
कोणताही सण जेव्हा लोकांच्या वैयक्तिक भावनांच्या सामूहिक अभिव्यक्तीचे माध्यम ठरतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने समाजमनाचे प्रतिबिंब ठरत असतो. महाराष्ट्रातला गणेशोत्सव आणि बंगालमधली दुर्गापूजा यानिमित्ताने उभारले जाणारे सार्वजनिक पंडाल आणि तेथील विविध देखावे ही अशीच जनसामान्यांच्या भावनांची अभिव्यक्ती असते असे म्हणता येईल.
बंगालमध्ये दुर्गापूजा हा फक्त धार्मिक उत्सव नाही. पंडाल हे तिथे कला, इतिहास आणि सामाजिक जाणिवेचे सार्वजनिक व्यासपीठ आहे. दरवर्षी हजारो समित्या एखादी संकल्पना निवडतात आणि लाखो लोक ती पाहायला रस्त्यावर उतरतात. म्हणूनच पंडालमधून समाजाच्या मनात काय चालले आहे याचा काही अंदाज बांधता येतो. यंदाची पूजा राज्यात सत्तांतर झाल्यानंतरची पहिली पूजा आहे. या पार्श्वभूमीवर सजावटीत कोणती सांस्कृतिक अभिव्यक्ती ठळक झाली आहे हे पाहणे महत्वाचे ठरते.
राष्ट्रीय स्मृतींचे ठळक रूप
कोलकात्यातील संतोष मित्र स्क्वेअर हा यंदाच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. आपल्या ९१ व्या वर्षातील पूजेसाठी या समितीने ‘वंदे मातरम्’ ही संकल्पना घेतली, कारण बंकिमचंद्र चटर्जी यांच्या राष्ट्रगीताला यंदा १५० वर्षे झाली. पंडालमध्ये स्वातंत्र्यलढा आणि फाळणीचा वारसा मांडला आहे, तसेच खुदिराम बोस आणि मातंगिनी हाजरा यांना आदरांजली वाहिली आहे. प्रवेशद्वारावर भारताचा भव्य नकाशा आहे. वंदे मातरम या गीताचा जन्म याच मातीत झाला, आणि त्याचा प्रवास आम्हाला या पंडालमधून मांडायचा आहे, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे 66 पल्ली, कालीघाट, कांकुरगाची मिलन मेला समिती इत्यादी पंडालांमध्ये देखील वंदे मातरम् याच संकल्पनेवर आधारित देखावे उभे केले गेले होते.
कोलकात्यातील सुरुची संघाने श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जीवन आणि वारसा आपल्या देखाव्यामध्ये मांडला आहे. फाळणीच्या दुःखद आठवणी, क्रांतिकारकांचे बलिदान आणि बंगालच्या नेत्यांचे योगदान या सर्व गोष्टी लोकांच्या स्मृतीत होत्याच, आता पंडालच्या रूपाने त्या सार्वजनिक सजावटीचा भाग बनल्या आहेत.

श्रद्धा आणि पुराणकथांचे आविष्कार
राष्ट्रीय स्मृतींबरोबरच श्रद्धेचे आविष्कारही ठळक आहेत. अलीपूर सार्वजनिक दुर्गोत्सवाने ‘रामायण’ ही संकल्पना घेतली आहे. त्यात रामाचा वनवास ते ‘अकाल बोधन’ असा प्रवास दाखवण्यात आहे. अकाल बोधन म्हणजे रावणाशी युद्ध करण्यापूर्वी रामाने केलेली देवीची अवेळी आराधना. हीच आराधना शरद ऋतूतील दुर्गापूजेचे पौराणिक मूळ मानली जाते. चोरेबागान सार्वजनिक समितीनेही हीच संकल्पना घेतली आहे.
मानिकतळा चलताबागान पूजेची संकल्पना ‘निशान’ आहे. ती छत्तीसगडच्या अंगावर रामनामाची गोंदणे करणाऱ्या रामनामी समाजाची कथा सांगते. तर एकदलिया एव्हरग्रीनने गुजरातच्या सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. सिलिगुडीच्या सुब्रत संघाने ‘आदि शक्ती’ संकल्पनेत शिवाची मूर्ती आणि कैलासाची प्रतिकृती उभारली आहे. देवीची कथा, शक्तीचे विश्वात्मक रूप आणि पुराणकथा यांकडे थेट वळण यातून दिसते.
दुर्गापूजा पंडालांमधील देखाव्यांचे हे बदलते विषय म्हणजे तेथील बदलत्या समाज अभिव्यक्तीचे संकेत मानता येतात. यापूर्वीच्या सेक्युलर ममता-राजमध्ये शामाप्रसाद मुखर्जी, फाळणी असे राष्ट्रवादी विषय आपल्या देखाव्यातून मांडण्याची भीती होती. नुसती “जय श्रीराम” ही घोषणा देण्यावरही त्या काळात बंदी होती. व्यक्तीपूजा आणि लांगूलचालनाची चढाओढ वाढून एका पंडालमध्ये तर खुद्द ममता बॅनर्जी यांनाच दहा हातांच्या दुर्गेच्या रूपात दाखवण्याइतकी परीसीमा गाठली गेली होती. परंतु आता नव्या राजवटीमध्ये मोकळ्या मनाने बंगाली जनता आपल्या मनात खोलवर दडवून ठेवलेल्या या राष्ट्रीय भावनांची अभिव्यक्ती करू धजत आहे. बदलत्या राजवटीची आणि जनतेने केलेल्या तिच्या स्वीकारची ही खूण आहे असे म्हणता येईल.
एकूणच, यंदाच्या पंडालमध्ये राष्ट्रीय इतिहासाची स्मृती आणि पुराणकथांवरील श्रद्धा पूर्वीपेक्षा अधिक ठळकपणे दिसते. वंदे मातरमचे १५० वे वर्ष, श्यामाप्रसाद मुखर्जींची १२५ वी जयंती आणि ‘अकाल बोधन’ सारख्या कथांनी या अभिव्यक्तीला निमित्त दिले.
सत्तांतरानंतरच्या या पहिल्या उत्सवात राष्ट्रीय इतिहास आणि श्रद्धेच्या भावना अधिक मोकळेपणाने आणि मोठ्या प्रमाणात व्यक्त झाल्या. आधीही अशा संकल्पना काही समित्या मांडत होत्या, पण यंदा त्या सर्वाधिक गर्दीच्या पंडालवर आणि राज्याच्या मुख्य उत्सवी चित्रात दिसल्या. हा बदल टिकेल का हे येणारा काळ ठरवेलच; पण बदलत्या राजकीय नेतृत्वाखाली आपण आपल्या भावना आणि राष्ट्रीय विचार अधिक खुलेपणे, सुरक्षितपणे आणि धीटपणे मांडू शकतो हा विश्वास जनतेच्या मनात जागृत झालेला आहे, हे नक्की!
