ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५ मार्च) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
हा मोर्चा उल्हासनगर क्र. ३ येथील शांतीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरून सुरू झाला. तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा पुन्हा मूळ स्थानी विसर्जित झाला. हातात भगवे झेंडे आणि मशाली घेतलेल्या नागरिकांनी ‘तरुण खाटीक हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है’, ‘हत्याऱ्यांना फाशी द्या’ अशा गगनभेदी घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
‘हिंदू जोडो यात्रा समिती भारतवर्ष’चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये अखिल भारतीय नवयुग संघाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष नितीन चंडालिया, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष निखिल गोळे, जय महाराष्ट्र मित्र मंडळचे पदाधिकारी अशोक श्रीवास्तव, तसेच हिंदुत्वनिष्ठ आशिष शर्मा, तसेच हिंदु जनजागृती समितीकडून उल्हास चौधरी आणि वीरेश अहिर यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तरुण खाटीकची हत्या ही अत्यंत निर्घृण असून हिंदू समाजामध्ये या घटनेमुळे तीव्र संताप आहे. जोपर्यंत दोषींना कठोर शासन मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा यावेळी आयोजकांनी दिला.