Monday, June 15, 2026

जमिनीखालून बोगदा आणि कोस्टल रोड: घोडबंदर रोड  ₹२२,६११ कोटींचा प्रकल्प

Share

मुंबई महानगर प्रदेशातील -MMR अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होणाऱ्या उपनगरांमध्ये ‘ठाणे’ शहराचा वरचा क्रमांक लागतो. आणि या ठाणे शहराची आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक जीवनवाहिनी म्हणजे ‘घोडबंदर रोड’ . साधारण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग केवळ ठाण्याला मुंबईच्या पश्चिम उपनगरांशी (बोरिवली, मीरा-भायंदर) जोडत नाही, तर तो दक्षिण भारताला गुजरात आणि उत्तर भारताशी जोडणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण आंतरराज्यीय व्यापारी कॉरिडॉर आहे.

दररोज लाखो प्रवाशांना या मार्गावर आपल्या आयुष्यातील अमूल्य तास वाया घालवावे लागत आहेत. जून २०२६ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीने या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ₹२२,६११ कोटींच्या भव्य पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये ₹१७,०३६ कोटींचा गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यानचा भुयारी मार्ग आणि उन्नत मार्ग (Elevated Corridor) समाविष्ट आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी: 

ऐतिहासिकदृष्ट्या, घोडबंदर या नावामागे एक इतिहास आहे. पोर्तुगीज आणि मराठ्यांच्या काळात या भागात घोड्यांचा व्यापार होत असे. खाडीच्या किनाऱ्यावर घोडे आणून उतरवले जात आणि तिथून ते वेगवेगळ्या प्रांतात पाठवले जात, म्हणून या भागाला घोडबंदर हे नाव पडले. 

१९९० च्या दशकापर्यंत मुंबई आणि ठाणे शहराची मर्यादा मुख्यत्वे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेच्या लोकल लाईन्सपुरती मर्यादित होती. परंतु, २००० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मुंबईतील घरांचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले, तेव्हा विकासकांनी आपला मोर्चा घोडबंदर रोडकडे वळवला. विस्तीर्ण जागा, निसर्गरम्य वातावरण आणि पश्चिम तसेच मध्य उपनगरांना जोडण्याची क्षमता यामुळे हा रस्ता रिअल इस्टेटचा हॉटस्पॉट बनला.

वाहतूक कोंडीची प्रमुख कारणे

रिअल इस्टेट कंपन्यांनी घोडबंदर रोडवर कासारवडवली, वाघबीळ, मानपाडा, पातलीपाडा, आनंदनगर, ओवळा आणि गायमुख या भागांत प्रचंड मोठे गृहनिर्माण संकुल उभारले. २५ ते ४० मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या. म्हणजे, जितक्या वेगाने लोकसंख्या वाढणार आहे, तितक्या वेगाने त्यांना वाहून नेणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (उदा. मेट्रो किंवा बीआरटीएस) आधी तयार असणे आवश्यक होते. 

सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्यामुळे (फक्त टीएमटी – TMT बसवर विसंबून राहावे लागल्याने) घोडबंदरवरील बहुतांश मध्यमवर्गीय आणि उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबांनी खाजगी वाहनांना पसंती दिली. आज येथील एका-एका घरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त गाड्या आहेत. पीक अवर्समध्ये रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांपैकी ७०% फक्त एकच व्यक्ती प्रवास करत असते. यामुळे रस्त्यावरील वाहनांची घनता रस्त्याच्या एकूण वहन क्षमतेपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे.

घोडबंदर रोडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आणि शाप म्हणजे या रस्त्यावरून होणारी मिश्र वाहतूक.

  1. ऑफिसला जाणारे नोकरदार, शाळकरी बसेस, दुचाकीस्वार आणि रिक्षा.
  2. मालवाहतूक: जेएनपीटी (JNPT) बंदरातून गुजरातच्या दिशेने जाणारे आणि गुजरातहून मुंबई-पुण्याकडे जाणारे २० ते ४० टनांचे अवाढव्य कंटेनर्स आणि मल्टि-ॲक्सल ट्रक्स.

जेव्हा हे अवजड ट्रक्स आणि लहान कार एकाच रस्त्यावर एकत्र धावतात, तेव्हा वेगाचा मोठा असंतुलन तयार होतो. अवजड वाहनांचा वेग मुळातच कमी असतो. त्यातच घोडबंदर रोडवर अनेक ठिकाणी चढाव-उतार (उदा. गायमुख घाट) आहेत, जिथे हे ट्रक्स आणखी संथ होतात. त्यांच्या मागे लहान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.

₹२२,६११ कोटींच्या महाप्रकल्प 

घोडबंदर आणि ठाणे परिसरातील वाहतूक कोंडी कायमची नष्ट करण्यासाठी ₹२२,६११ कोटींच्या महाप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.या मास्टर प्लॅनचे प्रमुख भाग खालीलप्रमाणे आहेत – 

१. गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग (Twin Tunnel Project)

या संपूर्ण योजनेचा सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी भाग म्हणजे गायमुख ते फाउंटन हॉटेल (मीरा रोड) दरम्यानचा ट्विन टनेल प्रकल्प.

