Monday, June 1, 2026

एन. एस. राजा सुब्रमणी: संरक्षण दलांचा नवा विजीगिषू अध्याय

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या दशकभरात संरक्षण धोरणाला जी आक्रमक आणि आधुनिक दिशा दिली; त्यातील एक मैलाचा दगड म्हणजे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (CDS) म्हणजेच सरसेनाध्यक्ष या सर्वोच्च पदाची निर्मिती हा होता. अनेक दशकांपासून रखडलेली लष्कराच्या तीनही दलांच्या अशा एकत्रीकरणाची मागणी मोदी सरकारने त्वरेने पूर्ण केली. आता हाच धोरणात्मक प्रवास गतिमान करण्यासाठी जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची नवे सरसेनापती म्हणून झालेली नियुक्ती म्हणजे भारताच्या लष्करी इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात आहे. हा बदल केवळ एका पदापुरता मर्यादित नाही. जागतिक पटलावर ‘विश्वबंधू’ आणि त्याचवेळी ‘महाशक्ती’ म्हणून उदयास येणाऱ्या भारताच्या वाढत्या प्रभावाचे आणि सार्वभौमत्वाचे ते प्रतीक आहे.


गेल्या काही काळातील भारताच्या संरक्षण सिद्धतेचा आढावा घेतल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’चे उज्ज्वल यश डोळ्यांत भरते. या यशाला अनेक पदर आहेत. त्यात व्यूहनीती, प्रत्यक्ष कारवाईतली अचूकता, वेगवान हालचाली, आधुनिक तंत्रज्ञानाचे अचूक उपयोजन… आदी अनेक बाबी आहेत. राष्ट्रीय सुरक्षेत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण, सीमेपलीकडील दहशतवादाला ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या भाषेत दिलेले चोख उत्तर आणि लडाखच्या दुर्गम भागात चिनी ड्रॅगनच्या डोळ्याला डोळे भिडवून उभे राहिलेले सैन्य, या साऱ्यातून भारताने आपले सामर्थ्य जगाला दाखवून दिले आहे.


‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात संरक्षण उत्पादनात भारताने घेतलेली गरुडझेप आणि ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रास्त्रे भारतात तयार केली. ही शस्त्रे जगाला निर्यात होत आहेत. यातून मोदी सरकारच्या संरक्षण धोरणाचे यश दिसते. अशा अत्यंत भक्कम पायावर आता भविष्यातील ‘थिएटर कमांड्स’ची (एकात्मिक युद्ध कमांड) भव्य इमारत उभी करण्याचे शिवधनुष्य नव्या सैन्यप्रमुखांना पेलायचे आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत ही नवी रचना पुरी करायची आहे. या प्रक्रियेला काहीसा विलंब झाला असला तरी जनरल सुब्रमणी यांना यात जातीने लक्ष घालून ही नवी रचना लवकरात लवकर प्रत्यक्षात आणावी लागेल.


नवे सरसेनाध्यक्ष जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांच्या रूपाने देशाला एक अत्यंत अनुभवी, विचारी आणि धाडसी लष्करी नेतृत्व लाभले आहे. डिसेंबर १९८५ मध्ये ‘गढवाल रायफल्स’च्या आठव्या बटालियनमध्ये कमिशन मिळालेल्या जनरल सुब्रमणी यांचा लष्करी प्रवास चार दशकांच्या प्रदीर्घ अनुभवाने समृद्ध आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय लष्करी अकादमीचे ते विद्यार्थी आहेत. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली असून मद्रास विद्यापीठातून संरक्षण शास्त्रात एम.फिल. केले आहे. आसाममधील ‘ऑपरेशन ऱ्हायनो’ दरम्यान १६ गढवाल रायफल्सचे नेतृत्व, जम्मू-काश्मीरमधील १६८ इन्फंट्री ब्रिगेड आणि १७ माउंटेन डिव्हिजनचे नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पश्चिमेकडील आघाडीवर भारतीय लष्कराच्या सर्वांत प्रमुख अशा ‘२ कोअर’चे कमांडर, सेंट्रल कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ आणि लष्कराचे उपप्रमुख म्हणून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. या नियुक्तीपूर्वी ते राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत लष्करी सल्लागार होते. पीव्हीएसएम, एव्हीएसएम, एसएम, व्हीएसएम यांसारख्या सर्वोच्च लष्करी सन्मानांनी सन्मानित असलेले जनरल सुब्रमणी हे या पदासाठी सर्वाधिक योग्य व्यक्ती आहेत.


आता त्यांच्यासमोर मुख्य आव्हान आहे ते मोदी सरकारच्या दूरदृष्टीतून जन्माला आलेल्या ‘थिएटर कमांड्स’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे. पारंपारिक आणि आधुनिक युद्धाची परिमाणे बदलली आहेत. आता युद्धे केवळ एका आघाडीवर लढली जात नाहीत. ती सायबर, अंतराळ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लढली जातात. भारताच्या सतरा वेगवेगळ्या कमांड्सना एकत्र आणून भौगोलिक निकषांवर आधारित एकात्मिक कमांड्स तयार करणे, हे काळाच्या पुढचे पाऊल आहे. मोदी यांनी दिलेल्या ‘JAI’ (Jointness, Atma Nirbharta, Innovation – म्हणजेच एकसंधता, आत्मनिर्भरता आणि नवसंशोधन) या त्रिसूत्रीच्या आधारावर तिन्ही दलांना एकाच धाग्यात गुंफण्याचे मोठे काम आता जनरल सुब्रमणी यांना करायचे आहे.


भारतापुढील बाह्य आव्हानांचा परीघ बदलला आहे. एका बाजूला उत्तर सीमेवरील आव्हाने आहेत, तर दुसऱ्या बाजूला हिंदी महासागरामध्ये भारताचे वर्चस्व वाढवण्याची गरज आहे. जागतिक पटलावर आज युक्रेन-रशिया संघर्ष असो वा आखाती देशांमधील युद्ध; जगाला भारताच्या भूमिकेचे महत्त्व पटते आहे. महासागरांमधील व्यापारी मार्गांचे रक्षण असो की मित्रदेशांना नैसर्गिक आपत्तीत मदत करणे असो, भारतीय नौदल आणि लष्कराने आपली जागतिक प्रतिमा उंचावली आहे. अशा वेळी, देशांतर्गत संरक्षण सुधारणांना गती द्यावी लागेल. तसेच, भारतीय सैन्याला ‘मॅनपॉवर इन्टेन्सिव्ह’ म्हणजेच मनुष्यबळाच्या शक्तीपेक्षाही अधिक ‘टेक्नॉलॉजी ड्रिव्हन’ (तंत्रज्ञान प्रेरित) बनवणे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ड्रोन युद्धनीतीचा प्रभावी वापर करणे, ही तातडीची गरज आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात लष्करी नेतृत्वाला स्वातंत्र्य आणि स्थैर्य दिले. त्यामुळेच, अनेक क्रांतिकारी फेररचना होऊ शकल्या. नव्या सरसेनाध्यक्षांची नियुक्ती ही याच अजिंक्य प्रवासाला पुढे नेणारी आहे. जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांच्या कल्पक आणि कठोर नेतृत्वाखाली भारतीय संरक्षण दले अधिक आधुनिक, आत्मनिर्भर आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारी ठरतील, यात तीळमात्र शंका नाही. नव्या सरसेनाध्यक्षांना या ध्येयपूर्तीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अन्य लेख

संबंधित लेख