तरुण पिढीच्या सामाजिक आणि नैतिक अस्तित्वाची धोक्याची घंटा
नवरात्र आणि गरबा म्हटलं की, उत्साह, भक्ती, कला, संगीत आणि संस्कृतीचे एक सुंदर रूप डोळ्यांसमोर येते. एकत्र येऊन रात्रभर गरबा, दांडिया खेळणं आणि देवीच्या समोर रात्र जागवणं हा या उत्सवाचा मूळ आत्मा आहे. हळू हळू यात बदल होतं गेले. पण, गेल्या २-३ दिवसांत सोशल मिडियावर व्हायरल होत असलेले एक पोस्टर अत्यंत चिंताजनक चित्र समोर आणत आहे. “गरबा नाईटसाठी पार्टनर भाड्याने मिळेल” अशा आशयाची जाहिरात सध्या ट्रेंड करत आहे, तासांच्या हिशोबाने मुली किंवा मुलगे पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्याच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, यामागील सत्यता, आयोजक आणि सायबर गुन्हेगारीच्या याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा जाहिराती केवळ आर्थिक फसवणूक किंवा सायबर गुन्ह्यांनाच आमंत्रण देत नाहीत, तर महिलांच्या सुरक्षिततेलाही मोठ्या धोक्यात आणतात.
नात्यांचे बाजारीकरण आणि संवादाचा दुष्काळ
या घटनेकडे केवळ एका सोशल मीडिया ट्रेंड किंवा सायबर फ्रॉडच्या दृष्टीने पाहून भागणार नाही. ही बाब आपल्या समाजातील तरुण पिढीच्या मानसिकतेवर आणि नात्यांच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकते. मानवी भावना, ओळख आणि मैत्री या अत्यंत संवेदनशील गोष्टींचे जर अशाप्रकारे तासांच्या हिशोबाने बाजारीकरण होणार असेल, तर हा प्रकार कोणत्याही सुजाण समाजासाठी धोक्याचा इशारा आहे.
उत्सव हे लोकांमध्ये आपुलकी, सामाजिक बांधिलकी आणि संवाद वाढवण्यासाठी असतात. मात्र, डिजिटलायझेशनच्या युगात तरुण पिढीमध्ये ‘अभासी एकाकीपण’ इतके वाढले आहे की, चार लोकांसोबत गरबा खेळण्यासाठी किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी त्यांना ‘पार्टनर भाड्याने’ घेण्याची गरज वाटू लागली आहे. ही परिस्थिती तरुणाईतील वाढत्या एकाकीपणाची आणि कृत्रिम आभासी जगाच्या प्रभावाची निदर्शक आहे.
मॉरल पोलिसिंग नाही, तर सुरक्षिततेची आणि विवेकाची गरज
येथे मुद्दा कोणाच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर बंधने आणण्याचा किंवा ‘नैतिक पोलिसगिरी’ करण्याचा अजिबात नाही. प्रत्येकाला उत्सव कसा साजरा करावा याचे स्वातंत्र्य आहे. परंतु, जेव्हा संस्कृतीच्या नावाखाली अशा प्रकारची अनियंत्रित व्यावसायिकता घुसते, तेव्हा त्यातून सुरक्षा, गोपनीयता आणि नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो.
सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर –
अनोळखी व्यक्तींना केवळ पैशांच्या मोबदल्यात सोबती बनवणे हे विशेषतः तरुण-तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत जोखमीचे आहे. अशा जाहिरातींमागे महिलांची फसवणूक करणारे किंवा मानवी तस्करी/शोषणाशी संबंधित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आर्थिक व सायबर फसवणूक –
बहुतांश वेळा अशा जाहिराती केवळ ‘फिशिंग लिंक्स’ किंवा पेमेंटच्या नावाखाली नागरिकांना लुटण्यासाठी तयार केलेल्या बनावट जाहिराती असतात.
सामाजिक जबाबदारी आणि विचार करण्याची वेळ
तरुणाई जर अशा तात्पुरत्या आणि व्यावसायिक तात्कालिक उपायांकडे आकर्षित होत असेल, तर ही आपल्या सामाजासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. आज डिजिटल जगाने माणसांना एकमेकांच्या जवळ आणण्याऐवजी मानवी संबंधांची व्याख्याच बदलून टाकली आहे. पैशांनी सर्व काही विकत घेता येते, या भ्रमात नात्यांची आणि मानवी मूल्यांची होणारी ही घसरण थांबवणे गरजेचे आहे.
पालक, समाज आणि स्वतः तरुणाई यांनी या प्रकारांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आभासी जगातल्या ‘लाईक्स’ आणि ‘शो-ऑफ’पेक्षा खऱ्याखुऱ्या मानवी संवादाला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. प्रशासनाने अशा प्रकारांवर कडक कायदेशीर कारवाई करावीच, पण त्यासोबतच समाजानेही आपल्या विवेकाची आणि विचारसरणीची पातळी ढासळणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.