लंडनमध्ये राष्ट्र उभारणीच्या आणि सामाजिक एकात्मतेच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचे चिंतन करणाऱ्या ‘सेलिब्रेशन ऑफ वननेस’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय संवाद सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडलेले विचार म्हणजे केवळ एका संघटनेचे तत्त्वज्ञान नसून, जागतिक पातळीवर आजच्या विभक्त आणि संघर्षमय वातावरणात मानवी मूल्यांची पुनर्स्थापना करणारा मैलाचा दगड ठरले.
लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर ३०० हून अधिक विविध सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, ब्रिटिश लोकप्रतिनिधी आणि भारतीय समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या व्यासपीठावरून सरसंघचालकांनी अंतर्मुख करणारा संदेश दिला की, “आपल्याला विभक्त करणाऱ्या घटकांवर भर देण्यापेक्षा, आपल्याला एकत्र आणणाऱ्या गोष्टींना आपण प्राधान्य दिले, तर हे जग माणसांसाठी अधिक सुंदर आणि समृद्ध बनेल.”
संघाच्या १०० वर्षांच्या प्रदीर्घ आणि खडतर प्रवासाचा मूळ गाभा काय? यावर सरसंघचालक अगदी म्हणाले ‘आपुलकी’. ही आपुलकी म्हणजे कोणत्याही स्वार्थाविना किंवा अपेक्षेविना प्रत्येक व्यक्तीबद्दल, समाजातल्या घटकाबद्दल आणि संपूर्ण मानवतेबद्दल मनात असणारे ‘शुद्ध सात्विक प्रेम’. हीच हिंदू विचारांची खरी परंपरा आहे. ही परंपरा मानवी जीवनाकडे अत्यंत संतुलित आणि सर्वसमावेशक दृष्टीने पाहते. जेव्हा जगात मतभेद वाढतात, तेव्हा हेच प्रेम आणि आपुलकीचे नाते समाजातील दरी सांधण्याचे काम करते.
लडाखच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेल्या विशाल कार्यक्षेत्रात स्वयंसेवक अहोरात्र काम करत असतात. परंतु, सरसंघचालकांनी या सेवाकार्याला एका अध्यात्मिक आणि उच्च वैचारिक पातळीवर नेऊन ठेवले. त्यांच्या मते, सेवा ही केवळ समाजकल्याणाची किंवा कोणावर उपकार करण्याची गोष्ट नाही. ती स्वतःमधील अहंपणा गमावून ईश्वराच्या समीप जाण्याची एक संधी आहे. ज्यांची आपण सेवा करतो, ते लोक आपल्याला सेवा करण्याची संधी देऊन उलट आपल्यावरच उपकार करत असतात. हीच भावना संघाच्या सेवेचा आत्मा आहे. म्हणूनच, जेथे कोणीही पोहोचू शकत नाही, तेथे स्वयंसेवक धावून जातात आणि राजकीय किंवा वैचारिक मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण समाज त्यांच्या या गुणांचा आदर करतो.
‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदू राष्ट्र’ या संकल्पनांवर बोलताना त्यांनी पाश्चात्त्य किंवा संकुचित व्याख्यांना पूर्णपणे छेद दिला. हिंदू हा शब्द केवळ एखादी विशिष्ट पूजापद्धती, पंथ किंवा जीवनशैलीपुरता मर्यादित नाही. तो एक व्यापक ‘स्वभाव’ आहे.
अस्तित्व हे मूलतः एकच आहे. ज्याप्रमाणे एकाच झाडाला विविध प्रकारची फुले आणि पाने येतात आणि ते झाडाचे सौंदर्य वाढवतात, त्याचप्रमाणे ही विविधता म्हणजे ऐक्याचीच विविध रूपे आहेत.
सर्व मार्ग शेवटी एकाच ईश्वराकडे जातात, ही धारणा हिंदू संस्कृतीचा कणा आहे. त्यामुळे येथे धर्मांतराची किंवा कोणालाही एकाच चौकटीत बसवण्याची गरज भासत नाही. ‘आम्हीही बरोबर आहोत आणि तुम्हीही तुमच्या मार्गाने बरोबर आहात’, हा दृष्टिकोन जगाला शांतता देऊ शकतो.
आजच्या नव्या पिढीबद्दल बोलताना सरसंघचालक म्हणाले, वयाच्या अनुभवामुळे वयस्क मंडळी काहीशी सावध होतात, परंतु तरुण पिढी ही अत्यंत प्रामाणिक, थेट आणि परिणामांची पर्वा न करता सत्याच्या पाठीशी उभी राहणारी असते. ते म्हणतात की, “तरुणांवर पद्धती लादू नका. त्यांना फक्त उद्दिष्ट आणि अनुभवाचे ज्ञान द्या, आणि त्यांचा मार्ग त्यांना शोधू द्या.” जर नव्या पिढीला विश्वात्मक एकात्मतेचे आणि सामाजिक दायित्वाचे ध्येय दिले, तर ती कोणत्याही क्षुद्र भेदांना मूठमाती देऊन अधिक वेगाने आणि प्रभावीपणे हे जग सुंदर बनवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांबद्दल बोलताना ते म्हणाले, हिंदुत्व हे व्यक्तीला तिच्या कर्मभूमीशी प्रामाणिक राहण्याची शिकवण देते. जन्मभूमी आणि पुण्यभूमी तुम्हाला संस्कार, मूल्ये आणि संस्कृती देतात. परंतु, तुमची ‘कर्मभूमी’ हीच तुमची निष्ठेची जागा असते. त्यामुळे ब्रिटिश हिंदूंनी ज्या देशात ते राहतात, तेथील समाजाची आणि भूमीची पूर्ण निष्ठेने सेवा केली पाहिजे. यात भारत आणि ब्रिटनच्या हितांमध्ये कोणताही संघर्ष असू शकत नाही, उलट सच्चा हिंदू हा त्याच्या कर्मभूमीचा अत्यंत जबाबदार आणि निष्ठावंत नागरिक असतो.
लंडन येथील हे सत्र केवळ एका संघटनेच्या विचारसरणीचे सादरीकरण नव्हते, तर ते एका प्राचीन संस्कृतीचे आधुनिक जगाला दिलेले उत्तर होते. ‘जे तोडते त्यापेक्षा जे जोडते ते महत्त्वाचे’ हा सरसंघचालकांनी दिलेला संदेश आजच्या ध्रुवीकृत जगात शांतता, सहअस्तित्व आणि मानवी कल्याणाचा एक नवा मार्ग दाखवतो.