बॉलीवूडचा “धुरंधर” हमझा अली मजारी अर्थात रणवीर सिंग शुक्रवार दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या महाल परिसरातील मुख्यालयात आणि नंतर रेशीमबाग कार्यालयात पोहोचला. तेथे दीड तास थांबून त्याने डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरातील संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार व द्वितीय सरासंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधी स्थळांचे दर्शन घेतले. संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि संघाशी संबंधित काही संस्थांबद्दल माहिती जाणून घेतली. बॉलीवूडच्या आजवरच्या इतिहासाकडे नजर टाकली असता रणवीर सिंग याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला दिलेली भेट ही एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल.
इप्टा (IPTA) – Indian People’s Theatre Association

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला हिंदी बोलपट आलम आरा १४ मार्च १९३१ रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमांमध्ये प्रदर्शित झाला. त्यातील “दे दे खुदा के नाम पर प्यारे” हे भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले गाणे.

१९४० च्या दशकांत भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीच्या (बॉलीवूडच्या) भरभराटी बरोबरच १९४१ साली इप्टा (IPTA) या संस्थेची बंगलोरमध्ये अनिल डीसिल्वा यांनी शाखा उघडली. मात्र त्यानंतर दोन वर्षांनी २५ मे १९४३ रोजी मुंबईच्या गिरगावातील मारवाडी हायस्कूलमध्ये इप्टाची विधिवत स्थापना झाली. मात्र इप्टाची पाळेमुळे स्वातंत्र्यलढ्यात लेखकांचे योगदान देण्यासाठी १९३६ साली स्थापन झालेल्या संपूर्णपणे कम्युनिस्ट विचारसरणीच्या Progressive Writer’s Association या संस्थेत रुजलेली आहेत. इप्टाचे संस्थापक होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड सी.पी. जोशी. चित्रपट सृष्टीतील दिग्गज के.ए.अब्बास, अनिल डीसिल्वा आणि बलराज सहानी ही मंडळी संस्थापक सदस्यांपैकी. पृथ्वीराज कपूर, उत्पल दत्त, सलील चौधरी, साहिर लुधियानवी, कैफी आजमी, हरिवंश राय बच्चन हे सारे सारे इप्टाचे सक्रिय कॉम्रेड सदस्य.
इप्टाच्या नावातील People’s Theatre हे नाव सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांनी सुचवले होते यावरून आपल्याला भारतीय चित्रपट सृष्टीतील इप्टाचा पर्यायाने कम्युनिस्टांचा दबदबा काय होता याचा अंदाज येईल. आणि यापैकी कोणीही आपण कम्युनिस्ट कॉम्रेड असल्याचे कधीच लपवून ठेवले नाही. कॉम्रेड हरिवंशराय बच्चन यांनी आपल्या मधुशाला कवितेतील ५९ या कडव्यात…
एक तरह से सबका स्वागत करती है साकीबाला,
अज्ञ विज्ञ में है क्या अंतर हो जाने पर मतवाला,
रंक राव में भेद हुआ है कभी नहीं मदिरालय में,
साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला।।
अगदी बिनदिक्कतपणे “साम्यवाद की प्रथम प्रचारक है यह मेरी मधुशाला” असे सांगतात.
म्हणजे भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीच्या जवळपास स्थापनेपासूनच सिनेनिर्मात्यापासून स्पॉट बॉयपर्यंत बहुतांशी प्रत्येक जण इच्छा असो वा नसो इप्टाचा सदस्य होता. बरेच जण स्वयंस्फूर्तीने तर काहीजण मारून मुटकून कॉम्रेड बनवले गेले होते.
१९४१ साली जर्मनीने मोलोटोव्ह रिबेनट्रॉप करार तोडून रशियावर आक्रमण केले आणि रशिया जर्मनीचा शत्रू म्हणून ब्रिटनचा मित्र झाला. त्याबरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आतापर्यंतच्या “साम्राज्यवादी ब्रिटन”चा मित्र झाला.
भारतात ब्रिटिशांशी मैत्री निभावणारे कम्युनिस्ट १९४३ साली स्थापन झालेल्या इप्टाच्या आणि पर्यायाने चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून कोणता भारतीय स्वातंत्र्यलढा लढत होते हे त्या परमेश्वरालाच ठाऊक.
त्यामुळे पुढची अनेक दशके भारतीय प्रेक्षकांना कम्युनिस्ट विचारसरणीच्या निर्माते दिग्दर्शक आणि लेखकांनी दाखवली तीच देशभक्ती. तीच क्रांती त्याच रूढी त्याच परंपरा तोच सर्वधर्मसमभाव तोच धर्म तोच इतिहास आणि तीच संस्कृती बघावी लागली. भारतीय विशेषतः हिंदू प्रेक्षकांचा पुढची सहा-सात दशके अक्षरशः कोंडमारा होत होता.
बॉलीवूडमध्ये एकदा निर्माता, लेखक, गीतकार आणि दिग्दर्शक तुमच्या प्रभावाखाली आले की चित्रपट आपल्या नॅरेटिव्ह प्रमाणे बनवणे ओघानेच आले. भारतीय कम्युनिस्ट आणि इप्टाच्या माध्यमातून बॉलीवूड मधल्या या चौकडीचा योजनाबद्ध ताबा घेतला आणि आपल्याला हवा तो विकृत इतिहासाचा नॅरेटिव्ह भारतीय जनमानसात पद्धतशीरपणे रुजवला. बॉलीवूडमधील “वैचारिक जिहाद” म्हणजे काय हे भारतातील कम्युनिस्टांकडून शिकावे. चित्रपटाच्या जाहिरातीपासून ते श्रेयनामावलीपर्यंत प्रत्येक ठिकाणी हिंदी इंग्रजी आणि उर्दू या तिन्ही भाषा अनिवार्य असायच्या. मोहम्मद यूसुफ खान ही आपली खरी ओळख लपवून “दिलीप कुमार” आणि हमीद अली खान “अजित” या हिंदू नावांनी चित्रपटातून काम करत होते. मात्र त्याच वेळी १९५९ च्या “धूल का फूल” या चित्रपटातून कॉम्रेड साहीर लुधियानवी मात्र हिंदू प्रेक्षकांना.

“तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा” चे सर्वधर्मसमभावाचे, भाईचाऱ्याचे, मानवतेचे डोस पाजत होता. पण त्याने कधी दिलीप कुमार आणि अजितला “तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा” या ज्ञानामृताशी प्रामाणिक न रहाता तुम्ही मुसलमान ओळख लपवून हिंदू नावे का घेतलीत? आणि नावे बदलून “इंसान की औलाद है इंसान बनेगा”शी प्रतारणा का करत आहात? हे विचारण्याचे कधी धाडस केले नाही. पुढे १९७१ साली आलेल्या “मेहबूब की मेहंदी” या चित्रपटाने तर हिंदू प्रेक्षकांना लाजेने मेल्याहून मेल्यासारखे केले.
या चित्रपटात एक गीत होते…
पसंद आ गयी है एक काफिर
हसीना पसंद आ गयी है
पसंद आ गयी है
एक काफ़िर हसीना
उम्र उसकी सोला बरस छे
महीना पसंद आ गयी है
सितमगर ने मुश्किल
किया मेरा जीना उम्र
उसकी सोला बरस छे
महीना पसंद आ गयी है

म्हणजे नायकाला एक हसीना पसंत पडते. या हसीनाची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक तर ती काफिर आहे आणि तीचे वय १६.५ साडेसोळा वर्षे आहे. म्हणजे चित्रपटातील गाण्याच्या दोन ओळीतून नायक मुसलमान आहे त्याला पसंत पडलेली हसीना हिंदू आहे आणि ती नाबालिग आहे. परंतु प्रेम आंधळे असते त्यामुळे यात गैर काहीच नाही हे किती खुबीने हिंदू प्रेक्षकांच्या मनावर बिंबवले गेले बघा. आणि हिंदू प्रेक्षक सुद्धा जाणते अजाणतेपणे हे विषाचे घोट निमुटपणे गळ्याखाली उतरवत होता.
मात्र याच बॉलीवूडला हाच प्रसंग बरोबर उलटा म्हणजे नायक हिंदू आणि त्याला पसंत पडलेली अप्सरा साडेसोळा वर्षांची नाबालिग अजाण यवन बालिका असल्याची दाखवण्याचे धाडस मात्र कधीच झाले नाही. हा होता इप्टाचा दरारा… ही होती बॉलिवूड वरील कम्युनिस्टांची दहशत…

दरम्यानच्या काळात सलीम जावेद जोडीचा बॉलीवूडमध्ये उदय झाला होता त्यामुळे १९७५ साली प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटात तर भाईचार्याचा कहर झाला. रामगड गावातील सर्वात प्रतिष्ठित आणि धनवान समजल्या जाणाऱ्या बलदेव सिंग ठाकूर (संजीव कुमार) यांची विधवा सून (जया भादुरी) घरात संध्याकाळी वातीचा दिवा पेटवते याचा अर्थ गावात वीज नाही.

