Friday, July 24, 2026

जलेस्मिन् सन्निधिं कुरु…

Share

हर बूंद जिंदगी का – लेखमाला

मानवी संस्कृतीचा विकास, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वतता राखण्यासाठी पाणी हा सर्वात मूलभूत आणि संवेदनशील नैसर्गिक घटक आहे. तथापि, वाढती लोकसंख्या, जलद गतीने होणारे औद्योगिकीकरण आणि हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर गोड्या पाण्याच्या उपलब्धतेवर अभूतपूर्व ताण निर्माण झाला आहे. यासाठी शासन पातळीवर वेळोवेळी वेगवेगळ्या धोरणांना, उपक्रमांना, अभियानांना राबवण्यात आले आहे. सध्या याचसाठी भारत सरकारने ‘Catch the Rain’ हे नवे अभियान सुरू केले आहे. त्या निमित्ताने, सध्याचा आपला पाण्याचा वापर, आवश्यकता, पाणी प्रश्न, पाणी वितरण, नद्यांचे महत्त्व अशा अनेक विषयांवर आपण चर्चा करणारी ‘हर बूंद जिंदगी का’ नावाने एक ११ लेखांची माला सुरू करत आहोत.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2286237&reg=48&lang=1

प्राचीन जल संस्कृती आणि मानवी मानसिकता

मागील भागात आपण ‘पाण्याच्या पाऊलखुणा’ या लेखात पाण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापराबद्दल चर्चा केली होती. या लेखात भारतीय प्राचीन संस्कृतीमधील पाण्याविषयीचा दृष्टिकोन चर्चिला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पाणी अर्थात ‘आप’ पंचमहाभूतांपैकी एक आहे. पाण्याला केवळ एक भौतिक किंवा रासायनिक घटक न मानता, त्याला सजीव, चैतन्यमय आणि दैवी शक्ती मानले गेले आहे. प्राचीन काळापासून प्रत्येक पवित्र कार्यात आणि दैनंदिन स्नानाच्या वेळी म्हटला जाणारा मंत्र—”गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति। नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन् सन्निधिं कुरु॥”—या भूतलावरील पवित्र जलप्रवाहांना आपण वापरत असलेल्या पाण्यात सामावून घेण्याची प्रार्थना करतो. हा मंत्र मानवी अस्तित्वाचे निसर्गाशी असलेले अद्वैत आणि पाण्याचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करतो. अमरकोषामध्ये पाण्याचे वर्णन करताना पाणी हेच प्रत्यक्ष अमृत आणि संपूर्ण विश्वाचे ‘जीवन’ आहे.

प्राचीन लोकांची मानसिकता निसर्गाशी पूर्णपणे सुसंगत अशी होती. पाणी हे देवतेचे रूप असल्याने त्याचा अपव्यय करणे किंवा ते अशुद्ध करणे हा मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक अपराध मानला जात असे. या मानसिकतेतूनच दैनंदिन जीवनात पाण्याचे पावित्र्य राखण्यासाठी अनेक नियम व प्रथा विकसित झाल्या. 

वैदिक संस्कृति

वैदिक वाङ्मयात जलसंवर्धन आणि पर्जन्यचक्राचे नियंत्रण करणाऱ्या विविध नैसर्गिक शक्तींना देवतेचे रूप देऊन त्यांची स्तुती करण्यात आली आहे. ऋग्वेदातील विविध सूक्ते मानवी कल्याणासाठी पाण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकतात. ऋग्वेदानुसार, इंद्र हा पर्जन्याचा आणि ढगांचा अधिपती आहे. वृत्रासुर या दुष्काळाच्या आणि पाण्याचे मार्ग रोखणाऱ्या राक्षसाचा वध करून इंद्राने सात नद्यांचे जल मोकळे केले, अशी पौराणिक रूपके निसर्गातील पाण्याच्या प्रवाहाची अडवणूक दूर करण्याचे महत्त्व अधोरेखित करतात. वरुण हा वैश्विक जल आणि नैतिक नियमांचा अंतिम रक्षक आहे. समुद्राची पातळी नियंत्रित राखणे, नद्यांना त्यांच्या पात्रातून वाहण्याची दिशा देणे आणि विश्वातील जलसंतुलन राखणे ही वरुणाची प्रमुख कार्ये मानली गेली आहेत. पाऊस पाडण्यासाठी पर्जन्य सूक्ताची रचना दिसते. याचा अर्थ, पाण्याचे दुर्भिक्ष्य पूर्वीही जाणवले आणि त्यावर त्या संस्कृतीत उपाययोजना देखील केल्या गेल्या. वैदिक संस्कृतीत गंगा आणि सरस्वती या नद्यांना केवळ पाण्याचे प्रवाह न मानता माता आणि ज्ञानाचे उगमस्थान मानले गेले आहे.

