गेल्या काही वर्षांमध्ये अन्यान्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा जगतात देखील भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. भारतीय खेळाडूंनी गेल्या काही वर्षात मिळवलेल्या पदकांमध्ये मोठी वाढ झालेली आपल्याला दिसते. २००६ साली आशियाई खेळांमध्ये भारताला ५३ पदक मिळाली होती १९२२ साली ही संख्या १०६ पदकांवर गेली. आणि याच वर्षी जपान मधील आईशी नागोया या ठिकाणी झालेल्या आशियाई खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी ८५ पदकं मिळवली. पॅरालिम्पिक्स खेळांमध्ये २०१२ साली एक पदक २०१६ साली चार पदकं, २०२० मधे १९ आणि २०२४ ला २९ पदकं मिळवली. ऑलिंपिक खेळांमध्ये २०१६ साली भारताला केवळ एक पदक मिळालं होतं. हीच संख्या २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिक मध्ये ५ पदकांवर जाऊन पोहोचले.
पदक संख्येची ही वाढ सहजासहजी झालेली नाही. ही वाढ निश्चित योजनेच्या आधारे, प्रयत्नपूर्वक साध्य झालेली आहे. भारतात ३५ वर्षे वयाच्या खालील लोकसंख्या ६५ टक्के आहे. भारत तरुणांचा देश आहे. मनात आणलं तर तरुण जग जिंकू शकतो. हे लक्षात घेऊन युवकांच्या विकासासाठी गेल्या काही वर्षात अर्थसंकल्पात लक्षणीय वाढ केली गेली आहे २०१३-१४ साली यासाठी १२१९ कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती. चालू वर्षाच्या बजेटमध्ये (२०२६-२७) ४४८० कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. खेळा मधलं आपलं कर्तृत्व विकसित करण्याच्या हेतूने ‘खेलो इंडिया’ योजना आखली गेली. २०१७ साली सुरू केलेल्या या योजने अंतर्गत पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या तीन योजनांचा विलीनीकरण केलं गेलं. राजीव गांधी खेल अभियान, अर्बन स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्कीम, आणि नॅशनल स्पोर्ट्स टॅलेंट सर्च स्कीम या तीन योजनांचं विलीनीकरण करून खेलो इंडिया योजना अस्तित्वात आली. तिन्ही योजना एका छताखाली आल्यामुळे समन्वय सोपा आणि जलद व्हायला लागला. विविध स्तरांवर प्रशिक्षण केंद्र उभी करून त्याच्या माध्यमातून कुशल खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांचे खेळातील प्राविण्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांचे मार्गदर्शन करणे, प्रशिक्षक आणि सहाय्यक यांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने विकास कार्यक्रम राबवणे, क्रीडा विज्ञान आणि विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खेळाडूंची क्षमता विकसित करणे, विविध प्रकारच्या स्पर्धां च्या माध्यमातून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे व खेळ संस्कृती विकसित करणे आणि प्रशिक्षण आणि प्रतियोगितांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा विकसित करणे असा हा पंचमुखी कार्यक्रम आखला गेला.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये खेलो इंडियाचे एक प्रशिक्षण केंद्र उभारले गेले आहे. यामध्ये क्रीडा विज्ञान, पौष्टिक आहार आणि मानसशास्त्र याच्या माध्यमातून खेळाडूंची प्रगती साधली जाते. २०३६ पर्यंत क्रीडा जगतात भारत हा जगातील अग्रगण्य देशांच्या पंक्तीत बसवणे हे याचे लक्ष आहे. जुलै २०२६ पर्यंत विविध खेळांसाठी लागणाऱ्या २५६ नवीन मूलभूत सुविधा मंजूर झाल्या आहेत. त्यासाठी तीन हजार ३१७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खेलो इंडिया ची १०६७ केंद्र उभी करण्यात आली आहेत विविध खेळांच्या विकासासाठी २६७ संस्थांना सहाय्य देण्यात आले. २७४५ खेळाडूंना प्रशिक्षण सामग्री, वैद्यकीय सहाय्य, आणि पन्नास हजार रुपये मासीक भत्ता देण्यात येतो. खेळाडू जर आर्थिक दृष्ट्या स्थिर असेल तर तो खेळाकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकेल यासाठी भत्त्याची व्यवस्था केली गेली आहे. या सर्वातून निर्माण होते आहे निरनिराळ्या वयोगटातील खेळाडूंची एक मजबूत श्रृंखला.
