना’चे सांगली शहराध्यक्ष संजय जाधव, मीरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, गजानन माने, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री राहुल बोळाज, उदय मुळे, ‘धर्मजागरण समन्वय’चे सुजित साळुंखे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक आकाश जाधव, हिंदु जनजागृती समितीचे संतोष देसाई, ‘मातंग चेतना परिषदे’चे प्रांत संयोजक अभिमन्यू भोसले, अमोल सदामते, ‘शिव मल्हार’ संघटनेचे राहुल पुजारी, ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे लक्ष्मण सरगर, शिवसेनचे श्रेयस गाडगीळ, यांसारख्या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.