Monday, June 8, 2026

गुणी च गुणरागी च… छत्रपतींचा पुतळा इस्राएलमध्ये! 

Share

शनिवार, ०६ जून २०२६ रोजी शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इस्रायलमध्ये उभा करण्याची घोषणा झाली आहे. इस्रायलचे मुंबईतील कॉन्सल जनरल (वाणिज्यदूत) यानिव रेवाच यांनी एका ट्विटद्वारे ही घोषणा केली आहे.

यात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सहकार्य मागितले व ते त्यांनी तात्काळ देऊ केले असाही उल्लेख आहे. कौन्सल जनरल यांनी ट्विटचा शेवट ‘जय भवानी जय शिवाजी’ असा केला आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा इस्रायलमध्ये उभा राहणे ही अनेक अर्थांनी ऐतिहासिक घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अफाट आणि बहुआयामी कर्तृत्व बघता इस्रायल सरकारचा हा निर्णय किती तर्कसंगत आहे याची प्रचिती यानिव रेवाच यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रावरून येते.

यानिव रेवाच त्या पत्रात म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतर, इस्रायल सरकारने आपल्या दोन्ही देशांतील लोकांना अधिक जवळ आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आल्यानंतर मी मराठा साम्राज्याच्या इतिहासाविषयी वाचायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणूनच नव्हे, तर एक असाधारण नेते म्हणूनही पूजनीय मानले जाते. त्यांचे सुशासन, शौर्य, धार्मिक सहिष्णुता, नौदल सामर्थ्य आणि आपल्या प्रजेचे संरक्षण करण्याची दूरदृष्टी पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत आहे. त्यांच्या शौर्याने संपूर्ण भारतातील लोकांना प्रेरणा दिली.

मी भारतात जिथे कुठे प्रवास करतो, तिथे मला लोकांच्या डोळ्यांत इस्रायल आणि आपल्या राष्ट्रीय नायकांबद्दल प्रचंड आदर दिसतो. माझा विश्वास आहे की, आपण इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याच मैत्रीच्या भावनेतून, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाने इस्रायलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

आमचा विश्वास आहे की, इस्रायलमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा इस्रायल आणि भारत यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे एक प्रभावी प्रतीक ठरेल. महाराष्ट्र आणि भारतीय ज्यू समुदाय यांच्यातील ऐतिहासिक संबंध लक्षात घेता, असे स्मारक विशेषतः अर्थपूर्ण ठरेल; या समुदायाच्या अनेक वंशजांचे आज इस्रायली समाजात महत्त्वपूर्ण योगदान आहे.

या उपक्रमासाठी मी महाराष्ट्र सरकारकडे पाठिंब्याची आणि मार्गदर्शनाची विनंती करतो. ऐतिहासिक संदर्भ, कलात्मक सल्ला, आराखड्यासंबंधी विचार आणि हा महत्त्वाचा प्रकल्प साकार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या इतर कोणत्याही मदतीसाठी महाराष्ट्र सरकारसोबत सहकार्य करण्याची संधी मिळाल्यास आम्ही आभारी राहू. माझा विश्वास आहे की, पुढील टप्प्यात आपण याला एक लोकप्रकल्प बनवू शकतो. मला खात्री आहे की, हा उपक्रम आपल्या दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करेल आणि महाराष्ट्र व इस्रायल या दोन्ही देशांची ओळख असलेल्या शौर्य, नेतृत्व आणि परस्पर आदर या सामायिक मूल्यांना एक चिरस्थायी आदरांजली ठरेल.”…

या पत्रातील एकेका शब्दावरून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय अशा कर्तृत्वाची साक्ष पटते. आज ३५० वर्षानंतर देखील महाराजांच्या कर्तबगारीची भुरळ सातासमुद्रापलीकडे इस्त्राएलला पडावी, हीच त्यांच्या 

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
नीतिवंत पुण्यवंत । जाणता राजा ॥

अर्थात ‘जाणता राजा’ असण्याची पोचपावती आहे.

‘शौर्य’ अर्थात अतुलनीय असे हेरखाते, गनिमी कावा, क्षात्रतेज, स्वधर्माभिमान, अचूक असा मित्रबोध व शत्रुबोध.. असे छत्रपती शिवाजी महाराज आणि इस्रायलमधील अनेक समान दुवे आहेत.

या पत्राचे ‘बिटवीन द लाइन्स’ असे वाचन केले तर ‘काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती;  अगर शिवाजी न होते, तो सुन्नत सबकी होती’.. या कवी भूषण यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय अशा ‘धार्मिक सहिष्णुते’चे (म्हणजेच खऱ्याखुऱ्या ‘सेक्युलरिझम’चे) कौतुक केले आहे.

अशा साऱ्या पार्श्वभूमीवर इस्रायलसारख्या शत्रूंचा वेढा असणाऱ्या आणि डोळ्यांत तेल घालून आपले स्वातंत्र्य टिकविणाऱ्या तसेच शत्रूला वारंवार पाणी पाजणाऱ्या राष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची भुरळ न पडते तरच नवल.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य सर्वांना ओळखता आलेले नाही. इस्रायल सरकारला मात्र ते ओळखता आले, याबद्दल त्यांचे कौतुकच केले पाहिजे.

नागुणी गुणिनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी।
गुणी च गुणरागी च विरलः सरलो जनः॥

असे सुभाषितकारांनी म्हटलेच आहे. याचा अर्थ, जो स्वतःही गुणी आहे आणि इतरांच्या गुणांचाही आदर करतो, असा सरळ आणि निष्कपट माणूस जगात विरळाच.

इस्रायल हा एक राष्ट्र म्हणून स्वतः गुणी व पराक्रमी आहेच. अशा या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचा व पराक्रमाचा जो सन्मान केला आहे, याबद्दल इस्रायल सरकारचे करावे तितके कौतुक थोडेच आहे! आज राष्ट्रप्रेमी भारतीय नागरिकांप्रमाणेच इस्रायलमधील राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या ओठीही ‘जय भवानी, जय शिवाजी..’ हीच युगानुयुगे प्रेरणा देणारी गर्जना असेल!!!

अन्य लेख

संबंधित लेख