शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांसह सात पदाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. शिस्तभंग केल्यामुळे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या सर्व पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पालघर जिल्ह्यात ‘गोविंदा’च्या (दहीहंडी उत्सवातील सहभागी) उपचारावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका डॉक्टरास मारहाण केल्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पालघर रेल्वे हॉस्पिटल कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह ७ जणांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर, शहरप्रमुख राहुल घरत यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुल घरत यांना अटक केली आहे. या प्रकरणात कुंदन संखे आणि राहुल घरत यांच्यासह एकूण १७ जणांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उर्वरित १६ जणांची पोलीस चौकशी सुरू असून, तपासानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
एकनाथ शिंदेंचा इशारा आणि कठोर कारवाई
या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी कालच प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. “आम्ही अशा प्रकारच्या मारहाणीचे अजिबात समर्थन करत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच पक्षाकडून जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि आमदाराच्या पुत्रासह ७ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.