भारताची संस्कृती, परंपरा आणि धार्मिक श्रद्धा यांचा संबंध हजारो वर्षांचा आहे. देशातील मंदिरे ही केवळ प्रार्थनेची ठिकाणे नाहीत, तर कोट्यवधी लोकांच्या भावनांचे आणि सांस्कृतिक ओळखीचे केंद्र आहेत. मात्र डिजिटल युगात याच श्रद्धेचा व्यावसायिक वापर करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या नावाने बनावट प्रसादाची ऑनलाइन विक्री झाल्याचे नुकतेच समोर आले. या प्रकरणात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला ₹१ लाखांचा दंड ठोठावला.
जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर देशभरात भक्तीचे वातावरण होते. याच काळात पटना येथील एका तृतीय-पक्ष विक्रेत्याने ॲमेझॉनवर साध्या मिठायांची विक्री ‘श्री राम मंदिर अयोध्या प्रसाद’ या नावाने केली. २५० ग्रॅमच्या पॅकची किंमत २९९ ते ३८५ रुपयांपर्यंत होती. विशेष म्हणजे, हा प्रसाद थेट अयोध्येच्या राम मंदिरातून आशीर्वादित असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मंदिर ट्रस्टने अशा ऑनलाइन विक्रीला कोणतीही परवानगी दिली नव्हती. या माध्यमातून सुमारे २५.२६ लाख रुपयांची विक्री झाल्याचे समोर आले.
या प्रकरणात ॲमेझॉनने स्वतःला केवळ एक मध्यस्थ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हा युक्तिवाद मान्य केला नाही. एखाद्या प्लॅटफॉर्मवर एखादे उत्पादन विकले जात असेल, त्याची जाहिरात केली जात असेल आणि त्यातून प्लॅटफॉर्मला आर्थिक फायदा होत असेल, तर ग्राहकांची दिशाभूल रोखण्याची जबाबदारीही त्याची असते, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून मिळाला.
मात्र हा प्रकार केवळ राम मंदिराच्या प्रसादापुरता मर्यादित नाही. ॲमेझॉनच्या विविध आंतरराष्ट्रीय संकेतस्थळांवर हिंदू देवदेवतांच्या प्रतिमा असलेल्या अनेक आक्षेपार्ह वस्तू यापूर्वीही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. अमेरिकेच्या पोर्टलवर गणेश, शिव, विष्णू, श्रीराम, हनुमान, दुर्गा, काली तसेच राधा-कृष्ण यांच्या प्रतिमा असलेले कपडे विकले गेल्याची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी देवतांच्या प्रतिमा असलेले बूट, पायपुसण्या, बाथरूमच्या चटया, टॉयलेट सीट कव्हर्स आणि अगदी अंतर्वस्त्रांवरही अशा प्रतिमा वापरण्यात आल्या.
कॅनडामध्येही अशाच प्रकारांवरून वाद निर्माण झाले. देवतांच्या प्रतिमा असलेल्या पायपुसण्या आणि टॉयलेट कव्हर्सबरोबरच भारताचा राष्ट्रध्वज असलेली पायपुसणी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. या प्रकारानंतर भारतीय नागरिकानी तीव्र विरोध केला. प्रकरण इतके वाढले की भारत सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानंतर संबंधित वस्तू हटवण्यात आली.
२०२२ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या काळातही ॲमेझॉनवर राधा-कृष्णाची आक्षेपार्ह चित्रे विक्रीसाठी ठेवल्याने मोठा वाद निर्माण झाला. समाजमाध्यमांवर निषेध झाला, तक्रारी दाखल झाल्या आणि अखेर ही उत्पादने हटवण्यात आली.
या सगळ्या घटनांमागे ई-कॉमर्समधील तृतीय-पक्ष विक्रेत्यांची व्यवस्था आणि ‘प्रिंट-ऑन-डिमांड’सारख्या पद्धतींची मोठी भूमिका आहे. इंटरनेटवरून कोणतीही प्रतिमा घेऊन ती विविध वस्तूंवर छापून विकली जाते. मात्र त्या प्रतिमेमागील धार्मिक किंवा सांस्कृतिक भावना काय आहेत, याचा पुरेसा विचार अनेकदा केला जात नाही.
व्यवसाय करणे चुकीचे नाही. मात्र व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणे योग्य ठरू शकत नाही. धार्मिक प्रतीकांचा वापर करताना त्या समाजाच्या भावना, परंपरा आणि श्रद्धांचा आदर करणे ही नैतिक जबाबदारी आहे. सरकारकडून कायदेशीर कारवाई होणे आवश्यकच आहे; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ई-कॉमर्स कंपन्यांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे.
शेवटी प्रश्न केवळ एखाद्या प्रसादाचा किंवा एखाद्या उत्पादनाचा नाही. प्रश्न आहे तो व्यवसाय आणि श्रद्धा यांच्यातील मर्यादेचा. नफ्याच्या शर्यतीत ही मर्यादा ओलांडली गेली, तर ग्राहकांचा विश्वासच नाही तर समाजातील सांस्कृतिक संवेदनशीलताही धोक्यात येते. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांनी ‘जे विकले जाते ते विकू’ या भूमिकेपेक्षा ‘काय विकले जाऊ नये’ याची जबाबदारीही स्वीकारण्याची वेळ आली आहे.