हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सुशिक्षित आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्या वतीने शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी विशेष ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यातील सहभागी आस्थापना
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित संस्था सहभागी होणार आहेत, ज्यात प्रामुख्याने पैनगंगा इंटरनेशनल स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (कन्हेरगाव नाका), खंडेलवाल ज्वेलर्स (हिंगोली), संकल्प जॉब प्लेसमेंट (हिंगोली) यांसारख्या आस्थापनांचा समावेश असून, विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या मेळाव्यासाठी १० वी, १२ वी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, डी.एड., बी.एड., एम.एड., पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि बायोडाटा (Biodata) सह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
हा मेळावा शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंगोली येथे पार पडेल. उमेदवारांनी स्वखर्चाने या ठिकाणी उपस्थित राहावे.
“जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घेऊन आपले करिअर घडवावे,” असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ०२४५६-२२४५७४ किंवा ७३८५९२४५८९ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.