Monday, September 21, 2026

उत्सव आपला, व्यवस्था कोणाची?

Share

लालबागचा राजा हा केवळ मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रभरातील सर्व भविकांचा आकर्षण बिंदू आहे. अक्षरश: चारही दिशांनी भाविक त्याच्या दर्शनाला येथे गर्दी करत असतात आणि नवसाला पावणाऱ्या राजाचे आशीर्वाद घेऊन तृप्त आणि निश्चिंत मनाने घरोघर परतत असतात.

राजाच्या दर्शनाला येणाऱ्या काही भाविकांना फसवून त्यांना लवकर आणि रांगेत उभे न राहता vip दर्शन देतो असे सांगत १९ वर्षांच्या प्रणव सुरेशकुमार यादव नावाच्या बारावीतील मुलाने त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. प्रणव नावाच्या या मुलाने, दीपक दुशांत, मंथन शिंदे आणि ऋषिकेश पवार या तीन युवकांना राजाचे दर्शन घडवून आणतो असे सांगून प्रत्येकाचे ८५० असे एकूण ३४०० रुपये घेतले. त्या तिघांनी ८०० रुपये upi ने तर उरलेले रोख स्वरूपात दिल्याचे सांगितले. बऱ्याच वेळानंतर देखील तो न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या परिसरात शोध घेतल्यावर त्यांना प्रणव सापडला. त्याच्याकडे चौकशी केल्यावर दर्शनासाठी आवश्यक कोणतीही व्यवस्था, पासेस किंवा त्यासंदर्भातली जबाबदारीदेखील त्याच्यावर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.

लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे आणि तेथील एकूणच व्यवस्थापन हे रिलायन्स समूहाच्या अनंत सेवा या नावाच्या सेवाभावी संस्थेकडे आहे. वरील तिन्ही युवकांचा मित्र असणारा इक्बाल असमोहम्मद मन्सुरी नावाचा वीस वर्षांचा एक युवक या अनंत सेवा मंडळातर्फे व्यवस्थापक म्हणून लालबागच्या राजाच्या परिसरात काम करतो. फसवणुकीची वरील घटना घडल्यानंतर या मन्सूरीने काळाचौकी पोलिस स्थानकामध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. प्रणव यादव याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इथे एक विचार मनात येतो. दीपक दुशांत, मंथन शिंदे आणि ऋषिकेश पवार या तिघांव्यतिरिक्त चौथा कोण? तो स्वत: इक्बाल होता का? म्हणून तक्रार त्याच्या नावाने नोंदवली गेली का? जर तसे असेल. तर स्वत:च व्यवस्थापनाचा भाग असणाऱ्या इक्बाल याला अन्य कोणाकडून पास घेण्याची आवश्यकता का निर्माण झाली असेल? आणि जर इक्बालचा समावेश फसवणूक झालेल्यांमध्ये नव्हता तर तक्रार त्याच्या नावाने का दिली गेली असावी? झालेल्या फसवणुकीबद्दल तक्रार नोंदवणे ही एक अगदी अपेक्षित आणि योग्य प्रतिक्रिया आहे, पण ज्यांची प्रत्यक्ष फसवणूक झाली त्या तिघांपैकी एकाने किंवा एकाच्या नावावर तक्रार होणे अधिक संयुक्तिक नव्हे का? असे असताना मन्सूरी याचे नाव तक्रारदार म्हणून असण्याचे कारण काय? ही तक्रार करण्याचा कोणता आधार त्याच्याकडे आहे? व्यवस्थापनावर ढिसाळपणाचा आरोप होऊ नये म्हणून त्याने हे पाऊल उचलले आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होत जातात.

यात प्रश्न कोणत्याही धर्माचा नसून संबंधित व्यक्तीच्या अधिकाराचा आहे.

अर्थात, याला दुसरी बाजूही आहे. दखलपात्र गुन्ह्याची माहिती कोणीही पोलिसांना देऊ शकतो आणि मंडळाच्या नावाचा वापर करून फसवणूक झाल्यामुळे व्यवस्थापनही या प्रकरणात बाधित पक्ष ठरते. तरीही, तक्रार प्रत्यक्ष पीडितांच्या नावे झाली असती तर चित्र अधिक स्पष्ट झाले असते. पोलिस तपासातून खरी वस्तुस्थिती समोर येईलच, तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे घाईचे ठरेल.

या घटनेतून आणखी एक मुद्दा समोर येतो, तो म्हणजे “लवकर दर्शना”च्या कल्पनेचाच. जिथे सर्वसामान्य भाविकाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, तिथे VIP दर्शनाचे आमिष दाखवणाऱ्यांना गिऱ्हाईक सहज मिळते. रांग आणि विशेष मार्ग यांच्यातली ही दरी जोपर्यंत आहे, तोपर्यंत असे दलाल तयार होत राहणार. त्यामुळे एखाद्या तरुणावर गुन्हा दाखल करून प्रश्न सुटत नाही. अधिकृत पास कोणाला, कसे आणि कुठे मिळतात हे मंडळाने स्पष्टपणे जाहीर करायला हवे. परिसरात ठिकठिकाणी “दर्शनासाठी पैसे मागितल्यास येथे तक्रार करा” असे फलक आणि हेल्पलाइन क्रमांक लावायला हवेत. गर्दीच्या काळात पोलिसांची गस्तही वाढवायला हवी. भाविकांनीही सावध राहावे, कारण श्रद्धेच्या मार्गात शॉर्टकट शोधला की तो बहुतेकदा फसवणुकीकडेच नेतो.

ही घटना एका तरुणाच्या फसवणुकीपुरती मर्यादित नाही, ती उत्सवाच्या व्यवस्थापनातील त्रुटींचा आरसा आहे. तक्रार कोणी केली यापेक्षा त्या तक्रारीतून काय सुधारणा घडते हे महत्त्वाचे. लाखो भाविकांची श्रद्धा ज्या राजाच्या चरणी वाहिली जाते, त्याच्या दारात कोणाचीही लुबाडणूक होऊ नये ही जबाबदारी मंडळ, व्यवस्थापन, पोलीस आणि भाविक या सर्वांची आहे. उत्सवाच्या परिसरात कोण कोणत्या भूमिकेत काम करते, कोणाला कोणते अधिकार दिले आहेत आणि तक्रार किंवा निर्णयामागे कोणाची जबाबदारी आहे, हे प्रश्न विचारण्याचा भाविकांना पूर्ण हक्क आहे. व्यवस्थापनाने कारभार पारदर्शक ठेवला, तर संशयाला जागाच उरणार नाही.

उत्सव आपला आहे, तर तो सुरक्षित ठेवण्याची व्यवस्थाही आपण सर्वांनी मिळून करायला हवी. शेवटी, आपले उत्सव आपल्या श्रद्धेचे प्रतीक आहेत, आणि म्हणूनच ते साजरे करताना आपण अधिक सजग राहायला हवे.

 -मैत्रेयी जोशी

अन्य लेख

संबंधित लेख