२०१८ साली नवी दिल्ली येथे खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून अनेक नवीन खेळाडू समोर आले. इंडियन ऑलिंपिक असोसिएशन देखील आता याच्याशी जोडलं गेलं आहे. २०१९ पासून या स्पर्धांना ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ असं नाव दिलं गेलं. खेळांच्या विविध प्रकारातील खेळाडूंना यामुळे अधिक संधी प्राप्त व्हायला लागल्या. एकीकडे प्रशिक्षण, मूलभूत सुविधा आणि आर्थिक पाठबळ यातून खेळाडूंचे कौशल्य व प्रगती साधणे आणि त्याच्या जोडीला विविध प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून या खेळाडूंना संधी देणे यामुळे अनेक नवीन खेळाडू निर्माण होत आहेत. २०१८ पासून त्रेसस्ट हजारापेक्षा अधिक खेळाडूंनी खेलो इंडिया खेळांमध्ये भाग घेतला आहे. २०२० पासून खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स आणि खेलो इंडिया विंटर गेम्स सुरू करण्यात आले. २०२३ मध्ये खेलो इंडिया पॅरा गेम्स सुरू करण्यात आले. २०२५ साली खेलो इंडिया बीच गेम्स आणि खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल सुरू करण्यात आले. २०२६ मध्ये खेलो इंडिया ट्रायबल गेम्स सुरू झाले. खेलो इंडिया खेळांमधून भारताची क्रीडा संस्कृती विकसित करत तरुण खेळाडूंना अखिल भारतीय स्तरावर आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते.
२०१४ साली क्रीडा व युवा मंत्रालयाने टारगेट ऑलिंपिक पोडियम स्कीम (TOPS) प्रारंभ केली. ऑलिंपिक पोडियम म्हणजे ज्या ठिकाणी खेळाडूंना पदक दिले जाते ते स्थान. त्या स्थानी पोहोचणे हे लक्ष्य अशी ही स्कीम आहे. मानसिक आणि तांत्रिक आधार देण्याची देखील व्यवस्था केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि स्पर्धा प्रशिक्षण शिबिर, विशेष सामग्री आणि मानधन या माध्यमातून खेळाडूंचा विकास करण्याचा कार्यक्रम या अंतर्गत राबवला जातो. या योजनेअंतर्गत सध्या ५१ मुख्य खेळाडू, ५२ मुख्य पॅरा खेळाडू आणि १३० विकासोन्मुख खेळाडू यांच्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ऑलिंपिक खेळांमध्ये भारताची पदक संख्या वाढलली दिसते. २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खेळ सामग्रीच्या निर्मितीसाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून भारत, स्वस्त क्रीडा सामग्रीचे जागतिक केंद्र बनावे हा उद्देश आहे.
नियोजनबद्ध क्रीडा विकासाचा परिणाम म्हणूनच आज भारत क्रीडा क्षेत्रात देखील लक्षणीय प्रगती करताना दिसतो आहे. याचाच परिणाम आहे की मीराबाई चानू साईकोम सारखे खेळाडू हे मणिपूरच्या काकचिन सारख्या दुर्गम भागात जन्म घेऊन देशासाठी सुवर्णपदक मिळवतात. तिला सुवर्णपदक दिले जात असताना राष्ट्रगीत वाजवले गेले तेव्हा तिच्या डोळ्यातनं अश्रू ओघळायला लागले. आसाम मधील एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेली हिमा दास ही एशियन गेम्स मध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्याचप्रमाणे लवलीना बरगोहाई, दीपा कर्मकार, असे एक ना अनेक खेळाडू पुढे पुढे येऊन क्रीडा जगतात देशाचा सन्मान वाढवताहेत.
– माधव घांगुर्डे