
पर्यावरणपूरक (Eco Friendly) गणेशोत्सव या ३ लेखांच्या लेखमालेतील पहिल्या २ लेखांमध्ये आपण शाडू मातीच्या व पीओपीच्या मूर्तीचे फायदे व तोटे पाहिले…
आजच्या या ३ऱ्या व अंतिम लेखात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल त्याच्या पर्यायांवर विचार करू…
एकंदरीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी… अपवादात्मक स्थिती सोडल्यास कोणत्याही परिस्थितीत पीओपीच्या मूर्ती नकोच… हाच निष्कर्ष निघतो…
तसेच मूर्तीला रासायनिक रंगांऐवजी हळद, कुंकू, मुलतानी माती अशा नैसर्गिक रंगांनी रंगवलेले असावे…

गोमय गणेश मूर्ती (शेणापासून बनवलेली गणपतीची मूर्ती) हा पर्यावरणाचे रक्षण करण्याचा एक अत्यंत पवित्र आणि इको-फ्रेंडली मार्ग आहे…
पाण्यात विसर्जन केल्यावर ही गोमय गणेश मूर्ती नदी किंवा विहिरीचे पाणी दूषित करत नाही… गर्दीच्या ठिकाणी न जाता घरच्या घरी कुंडीत, बादलीत किंवा बागेत विसर्जन करता येते…
घरच्या घरी बादलीत विसर्जन केल्यास मूर्ती अवघ्या काही तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळते… विसर्जनानंतर उरलेले पाणी आणि माती/शेण झाडांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणून वापरता येते… अनेक गोमय गणेश मूर्तींच्या आत तुळशी किंवा इतर वनस्पतींच्या बिया असतात… त्यामुळे विसर्जनानंतर तिथे
नवीन झाड उगवते… अशी मूर्ती निवडणे अधिक फायदेशीर ठरते… हिंदू संस्कृतीत गाईचे शेण (गोमय) अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले गेले आहे… त्यामुळे गोमय गणेश मूर्ती हा आजच्या घडीला एक सर्वोत्तम पर्याय मानता येईल…

तसेच कागदाच्या लगद्यापासून (Paper Pulp) बनवलेल्या गणेश मूर्ती हा पीओपीच्या मूर्तींना एक उत्तम, मजबूत आणि १००% पर्यावरणपूरक पर्याय आहे… या मूर्ती वजनाने अत्यंत हलक्या असतात, ज्यामुळे त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे होते…अधिक मजबूत: शाडूच्या मातीपेक्षा या मूर्तींची टिकण्याची क्षमता जास्त असते… त्यामुळे त्या हाताळताना तुटण्याची भीती खूप कमी असते… विसर्जनाच्या
वेळी या मूर्ती अवघ्या २ ते ३ तासांत पाण्यात पूर्णपणे विरघळतात…यामुळे जलस्रोत प्रदूषित होत नाहीत आणि जलचरांना कोणतीही हानी पोहोचत नाही… मूर्ती बनवण्याचे प्रमाण (घटक)व्यावसायिक किंवा चांगल्या दर्जाच्या मूर्ती बनवताना सहसा ८०% ते ९०% कागदाचा लगदा आणि १०% ते २०% शाडूची माती किंवा प्राकृतिक डिंक वापरला जातो, ज्यामुळे मूर्तीला उत्तम आकार आणि फिनिशिंग येते…
या मूर्ती हाताने तयार कराव्या लागतात… तसेच कागदाचा लगदा वाळण्यासाठी पीओपीपेक्षा खूप जास्त दिवस लागतात…
त्यामुळे या मूर्ती थोड्याशा महाग असल्या तरी पर्यावरणाच्या दृष्टीने गोमय गणेश मूर्तींसारखाच सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणता येईल…
अशा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती खरेदी करताना मूर्तीवर फक्त नैसर्गिक किंवा वनस्पतीजन्य रंगांचा वापर केला आहे का, याची खात्री करून घ्यावी…
अर्थात यासाठी मूर्तीकारांनी पुढाकार घेणे व गणेशभक्तांनी शाडू मातीच्या किंवा अन्य गोमय सारख्या पर्यावरणपूरक मूर्तींचा आग्रह धरण्याची नितांत आवश्यकता आहे…

