Tuesday, July 7, 2026

सिया पॉइंट : हरवलेल्या संवेदनांची मानसिकता

Share

सह्याद्रीचे उत्तुंग कडे आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले हे केवळ दगड-धोंड्यांचे वास्तूविशेष नाहीत, तर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या हजारो मावळ्यांच्या रक्ताने, घामाने आणि त्यागाने पावन झालेली आपल्या राष्ट्रीय अस्मितेची जिवंत तीर्थक्षेत्रे आहेत. परंतु दुर्दैवाने, याच पवित्र भूमीवर, किल्ले लोहगडावर नुकतीच एक अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी गुन्हेगारी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी लोहगड किल्ल्यावरून केतन अग्रवाल या २६ वर्षीय तरुणाला कड्यावरून ढकलून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक गुन्ह्यात त्याच्याच वाग्दत्त वधूने म्हणजे होणाऱ्या पत्नीने-सिया गोयलने- तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने हा पूर्वनियोजित कट रचून अमलात आणल्याचे तपासात समोर आले आहे. ज्या पवित्र मातीने केवळ पराक्रमाचा, शौर्याचा आणि त्यागाचा इतिहास अनुभवला, तिथे अशा क्रूर आणि काळिमा फासणाऱ्या कृत्याचा डाग लागावा, हीच मुळी संपूर्ण समाजाला अस्वस्थ करणारी बाब आहे. परंतु, याहूनही अधिक वेदनादायी आणि धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर आपल्या सुजाण म्हणवणाऱ्या समाजाने डिजिटल माध्यमांवर दिलेली तितकीच विकृत प्रतिक्रिया होय!

हरवलेली करुणा आणि विवेकबुद्धी
एखादी भयंकर शोकांतिका किंवा कायदेशीर गुन्हा घडल्यानंतर तिथे सहसंवेदनशीलतेने उभे राहण्याऐवजी, त्या जागेचे थेट बाजारीकरण करणे ही कुठली संस्कृती आहे? गुन्हेगारी प्रवृत्तीने जे कृत्य केले ते कायद्याच्या चौकटीत अक्षम्य आणि सर्वोच्च शिक्षेस पात्र आहेच, पण त्यानंतर समाजमाध्यमांवर सुरू झालेला रील्स, मीम्स, विनोद आणि सनसनाटी व्हिडिओंचा सुळसुळाट आपल्या समाजाच्या वैचारिक दारिद्र्याची आणि नैतिक अधःपतनाची साक्ष देतो.

“ज्या कड्यांनी कधी स्वराज्याच्या संरक्षणाचे कडेकोट कवच बनून परकीय शत्रूला रोखले, त्याच ऐतिहासिक गडावरील एका गुन्हा घडलेल्या जागेला ‘सिया पॉइंट’ म्हणून संबोधित करणे आणि त्याचे पर्यटनाच्या नावाखाली बेछूट व्यावसायिकीकरण करणे, यात आपली सामाजिक संवेदनशीलता नेमकी कुठे हरवली आहे?” केवळ विकृत कुतूहल आणि सोशल मीडियावरील व्ह्यूज किंवा लाईक्स मिळवण्याच्या मोहापोटी अशा गुन्हा घडलेल्या स्थळाचे आकर्षण निर्माण करणे आणि तिथे पर्यटकांनी गर्दी करणे म्हणजे समाजातील करूणा आणि सदसद्विवेक बुद्धीचा अंत झाल्यासारखेच आहे. ऐतिहासिक वारशाचे हे असे विकृत बाजारीकरण अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे.

महासंघाची मागणी : कायदेशीर धोरणाची गरज
अशा ढासळत्या सामाजिक आणि डिजिटल मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने (AMGM) किल्ले लोहगडावरील दुर्दैवी गुन्हेगारी घटनेनंतर, गडाची सुरू असलेली बदनामी आणि वाढते बेजबाबदार व्यावसायिकीकरण रोखण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांकडे तातडीने धोरणात्मक हस्तक्षेपाची मागणी केली आहे.
लोहगड हा केवळ सामान्य पर्यटनस्थळ नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा ऐतिहासिक साक्षीदार आणि लाखो शिवप्रेमींचे श्रद्धास्थान आहे. एखाद्या अपवादात्मक गुन्हेगारी घटनेवरून गडावरील कड्याचे “सिया पॉइंट” असे चुकीचे नामकरण करून, सोशल मीडिया व गुगल मॅपवर त्याचे सनसनाटीकरण करणे हा आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा अवमान आहे.

गडांचे ऐतिहासिक संदर्भ, पावित्र्य आणि पर्यावरण धोक्यात आणणारे व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, रील्स आणि जाहिरातींचे चित्रीकरण पूर्णपणे थांबवण्यासाठी सरकारने कडक आचारसंहिता लागू करावी, अशी महासंघाची आग्रही भूमिका आहे. डिजिटल माध्यमांवरील आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे उल्लेख तातडीने हटवून, महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक वारशाचे जतन व संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कठोर कायदेशीर तरतुदींसह एक दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखणे अत्यंत आवश्यक आहे. “सिया पॉइंट” सारखे सर्व आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे डिजिटल उल्लेख तात्काळ हटविण्यात यावेत. यासंदर्भातील महासंघाने खालील मागण्या केल्या आहेत.


• Google Maps आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरील चुकीची नामकरणे रद्द करण्यात यावीत.
• ऐतिहासिक वारशाची बदनामी करणाऱ्या डिजिटल आशयाविरुद्ध स्वतंत्र धोरण तयार करण्यात यावे.
• गड-किल्ल्यांवरील व्यावसायिक प्री-वेडिंग शूट, रील्स, जाहिराती व तत्सम चित्रीकरणासाठी स्पष्ट नियमावली जाहीर करण्यात यावी.
• नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
• महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या सन्मान व पावित्र्याच्या संरक्षणासाठी दीर्घकालीन राज्यस्तरीय धोरण आखण्यात यावे.
आपण इतिहासाला काय उत्तर देणार?

आज एक शिवरायांचे पाईक आणि निस्सीम भक्त म्हणून प्रत्येकाने अस्वस्थ व्ह्यायला हवे आहे. ज्या नाणे मावळ आणि पवन मावळच्या दुर्गम भागात स्वराज्य स्थापनेसाठी वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे आणि येसाजी कंक यांसारख्या शूर मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली; ज्या गडाला मुघलांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी आपल्या अजोड नेतृत्वाने पराक्रम गाजवून पुन्हा भगवा फडकवला; आणि ज्या किल्ल्यावर सरसेनापती नेताजी पालकर यांनी सुरतेहून आणलेला स्वराज्याचा पवित्र खजिना लक्ष्मी कोठी इथे अत्यंत निष्ठेने सुरक्षित ठेवला…

त्या पराक्रमी आणि पवित्र लोहगडावर आता आपण या शूरवीर मावळ्यांचा इतिहास विसरून एका गुन्हेगाराच्या नावावरून ‘सिया पॉइंट’ लक्षात ठेवणार आहोत का? कारण हा प्रश्न केवळ एका गडाचा किंवा एका नावाचा नाही, तर हा आपल्या हिंदवी स्वराज्याची मशाल अजून देखील प्रत्येकाच्या मनात पेटती असण्याचा आणि छत्रपतींच्या चरणांशी प्रामाणिक राहण्याचा आहे!

– मैत्रेयी गोडसे

अन्य लेख

संबंधित लेख