  • एकूण खर्च: सुमारे ₹१७,०३६ कोटी (उन्नत मार्गासह).
  • लांबी: ५.८६ किलोमीटर.
  • रचना: हा ६ पदरी (३+३) जुळा भुयारी मार्ग असेल जो थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून आणि गायमुख घाटाच्या खालून जाईल.
  • उद्देश: हा टनेल थेट घोडबंदर रोडचा शेवटचा आणि सर्वात अरुंद भाग (गायमुख घाट) बायपास करेल. यामुळे गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक थेट हायवेला जोडली जाईल आणि स्थानिक घोडबंदर रस्त्यावरून गायब होईल.

२. फाउंटन हॉटेल ते भायंदर उन्नत मार्ग (Elevated Corridor)

भुयारी मार्गातून बाहेर पडल्यानंतर वाहतूक थेट मीरा-भायंदर आणि पश्चिमेकडील राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी ९.५८ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (Elevated Flyover) बांधला जाणार आहे. यामुळे वसई-विरार, मीरा रोड आणि भाईंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना एकही सिग्नल न लागता वेगाने प्रवास करता येईल.

३. आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग

घोडबंदर रोडच्या सुरुवातीला (ठाण्याच्या बाजूने) होणारी कोंडी फोडण्यासाठी आनंदनगर ते थेट साकेत (खारेगाव/नाशिक हायवेच्या दिशेने) असा एक स्वतंत्र उन्नत मार्ग देखील या आराखड्यात प्रस्तावित आहे. यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणारी वाहतूक ठाणे शहरात न शिरता थेट घोडबंदरच्या दिशेने पुढे जाऊ शकेल.

आर्थिक आराखडा 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडे या संपूर्ण प्रकल्प क्षेत्राची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. MMRDA ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ₹४८,०७२.५७ कोटींच्या निधीसह २०१७-१८ नंतर पहिल्यांदाच ‘सरप्लस’ (Surplus) अर्थसंकल्प सादर केला आहे. या बजेटमधील तब्बल ८७.४२% (₹४२,०२६.१४ कोटी) निधी थेट भांडवली विकास प्रकल्पांवर खर्च केला जात आहे, ज्यामुळे या प्रकल्पांना विनाअडथळा निधी उपलब्ध होईल.

तक्ता १: एकूण आर्थिक निधीचे वाटप 

अ.क्र.प्रकल्पाचे नाव / घटकमंजूर निधी (₹ कोटींमध्ये)एकूण निधीतील हिस्सा (%)
१.गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग१७,०३६७५.३४%
२.नवी मुंबई मेट्रो लाईन १ए (1A) आणि लाईन २ (Line 2) विस्तार५,५७५२४.६६%
एकूण२२,६१११००.००%

मुख्य चार उपक्रम

अ) गायमुख ते फाउंटन हॉटेल: भूमिगत (Underground ) बोगदा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) पर्यावरणीय संवेदनशील पट्ट्याला आणि येथील वनसंपदेला कोणताही धक्का न लावता हा  ५ वर्षात  (२०३१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट) हा मार्ग तयार केला जात आहे.लांबी: ५.८६ किलोमीटर.लेनची संख्या: ६-पदरी (3+3 Lanes). अत्याधुनिक ‘टनेल बोअरिंग मशीन’चा वापर केल्याने (१४ मीटर विशाल आकाराचा बोगदा)  अवजड वाहनेही सहज धावू शकतील).

ब) फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत मार्ग

बोगद्यातून बाहेर पडणाऱ्या वाहतुकीला थेट मिरा-भाईंदर आणि पश्चिम उपनगरांकडे वेगाने वाहून नेण्यासाठी हा प्रकल्प आखला गेला आहे.लांबी: ९.५८ किलोमीटर. लेनची संख्या: ६-पदरी (6-lane Elevated Road).हा उन्नत मार्ग वसईच्या खाडीला (Vasai Creek) समांतर धावणार आहे.१०० किमी प्रति तास (100 kmph) वेगाने वाहने धावू शकतील अशा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार याचे बांधकाम केले जाईल.

क) ठाणे कोस्टल रोड (Balkum to Gaimukh)

घोडबंदर रोडवरील स्थानिक आणि अंतर्गत शहरांमधील वाहतूक मुख्य हायवेवरून बाजूला करण्यासाठी हा समांतर किनारी रस्ता अत्यंत आवश्यक आहे. आता जवळपास ₹२,७२७ कोटी म्हणजे २८% काम पूर्ण झाले आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ मधील तरतूदनुसार  MMRDA बजेटमध्ये या रस्त्यासाठी विशेष ₹१,०२५.७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.बाळकूम, खारेगाव ते थेट गायमुख यादरम्यान राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना मुख्य घोडबंदर हायवेवर न येता प्रवास करता येईल.

ड) मेट्रो नेटवर्क कनेक्टिव्हिटी (मेट्रो ४ आणि ५)

रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी सार्वजनिक दळणवळण व्यवस्था मजबूत करणे हा या अंतर्गत रचनेचा मुख्य भाग आहे. मेट्रोच्या या संपूर्ण जाळ्यामुळे घोडबंदर पट्ट्यातील रस्त्यांवरील खाजगी वाहनांची संख्या अंदाजे २५% ते ३०% ने घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • मेट्रो ४ (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली) आणि ४ए (कासारवडवली ते गायमुख): हा मार्ग थेट घोडबंदर रोडच्या मध्यभागातून जातो.
  • मेट्रो ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगर विस्तार): ठाणे आणि कल्याण या दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा मुख्य दुवा आहे.

अन्य लेख

संबंधित लेख