जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने शानदार कामगिरी करत तिन्ही स्थानांवर आपल्या कौशल्याची मोहोर उमटवली. पुरुषांच्या शॉट पुट (गोळाफेक) F46 प्रकारात सचिन सर्जेराव खिलारीने सुवर्ण, मोहम्मद यासरने रौप्य आणि परवीनने कांस्यपदक जिंकले.
आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये महिलांच्या ‘शॉट पुट एफ३४’ (Shot Put F34) प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल महाराष्ट्राची कन्या भाग्यश्री जाधव हिचे खूप खूप अभिनंदन! असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावरील संदेशात काढले आहेत.
https://x.com/Dev_Fadnavis/status/2112793117103734824
खिलारीने १५.८७ मीटर अंतरापर्यंत गोळा फेकून नवा विक्रम प्रस्थापित केला आणि भारताच्या या विजयाचे नेतृत्व केले. यासरने १५.०६ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह रौप्यपदक मिळवले, तर परवीनने १४.९४ मीटर अंतरासह कांस्यपदक पटकावले. या सर्व खेळाडूंनी आपापल्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी (सीझन बेस्ट) नोंदवली, ज्यामुळे भारतासाठी हा एक अविस्मरणीय विजय ठरला.
आयची-नागोया येथेच, पुरुषांच्या हाय जंप (उंच उडी) T44/64 प्रकारात भारताच्या प्रवीण कुमारने गेम्स रेकॉर्डसह सुवर्णपदक जिंकले, तर बंटीने याच प्रकारात रौप्यपदक मिळवले. प्रवीणने २.०५ मीटरची उंची ओलांडून सुवर्णपदक पटकावले, तर बंटीने १.९२ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत रौप्यपदक आपल्या नावे केले. उझबेकिस्तानच्या तैमुरबेक गियाझोव्हने १.८६ मीटरच्या कामगिरीसह तिसरे स्थान मिळवले.
आयुष वर्माने पुरुषांच्या शॉट पुट F53 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. आयुषने आपल्या पाचव्या प्रयत्नात ८.१६ मीटर अंतरापर्यंत गोळा फेकून अव्वल स्थान पटकावले. इराणच्या अलीरेझा हेमामीने ८.०९ मीटरसह दुसरे, तर कझाकस्तानच्या मखांबेत सेरिकालीयेव्हने ६.८१ मीटरसह तिसरे स्थान मिळवले. F53 हा प्रकार अशा खेळाडूंसाठी असतो, ज्यांच्या शरीराच्या मध्यभागाची (ट्रंक) आणि पायांची हालचाल मोठ्या प्रमाणात बाधित असते, तर हातांची पकड (हँड ग्रिप) कमी प्रमाणात बाधित असते.
पॅरा-आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धेत, भारताच्या शीतल देवी आणि पायल नाग या किशोरवयीन जोडीने कंपाउंड महिला दुहेरी प्रकारात रौप्यपदक जिंकले. जन्मापासून हात नसलेली शीतल आणि ज्यांचे चारही अवयव (हात-पाय) निकामी आहेत अशी पायल, अंतिम फेरीत चीनच्या जू शुएकिंग आणि झाओ जिंग या जोडीकडून १४१-१५० अशा फरकाने पराभूत झाल्या. गेम्सच्या मागील आवृत्तीत सरिता देवीसोबत जोडी करत शीतलने या प्रकारात रौप्य पदक जिंकले होते.
पुरुषांच्या १०० मीटर टी३५ (T35) प्रकारात अनुभव चौधरीने कांस्य पदक पटकावले. त्याने १२.७२ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत हे पदक जिंकले. तसेच, पुरुषांच्या १०० मीटर टी३७ (T37) प्रकारात राकेशभाई भट्टनेही कांस्य पदक मिळवले.