जिहादी पाकिस्तानशी व्यापारावर निर्बंध असताना राज्यात शत्रू राष्ट्राच्या सौंदर्यप्रसाधनांची सर्रास विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या काही दिवसांपासून समोर आलाय. भारतात पाकिस्तानी वस्तूंवर कडक निर्बंध असतानाही सौंदर्य प्रसाधन स्थानिक बाजारात आली कशी? दुबई, ओमान अश्या देशांमधून चोरीछुपे पाकिस्तानची ‘सौंदर्य प्रसाधनं’ भारतात येत आहेत अश्या प्रकारच्या बातम्या होत्या त्यात आता नेपाळची देखील भर पडली आहे.
‘मेड इन चायना’ प्रमाणे आता ‘मेड इन पाकिस्तान’, ‘मेड इन नेपाळ’, ‘मेड इन दुबई’ आदी इतर देशांमधून येणारी स्वस्त सौंदर्यप्रसाधने ही बोगस उत्पादने असल्याचे ‘एफडीए’ने केलेल्या कारवायांमध्ये दिसून आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही ठराविक भागांमध्ये या उत्पादनांची खुलेआम विक्री केली जाते असेही निदर्शनास आले आहे.
राज्याबाहेरील उत्पादनांवर नियंत्रण नाही
राज्यात सौंदर्यप्रसाधनाचे ३०० ते ३५० उत्पादक असले तरीही राज्याबाहेरून येणाऱ्या बोगस उत्पादनांवर कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे या उत्पादनांची विक्री सर्रास केली जाते. त्यात त्वचेचा रंग उजळवण्यासह केशवर्धन तेले,सिरम, शाम्पू, कंडिशनर, फेसक्रीम्स, ब्लीचक्रीम्स यांचाही समावेश असतो. विशेष म्हणजे, भारत सरकारने अशा अनेक पाकिस्तानी उत्पादनांच्या आयात, विक्री आणि वितरणावर विविध कारणांमुळे निर्बंध घातलेले आहेत. त्यामागे केवळ व्यापारी धोरणेच नाहीत, तर ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचाही महत्त्वाचा विचार आहे. त्यामुळे अशा उत्पादनांची बेकायदेशीररीत्या विक्री करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा मानला जातो.
९० लाखांचा साठा जप्त..
‘एफडीए’ने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधने, विनापरवाना तयार केलेली आयुर्वेदिक औषधे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांवर नांदेड, पुणे, बीड , सोलापूर, छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई केली. त्यात सुमारे ९० लाख रुपयांहून अधिक किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. नांदेडमध्ये पाकिस्तानमध्ये तयार केलेल्या गोरी ब्युटी क्रीम, फेसफ्रेश ब्युटी क्रीम, उजोबा एक्स्ट्रा व्हाइट आणि गोल्ड ग्लीम या सौंदर्यप्रसाधनांचा साठा ‘एफडीए’ने जप्त केला. या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी पाठवुन संबधितांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाइन विक्रीवर निर्बंध गरजेचे
आयटी अॅक्ट २००० नुसार इ कॉमर्सची बाजारपेठ नियंत्रित करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र या उत्पादनांच्या विक्रीवर प्रभावी अंकुश ठेवला जात नसल्याचे ‘एफडीए’च्या निदर्शनास आले आहे. प्रयोगशाळेमधील नमुन्यांच्या विश्लेषणानुसार या उत्पादनांमध्ये पारा आणि शिसे हे निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात आढळले आहेत. किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने या उत्पादनांची विक्री, साठवणूक, प्रदर्शन आणि वितरण तत्काळ बंद करावे. ज्यांच्याकडे या क्रीम्सचा साठा आहे त्यांच्यासह वितरकांनी ही माहिती ‘एफडीए’ला देऊन वितरित केलेला साठा बाजारातून परत घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्याचे गंभीर धोके..
या प्रकरणातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे या सौंदर्यप्रसाधनांमुळे उद्भवू शकणारे आरोग्याचे गंभीर धोके. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही बेकायदेशीर फेअरनेस क्रीम्स आणि त्वचा उजळ करण्याच्या उत्पादनांमध्ये पारा (Mercury), शिसे (Lead), हायड्रोक्विनोन (Hydroquinone) आणि इतर घातक रासायनिक घटकांचा वापर करण्यात येतो. हे घटक त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करून रक्तामध्ये मिसळू शकतात. त्यानंतर त्याचा परिणाम थेट मूत्रपिंड, यकृत आणि मज्जासंस्थेवर होण्याची शक्यता असते.
या सौंदर्य प्रसाधनांचा सतत संपर्क आल्यास किडनी निकामी होणे, मज्जासंस्थेचे विकार, स्मरणशक्ती कमी होणे, त्वचेवर कायमस्वरूपी दुष्परिणाम, गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या विकासावर परिणाम आणि लहान मुलांमध्ये शारीरिक व मानसिक वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेक देशांमध्ये अशा उत्पादनांवर बंदी घालण्यात आली असून, जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि विविध आरोग्य संस्थांनीही अशा उत्पादनांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
ग्राहकांची सजगता आवश्यक
स्वस्त मिळते म्हणून आपण कसलाही मागचा पुढचा विचार करत नाही निदान आरोग्याच्या बाबतीत तरी असे होता कामा नये. ग्राहकांनी कोणतेही सौंदर्यप्रसाधन खरेदी करताना त्यावरील उत्पादकाचे नाव, आयातदाराची माहिती, परवाना क्रमांक, उत्पादनाची नोंदणी आणि कालबाह्यता तारीख यांची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनधिकृत मार्गाने किंवा अत्यंत स्वस्त दरात विकली जाणारी उत्पादने टाळावीत. कारण ती हानिकारक असून त्यामुळे शत्रुदेशाचेच भले होणार आहे.
प्रशासनाने अशा घातक परदेशी उत्पादनांवर देशात कायदेशीर बंदी घातली आहे. मात्र, तरीही छुप्या मार्गाने त्यांचा मोठा काळाबाजार बिनदिक्कतपणे सुरूच असल्याचे या छाप्यांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शासनाचे कडक नियम आणि सुरक्षा यंत्रणांची सातत्यपूर्ण कारवाई असतानाही, काळ्या बाजारात या क्रीम्सची होणारी सर्रास विक्री ही सरकारी यंत्रणा आणि प्रशासनासाठी एक अत्यंत डोकेदुखीची आणि आव्हानात्मक बाब बनली आहे.
– हिमांशु शुक्ला