मात्र त्याचवेळी गावात एकाच मुसलमानाच्या रहीम चाचाच्या घरासाठी मशीद आहे आणि त्या मशीदीच्या लाऊडस्पीकर वरून बांग दिली जाते.

अर्थात नेक इमानदार सोशिक अशा रहीम चाचाची भूमिका कॉम्रेड ए.के. हंगल यांनी केलेली असल्यामुळे त्यांनाही गावात मशिदीसाठी वीज आहे परंतु बलदेव सिंग ठाकुर यांच्या घरी वीज नाही. यात काहीच वावगे वाटले नसावे. पुढे १९८३ साली आलेला कुली चित्रपट “बाजू पे ७८६ का बिल्ला, २० नंबर की बीड़ी पीता हूँ और काम करता हूँ कुली का, नाम है इक़बाल” या संवादाने गाजला. या चित्रपटात हा ७८६ चा बिल्ला इक्बाल (अमिताभ बच्चन) साठी संकटातून वाचवणाऱ्या एखाद्या ‘संरक्षक कवच’ किंवा ‘वरदान’ असल्यासारखा दाखवला आहे. आता ७८६ हा आकडा इस्लामिक संस्कृतीत पवित्र मानला जातो हे वेगळे सांगायलाच नको. मात्र त्याच वेळी इकबाल आपल्या हातातील कोयता आणि हातोडा असा सफाईदारपणे पकडतो की त्यातून कम्युनिस्ट पक्षाचे निवडणूक चिन्ह आपल्या मनावर बिंबवले जाते.

वास्तविक एखाद्या ईश्वर नावाच्या हमालाला १०८ क्रमांकाचा बिल्ला देऊनही चित्रपट काढता आला असता परंतु, चित्रपटाचे लेखक होते सलीम जावेद आणि कम्युनिस्ट आणि बॉलीवूडमध्ये उभ्या केलेल्या इकोसिस्टीममध्ये ईश्वर व १०८ या हिंदूंच्या पवित्र प्रतीकांना काडीचेही स्थान नव्हते. किंबहुना असा विचार करणे देखील बॉलीवूडमध्ये त्यावेळी भयंकर गुन्हा किंवा पाप मानले जात होते. वास्तविक सलीम जावेद यांनी यापूर्वी १९७५ च्या “मेरे पास माँ है” या डायलॉग मुळे प्रसिद्ध झालेल्या “दिवार” चित्रपटात “विजय” नावाच्या हमालाच्या दंडावर ७८६ क्रमांकाचा बिल्ला देण्याची क्लुप्ती वापरली होती.