नदीमातृक आणि देवमातृक संकल्पना

मुळात देशाचा भौगोलिक आणि आर्थिक विकास पाण्यावर अवलंबून आहे, याचे उल्लेख प्राचीन भारतीय अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान ग्रंथात दिसतात. कौटिलीय अर्थशास्त्रात जमिनीचे प्रामुख्याने दोन भागांत वर्गीकरण आढळते.

  • देवमातृक भूमी : ज्या भूभागातील शेती आणि जनजीवन पूर्णपणे पावसाच्या (मेघांच्या) पाण्यावर अवलंबून असते, त्याला ‘देवमातृक देश’ म्हटले जाते. या प्रदेशातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे येथील आर्थिक स्थैर्य अनिश्चित असायचे.
  • नदीमातृक भूमी : ज्या जमिनीला सिंचनासाठी नद्या, कालवे, तलाव आणि विहिरी यांसारखे बारमाही जलस्रोत उपलब्ध असतात, त्याला ‘नदीमातृक देश’ म्हटले जाते. नदीमातृक प्रदेशातील प्रजा केवळ पावसावर अवलंबून न राहता स्वतःच्या यत्नाने जल व्यवस्थापन करते.

त्यामुळे कौटिल्य अर्थशास्त्रानुसार, राजाने आपल्या राज्याला ‘अदेवमातृक’ म्हणजेच केवळ पावसावर अवलंबून न राहणारा देश बनवण्यासाठी कृत्रिम जलाशय, विहिरी आणि बारव बांधणे बंधनकारक होते.

प्राचीन महाराष्ट्रातील जल व्यवस्थापन

महाराष्ट्राला यादव, राष्ट्रकूट आणि सातवाहन काळापासून अत्यंत प्रगत जल स्थापत्यशास्त्राची परंपरा लाभली आहे. विशेषतः खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम व शुष्क भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या ‘बारव’ (पायविहिरी) हे या स्थापत्यकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत.

  • बारव आणि पुष्करिणींचे स्थापत्य : नाशिक जिल्ह्यातील सटाणा (बागलाण) भागामध्ये अनेक राष्ट्रकूटकालीन आणि होळकर शैलीतील बारव आढळतात. या बारवांचे बांधकाम दगडात पायऱ्यांच्या स्वरूपात केलेले असून विहिरीत उतरण्यासाठी दोन बाजूंनी सुंदर कमानी आणि सोपान मार्ग असतात. जमिनीतील जिवंत झऱ्यांचा शोध घेऊनच त्यांचे उत्खनन केले जात असे. तसेच, धार्मिक विधींसाठी पुष्करिणीचा वापर होत असे.
  • साती आसरा लोकश्रद्धा: महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत बारव आणि विहिरींच्या ठिकाणी ‘साती आसरा’ (सात जलअप्सरा किंवा जलदेवता) यांची पूजा करण्याची प्रथा आजही कायम आहे. या सात बहिणी पाण्याच्या आसपास राहतात आणि जलस्रोतांचे रक्षण करतात, अशी ग्रामीण भागातील लोकांची दृढ श्रद्धा आहे. लग्न झालेल्या मुली माहेरी आल्यावर पाणवठ्याचे रक्षण करणाऱ्या या आसरांची नारळ आणि हळदी-कुंकवाने पूजा करतात. विहिरीचे पाणी आटू नये किंवा पाणी दूषित होऊ नये म्हणून अमावस्येला किंवा सणावाराला आसरांना नैवेद्य दाखवला जातो. या प्रथा पाळल्या गेल्या कारण, पाण्याचा स्त्रोत दूषित केल्यास जलदेवतांचा कोप होईल अशी भीती लोकांच्या मनात असायची.
महाराष्ट्रातील नद्यांची सद्यस्थिती

ऐतिहासिक काळातील समृद्ध जलसंस्कृती आणि निसर्गाप्रती असलेल्या आदराचा अभाव यामुळे आज महाराष्ट्रातील नद्या अत्यंत बिकट अवस्थेतून जात आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्यांचे पट्टे हे महाराष्ट्र राज्यात आहेत. राज्यातील एकूण ६०३ पैकी ३११ नद्यांचे क्षेत्र बाधित आढळले असून ५५ नद्या जलप्रदूषणाने अत्यंत बेजार झाल्या आहेत. या प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. मात्र, या प्रदूषणामुळे केवळ नद्यांमधील जलचरच नष्ट होत नसून नदीकाठच्या विहिरी आणि कूपनलिकांचे भूजलही विषारी बनले आहे, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कॉलरा, कावीळ आणि टायफॉइड यांसारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, पाण्यातील देवत्वाच्या भावनेचा स्वीकार करून प्रत्येक नागरिकाने जलरक्षक बनल्याशिवाय महाराष्ट्रातील नद्या पुन्हा एकदा वाहत्या आणि जिवंत होणे अवघड आहे.

पुढील, भागात आपण महाराष्ट्रातील नद्यांविषयी अधिक माहिती घेऊया.

Catch the Rain | Official Theme Song

PIB India

Table of contents

अन्य लेख

संबंधित लेख