तसेच आरास करण्यासाठी थर्माकोल आणि सिंगल-यूज प्लास्टिकचे विघटन होत नाही म्हणून त्यावर पूर्णपणे बहिष्कार घालण्याची आवश्यकता आहे… सजावटीसाठी रंगीत सुती कापड, पारंपरिक साड्या, दुपट्टे, बांबू किंवा कागदाचे कंदील आणि फुलांचा वापर करून अधिक आकर्षकपणा आणता येईल… गणपती बाप्पाच्या आजूबाजूला लहान कुंडीतील झाडे ठेवून आकर्षक आणि जिवंत आरास करता येते…
विसर्जनासाठी शाडूच्या मातीची मूर्ती घरातच एका मोठ्या बादलीत किंवा टबमध्ये विसर्जित करावी… मूर्ती विरघळल्यावर ते पाणी आणि माती घरातील झाडांना घालता येते…
सार्वजनिक गणेशोत्सवांसाठी कृत्रिम तलाव हा सर्वोत्तम पर्याय आहे… कारण शाडू मातीच्या मूर्ती बनवताना कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर करण्यात आला असेल तर जलस्त्रोतांचे प्रदूषण होऊन आपल्या मूळ हेतूलाच हरताळ फासला जातो… अनेक महानगरपालिका, नगरपालिका आता गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उपलब्ध करून देत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे…

पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्तीचे विसर्जन केले जाते… पण ते अनंत चतुर्दशीला इतर सार्वजनिक गणपतींप्रमाणे नदीत विसर्जन न करता एका खास परंपरेनुसार केले जाते…
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर… रात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटे या उत्सवमूर्तीचे मंदिराच्या आवारातच एका पाण्याच्या हौदात (टाकीत) शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन केले जाते… जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही मूर्ती नदीत विसर्जन न करता मंदिरातच विसर्जित करण्याची परंपरा ट्रस्टने जपली आहे…
आपण गणेशोत्सवाच्या दरम्यान पूजेचे सुकलेले हार आणि फुले (निर्माल्य) नद्या किंवा समुद्रात न फेकता… ते महानगरपालिकेच्या निर्माल्य कलशात जमा करावेत अथवा घरच्या घरी निर्माल्यापासून झाडांसाठी उत्तम सेंद्रिय खत (कंपोस्ट) तयार करता येते… त्याचाही प्रयोग करून बघायला हरकत नाही…
६ फुटांपर्यंतच्या सर्व पीओपी मूर्तींचे विसर्जन केवळ महानगरपालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच केले पाहिजे… या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये (उदा. समुद्र, तलाव किंवा नदी) विसर्जन करण्यास मनाई असते…

काही सार्वजनिक गणपती विसर्जन न करता दरवर्षी तसेच ठेवले जातात… या परंपरेला ‘अखंड मूर्ती’ किंवा ‘उत्सवी मूर्ती’ असे म्हणतात… दरवर्षी नवीन मूर्ती बसवण्याऐवजी किंवा विसर्जन करण्याऐवजी… त्याच मूळ मूर्तीची पूजा केली जाते आणि उत्सव संपल्यावर ती सुरक्षित जागी ठेवली जाते…
उदाहरणार्थ टिळकनगर, डोंबिवली येथील ‘डोंबिवली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ (टिळकनगरचा राजा) हे अखंड मूर्ती परंपरेसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे… १९३६ पासून सुरू झालेल्या या उत्सवात गेली अनेक दशके एकाच मूर्तीची
प्रतिष्ठापना केली जात आहे… तसेच कल्याणमधील ‘कल्याण सार्वजनिक गणेशोत्सव संस्था’ (सुभाष चौक) येथेही अनेक वर्षांपासून अखंड मूर्तीची पूजा करण्याची परंपरा सुरू आहे…
याव्यतिरिक्त, मुंबई (उदा. ठाकूरद्वार गिरगाव लालबाग परळ) आणि महाराष्ट्रातील अनेक उपनगरांमधील काही जुन्या संस्था किंवा चाळींमध्ये दरवर्षी शाडूच्या किंवा धातूच्या मूर्तीचे विसर्जन न करता… तीच मूर्ती वर्षानुवर्षे पूजेसाठी वापरली जाते…

मुंबईतील सर्वात जुने आणि लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने
१८९३ मध्ये सुरू झालेले पहिले सार्वजनिक गणेश मंडळ म्हणजे केशवजी नाईक चाळ गणेश मंडळ… या ऐतिहासिक चाळीत सुरुवातीच्या काळापासूनच एक आदर्श परंपरा पाळली जाते… इथे दरवर्षी मूर्ती बदलली जात नाही, तर शाडूच्या मातीची ठराविक आकाराची (सुमारे २ ते २.५ फूट) पारंपारिक मूर्ती पूजेसाठी वापरली जाते… उत्सवानंतर तिचे विसर्जन न करता, ती वर्षभर अतिशय आदराने सुरक्षित ठेवली जाते आणि पुढील वर्षी पुन्हा तिचीच प्रतिष्ठापना केली जाते…
आपल्यासाठी व आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरे करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते… यावर्षीपासून आपण भविष्यात कटाक्षाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याची शपथ घेऊया…
– पराग नेरूरकर