चित्रपटात रहीम चाचा (युनुस परवेझ) विजयला सांगतात की, ७८६ हा आकडा मुस्लिमांसाठी शुभ (बिस्मिल्लाहचे प्रतीक) मानला जातो आणि जोपर्यंत हा बिल्ला त्याच्याकडे आहे, तोपर्यंत अल्लाह त्याचे रक्षण करेल. हिंदू असूनही हिंदू धर्मातील कोणत्याही देवावर किंवा प्रसादावर विश्वास न ठेवणाऱ्या विजयचा हा ७८६ क्रमांकाचा बिल्ला अनेकदा जीव वाचवतो. जेव्हा क्लायमॅक्समध्ये विजयकडे हा बिल्ला नसतो तेव्हा त्याला गोळी लागते आणि त्याचा मृत्यू होतो. थोडक्यात म्हणजे ७८६ चा बिल्ला हा विजयच्या कथेतील ‘लकी चार्म’ आणि सुरक्षेचे प्रतीक म्हणून दाखवण्यात आला होता. आता आपल्याला प्रश्न पडेल की दोन चित्रपटांमध्ये सलीम जावेद यांनी ७८६ चा बिल्ला दाखवण्याचे कारण काय?
तर “नॅरेटिव्ह” तयार करणे ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. तो एका रात्रीत उभा राहत नाही. जनतेच्या मनावर एखादी गोष्ट बिंबवण्यासाठी सर्व बाजूंनी दीर्घकाळ त्या नॅरेटीव्हचा मारा करावा लागतो आणि चित्रपट हे त्याच्यातील एक अत्यंत प्रभावी साधन आहे.
बॉलीवूडमधील कम्युनिस्ट आणि मुस्लिम मांदियाळीने जवळजवळ ४/५ दशके आपले “नॅरेटिव्ह” उभे करण्याचे काम अत्यंत कुशलतेने केले. त्यात कुठेही आपल्या देशाचा आत्मा असलेल्या सनातन हिंदू संस्कृतीचा गंधही नव्हता/नाही हिंदूंच्या क्षात्रतेजाचे दर्शन होते? आमच्या वैभवशाली इतिहासाचा आमच्या राष्ट्रपुरुषांचा त्यांच्या त्यागाचा मागमूस देखील नव्हता. उलट हिंदू समाजात आपण हिंदू असल्याबद्दल एक न्यूनगंडाची पराभवाची अपराधीपणाची भावना निर्माण व्हावी असेच सारे चित्रपट निघत होते. आणि मग बॉलीवूडमध्ये जमाना सुरू झाला “बड़े साहब” अर्थात देशद्रोही दाऊद इब्राहिमचा.

खून आणि खंडणीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना हवा असलेला देशद्रोही दाऊद इब्राहिम भारतातून १९८६/८७ साली मुंबईतून फरार झाला व दुबईत बसून मुंबईतील आपले खंडणी साम्राज्य गाजवू लागला. मुंबईतून खंडणीच्या रूपात मिळालेला अमाप पैसा तो परत बॉलीवूडमध्ये गुंतू लागला. बॉलीवूडमधल्या अनेक हिंदी चित्रपटांची निर्मिती दाऊद इब्राहिमच्या पैशावर होऊ लागली. त्याच्या एका इशाऱ्यावर बॉलीवूडचे अनेक चित्रपट निर्माते दिग्दर्शक कलावंत दुबईला पोहोचत होते. १९९२/९३ च्या मुंबईतील हिंदू मुसलमान दंगली व साखळी बॉम्बस्फोटानंतर त्याला “फरार देशद्रोही” म्हणून जाहीर करण्यात आले. पुढे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या ISI च्या सुरक्षा कवचात तो कराचीतील क्लिप्टन या भागात राहू लागला. मात्र बॉलीवूडमधील त्याची गुंतवणूक बिनदिक्कत सुरू होती. जणू दाऊद इब्राहिम आणि बॉलीवूड हे अद्वैतच झाले होते. त्यामुळे दाऊद इब्राहिम म्हणेल ते कथानक, दाऊद इब्राहिम म्हणेल तो नायक, दाऊद इब्राहिम ठरवेल ती नायिका. अक्षरशः सबंध बॉलीवूड दाऊद इब्राहिमच्या ताटाखालचे मांजर झाले होते. नविन चित्रपट फक्त “शुक्रवारी” च प्रदर्शित करायचा असा जणू बॉलिवूडचा अलिखित नियमच झाला होता.

मात्र सलमान खानने २००९ ला आपला वाँटेड हा चित्रपट ईदला प्रदर्शित केला आणि त्याने हा ट्रेंड २०२५ च्या ईद उल् फित्रला सिकंदर प्रदर्शित करेपर्यंत चालू ठेवला. मग शाहरुख खान तरी मागे कसा राहिल?

२०१३ साली त्यानेही आपला चेन्नई एक्सप्रेस हा चित्रपट ईदला प्रदर्शित केला.

दाऊद इब्राहिमच्या पैशावर चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांची दिग्दर्शकांची व कलावंतांची लाचारी आपण एकवेळ समजू शकतो. पण सुनील दत्त हे सत्ताधारी पक्षाचे खासदार असूनही देशद्रोही दाऊद इब्राहिम समोर नतमस्तक व्हावेत यापेक्षा बॉलीवूडची अजून अधोगती काय असू शकते?
आता तुम्ही विचार करा एका काफीरांच्या द्वेषाने बरबटलेल्या जिहादी मानसिकतेच्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या मर्जीने जर चित्रपट बनवायचा असेल तर त्याचे कथानक काय असेल? भाईला कोणते कथानक आवडेल हे न सांगताच निर्माता लेखक दिग्दर्शकांना कळत होते कारण शेवटी “दाम करी काम”.

दाऊद भाईने पोसलेल्या बॉलीवूडचा ताबा खानावळीने आपसूकच घेतला. हिंदू तरुण तरुणींचे आयकॉन सलमान आमीर आणि शाहरुख खान बनले. कळत नकळत भारतीय विशेषतः हिंदू तरुणाई या खानावळीच्या आहारी गेली.

जवळपास प्रत्येक हिंदी चित्रपटातील अगदी दिल्लीपासून अगदी गल्लीपर्यंत. स्मगलर असो किंवा चुटपुट गुंड मवाली खंडणीखोर गावगुंड. दुर्गुणांचा पुतळा आणि एहसान फरामोश असा तो खलनायक कपाळावर ठसठशीत केशरी टिळा लावलेला हिंदूच असला पाहिजे असा जणू अलिखित नियमच झाला होता. हवस का पुजारीच म्हटला जात होता. कधीच हवास का मौलवी किंवा फादर बॉलीवूडने दाखवला नाही.

आणि बॉलीवूडचा रहीम चाचा अर्थात साधारणपणे कोणतेही मुसलमान पात्र म्हणजे सदगुणांचा पुतळा इमानदार दिलेल्या शब्दाला पक्का जागणारा क्षमाशील दयाळू प्रेमळ सर्वस्वाचा त्याग करणारा.

धार्मिक श्रद्धांची चिरफाड करताना फक्त आणि फक्त हिंदूच्या धार्मिक श्रद्धांची चिरफाड केली जात होती. पुढची किमान ३ दशके बॉलीवूडमध्ये असेच सकल हिंदू समाजाचा तेजोभंग करणारे चित्रपट निघत होते. मानवता भाईचारा गंगा जमुना तहजीब याचे ज्ञानामृत जवळपास प्रत्येक चित्रपटातून बॉलीवूड हिंदू प्रेक्षकांना पाजत होते. आमची सनातन हिंदू संस्कृती सोडा पण “हिंदू” हा शब्द देखील बॉलीवूडच्या खिजगणतीत नव्हता. बाहेर समाजात वस्तुस्थिती मात्र वेगळी होती. समाजाचा अनुभव आणि बॉलीवूडचे कथानक यांच्यात दोन ध्रुवांएवढे अंतर होते. बॉलीवूडच्या चित्रपटांना ना वास्तवाचा आधार असायचा ना आमच्या सनातन संस्कृतीचा सुगंध.
तीच तीच प्रेम कहाणी… तेच ते सर्वगुणसंपन्न नायकाचे नायिकेसाठी झुरणे. नायिकेला आकर्षित करण्यासाठी खलनायकाशी हाणामारी करतानाचा बिभत्स हिंसाचार. तोकड्या कपड्यातील नायिकांचे गाणे आणि नाच अनेक वेळा तर परदेशी चित्रपटातील कॉपी केलेली गाण्यांची धून. एकाच छापाचे (stereotype) अनेक बटबटीत चित्रपट बॉलीवूडमध्ये लागोपाठ येत होते. वीररस सोडून बाकी सगळे रस बॉलीवूडच्या या चित्रपटांमध्ये ठासून भरलेले असत. अभाव होता तो फक्त आमच्या क्षात्रतेजाचा. हिंदू प्रेक्षकाचे मन आतल्या आत कुंठीत होत होते. चरफडत होते. मात्र तो असहाय्य होता. हतबल होता.
मात्र २०१४ साली या देशात एका सुखद परिवर्तनाची पहाट उजाडली. देशाच्या केंद्रस्थानी या देशाच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची हिंदू जनमानसाची दखल घेणारे सरकार स्थानापन्न झाले.

आणि “द केरला स्टोरी”, “उरी द सर्जिकल स्ट्राइक” यासारखे वास्तवाचा आधार असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. कोंडी फुटायला सुरुवात झाली होती. गुरुवार, ५ डिसेंबर २०२५ रोजी. निर्माता दिग्दर्शक आदित्यधर यांचा “धुरंधर” चित्रपट प्रदर्शित झाला.

पूर्णपणे वास्तवातील घटनांचा आधार घेत. त्यात चित्रपटाला आवश्यक असणारा बदल करत भारतीय क्षात्रतेजाचे आणि चाणक्यनीतीचे दर्शन घडवत. शत्रु देशाला “घुसके मारेंगे” चा संदेश देणारा हा चित्रपट भारतीय रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. या चित्रपटातील नायकाने भारतीय हेर हमझा अली मजारीने गाजवलेला पुरुषार्थ एखाद्या नायिकेच्या प्राप्तीसाठी नव्हता तर आपल्या मातृभूमीच्या सन्मानासाठी होता. शत्रुदेशावर सूड उगवण्यासाठी त्याने लावलेली आपल्या प्राणांची बाजी रसिकांच्या हृदयात कोरली गेली. पण निर्माता दिग्दर्शक आदित्य धरने प्रेक्षकांची उत्सुकता धुरंधरच्या दुसऱ्या भागासाठी ताणून धरली होती. अखेर गुरुवार, १९ मार्च २०२६ रोजी, “गुढीपाडव्या”च्या मुहूर्तावर… “धुरंधर २ Revenge” प्रदर्शित झाला आणि भारतीय गुप्तहेर हमझा अली मजारीने शत्रुराष्ट्रात घुसून घेतलेला बदला. कंदहार विमान अपहरणातील जहूर मिस्त्री या पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या तोंडून वदवलेले भारत माता की जय आणि “पाकिस्तान का मुस्तकबिल अब हिंदुस्तान तय करेगा” या डायलॉग.
पाकिस्तानात लपून बसलेल्या आणि भारताला हव्या असलेल्या आतंकवाद्यांची अज्ञातांनी केलेली धूळधाण. नोटबंदीने पाकिस्तानातील हजारो कोटी रुपयांच्या खोट्या चलनाची झालेली माती. ज्याच्या सावलीला देखील बॉलीवूड घाबरत होते. त्या बडे साहेब अर्थात दाऊद इब्राहिमला गलीतगात्र मरणासन्न अवस्थेत दाखवणे. आणि हमझा अली मजारीचे भारतात परत सुखरूप येणे. प्रेक्षकांनी अक्षरशः धुरंधर २ ला डोक्यावर घेतले.
शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले…

दोन्ही धुरंधर चित्रपटांनी बॉलिवूडचे अलिखित लिखित नियम आणि संकेत अक्षरशः मातीमोल करून टाकले. भारतीय चित्रपट सृष्टीचे सगळे मानदंडच बदलून टाकले. बॉलीवूडची गेल्या ७/८ दशकांची प्रस्थापित. हिंदूंच्या तेजोभंगाची. सकल हिंदू समाजाच्या क्षात्रतेजाच्या उपेक्षेची. कुसकी नासकी चौकट मोडून कराचीच्या सिंधू नदीत नेऊन बुडवली. जशी जगात कालगणना ही ख्रिस्त पूर्व आणि इसवी सन अशी केली जाते त्याचप्रमाणे आज बॉलीवूडचे सगळे निकष हे. धुरंदर पूर्व आणि धुरंदर नंतर असेच मोजले जाणार आहेत. हाच “धुरंदर” युरोपात प्रदर्शित झाला असता तर, युरोपच्या चित्रपटसृष्टीचा कायापालट करणारा रेनेसाँ (Renaissance) ठरला असता. १२ एप्रिल २०२६ पर्यंत धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर १७०० कोटींहून अधिक (Gross) कमाई केली आहे.
धुरंदरच्या अफाट यशाने संपूर्ण बॉलीवूड मुळापासून हादरले आहे. यापुढे या देशातील हिंदू जनमानसाची दखल घेतल्याशिवाय आपल्याला चित्रपट काढता येणार नाही आणि काढले तर ते चालणार नाहीत ही जाणीव झाल्यामुळे बडे साहब आणि खानावळीचे बॉलीवूड प्रचंड अस्वस्थ आहे. बॉलीवूडला अक्षरशः आग लागली आहे.
डोके ठिकाणावर असणाऱ्या बॉलीवूडमधील रामगोपाल वर्मा आणि रजनीकांत सारख्या दिग्गजांनी धुरंधरचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे तर बॉलीवूडमध्ये अक्षरशः आग लागली आहे.

मित्रा रणवीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर कार्यालयात जाऊन आद्यसरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन तू त्या आगीत अक्षरशः तेल ओतले आहेस. तुझ्या या भेटीने बॉलीवूड जळून खाक झाले आहे.